
Agriculture Success Story : नाशिक प्रमाणेच सांगलीची द्राक्षे किंवा बेदाणा अशीही वेगळी ओळख तयार झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष शेती टिकवली आहे. दर्जेदार बेदाणा निर्मितीसह टेबल ग्रेपची देशांतर्गत व परदेशात निर्यात करण्यापर्यंत यशस्वी मजल मारली आहे. मागील दोन- तीन वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यातील जत तालुकाही द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आला आहे.
संघर्ष काही थांबला नाही
द्राक्ष पीक दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा फेऱ्यात अडकलेले आहे. अनेक वेळा परतीच्या पावसाला सामोरे जावे लागते. त्यामुळे परिस्थितीनुसार फळ छाटणीचे वेळापत्रक बदलावे लागते. अशा सर्व परिस्थितीत हताश न होता जिद्दीने शेतकऱ्यांनी बागा साधल्या आहेत. द्राक्ष हे असे पीक आहे की त्यात दररोज नव्या समस्या येतात. बागायतदार त्यानुसार उपाय शोधून पुढील वर्षी त्यांची तीव्रता कमी होईल याची दक्षता घेतात.
निर्यातक्षम बागेसाठी खरड छाटणीपासूनच काटेकोर नियोजन करावे लागते. काडी, घडांची संख्या मर्यादित ठेवल्याने मण्यांचा आकार आणि दर्जा चांगला मिळतो. मणी सेटिंग ते फळ काढणीपर्यंतच्या कालावधीत किडी- रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीडनाशकांचा वापर पीएचआय व एमआरएलनुसार केला जातो. जमिनीचा पोत टिकवण्यावरही भर असतो. अनुभवातूनच द्राक्षशेतीत कुशलता आल्याचे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अतुल बाबर, प्रवीण पाटील यांनी सांगितले. अपेडा मान्यताप्राप्त १६ पॅकहाउस देखील आहेत.
नवीन वाण, बाजारपेठा
थॉमसन, माणिक चमन, तास-ए-गणेश, सुपर सोनाका, शरद सीडलेस, अनुष्का, एसएसएन, (लांब वाण) आदी वाणांची आखाती व युरोपिय बाजारपेठेत निर्यात होते. दोन वर्षांपासून सिंगापूर, कॅनडा आदी देशांमध्ये निर्यात सुरू झाली आहे.
चालू वर्षी इंडोनेशियात सांगलीची द्राक्षे पोचली आहेत. जिल्ह्यात क्रीमसन सीडलेस या वाणाची ५० एकरांच्या दरम्यान लागवड असावी. नाशिक येथील प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात आरा ३५, आरा ३६ या वाणांची लागवडही सुमारे २०० एकरांच्या दरम्यान असावी.
दरांनी तारले
द्राक्ष बागायतदार सुशीलकुमार पाटील, अमित गुरव म्हणाले, की चार- पाच वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्षाचे नुकसान होऊन अपेक्षित दर मिळाले नाहीत. उत्पादन खर्चही पदरी पडला नाही. मागीलवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला सरासरी ७० रुपये प्रति किलो दर मिळाला. नुकत्याच संपलेल्या हंगामात हा दर ९० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत मिळाला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० रुपयांनी दर जास्त होता. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले. परंतु दरांमुळे शेतकऱ्यांना तारल्याने उत्पादन खर्च निघाला. मागील चार वर्षांचा विचार करता यंदा मिळालेले दर तुलनेने चांगलेच आहेत असे म्हणावे लागेल.
सांगली जिल्ह्यातून प्रामुख्याने युरोपिय खंडातील नेदरलॅण्ड, डेन्मार्क, जर्मनी, आर्यलॅण्ड, नॉर्वे, रोमानिया, स्पेन, इंग्लंड तर आखातात संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, ओमान याशिवाय चीन, मलेशिया, हाँगकाँग या देशांमध्ये निर्यात होते.
गटशेतीतून मिळणार चालना
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी सुशिक्षित युवा तरुण पुढे आले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमधून जिल्ह्यात आरा वाणांची लागवड होण्यास मदत झाली. गटाच्या माध्यमातून निर्यातीचे या तरुणांचे नियोजन आहे. त्यासाठी परदेशात जाऊन बाजारपेठेत कोणत्या वाणांना मागणी आहे त्याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यातून थेट निर्यातीला चालना मिळण्यासह विक्रीची मधली साखळी कमी होऊन थेट नफा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.
कृषी विभाग, द्राक्ष संघाचा पुढाकार
जिल्ह्यातून द्राक्षनिर्यात वाढावी यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. छाटाणीपूर्व चर्चासत्रांच्या माध्यमातून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळू लागले. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागाकडूनही द्राक्ष निर्यातीसाठी उपक्रम राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
निर्यातक्षम द्राक्षांचा हंगाम एप्रिलपर्यंत सुरू असतो. या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या वर्षी मात्र काढणीपासून हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत नैसर्गिक संकट फारसे आले नाही. यामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीचे चित्र
वर्ष शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) निर्यात (टन)
२०२०-२०२१ २१३५ ११७७ १७४८०
२०२१- २०२२ ४२८४ २३१७ २००१०
२०२२-२०२३ ९५२४ ५३१३ १७९९४
२०२३-२०२४ ९६२९ ५३६८ १९२७०
२०२४- २०२५ १०१५६ ५५२४ १८२०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.