Indigenous Khilar Rearing : शर्यतीच्या खोंडांसाठी सलगरे सर्वदूर प्रसिद्ध

Khilar Rearing : सांगली जिल्ह्यातील सलगरे गावाने खिलार देशी गोवंश संगोपनाची परंपरा अनेक वर्षांपासून जपली आहे. शर्यतीसाठी जातिवंत, अस्सल खोंड मिळण्याचे ठिकाण म्हणून गावाची महाराष्ट्रासह अन्य राज्यात प्रसिद्धी झाली आहे.
Sarjerao Sable and Bhimrao Sable
Sarjerao Sable and Bhimrao SableAgrowon

अभिजित डाके

Khilar Rearing Success Story :

सांगली जिल्ह्यात सलगरे (ता. मिरज) हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले गाव आहे. लोकसंख्या साडेसहा हजारांपर्यंत आहे.

कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने शेती कोरडवाहू होती. पोटापुरतं पिकवून मिळालेल्या उत्पन्नातून उदरनिर्वाह केला जायचा. पैशांची चणचण असल्याने मजुरीवर सारी भिस्त होती.

खिलार जनावरे पालनाची परंपरा

काळ होता पन्नास साठ वर्षांपूर्वीचा. दुष्काळ असला तरी इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात एक ते दोन खिलार गायी आढळायच्या. या परंपरेतूनच जातिवंत देशी खिलार पैदास करून खोंडांची विक्री करण्याच्या व्यवसायाचा मार्ग गावाला मिळाला.

हळूहळू जनावरांची संख्या वाढू लागली. रस्त्यांच्या बाजूने शेळ्या-मेंढ्याचे कळप जावेत तशा प्रकारे शेकडोंच्या संख्येने गोवंश गावाच्या माळनारानावर चरताना दिसू लागला. मुळात त्यांना दावं लावलं जात नाही. गायींचे दूध न काढता वासरांनाच पाजले जाते. अशी धष्टपुष्ट वासरं, खोंडं माळरानांवर हुंदडताना दिसू लागली.

Sarjerao Sable and Bhimrao Sable
Bullock Cart : हौशेला मोल नाहीच; पुण्यातील खेडच्या शेतकऱ्याने घेतला तब्बल २१ लाखांला बैल

गावाची सर्वदूर ओळख

राज्यात कुठेही जा, बैलगाडा शर्यत ही शौकिनांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. अशा शर्यतीच्या अनेक अड्ड्यांवर एक से बढकर एक खोंड दिसून येतात. साहजिकच त्यातील एखादे खोंड पाहून शौकीन हा खोंड कोठून आणला असे विचारतात. त्या वेळी सलगरे गावातून तो घेतला अशी माहिती मिळते.

अशा प्रकारे ‘माउथ टू माउथ’ प्रसिद्धीतून शर्यतीसाठी खात्रीशीर खोंड मिळणारे गाव अशी सलगरेची सर्वदूर प्रसिद्धी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी गावात सुमारे दीड ते दोन हजारांपर्यंत खिलार जनावरांची संख्या होती. सन २०१४ च्या दरम्यान बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी आली.

त्याचा फटका गावातील खोंड विक्रीवर झाला. या काळात शेतकऱ्यांनी पै-पाहुण्यांकडे जनावरे सांभाळण्यासाठी दिली. काहींनी संख्या कमी केली. या वेळी खोंडांचे दरही कमी झाले. आठ वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये शर्यतीवरील बंदी उठली. त्यामुळे पुन्हा शर्यतीच्या खोंडांना मागणी वाढली आहे.

सर्वत्र मागणी

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, सांगोला येथील आठवडी जनावरांच्या बाजारात सलगरे येथील शर्यतीच्या खोंडांना विशेष मागणी असते. सातारा, पुणे, कोकणासह कर्नाटकातील बेळगावसह विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बागलकोट ते अगदी कोलकाता येथूनही हौशी शेतकरी थेट गावात येऊन, शेतकऱ्यांच्या वाड्यात जाऊन खोंडांची खरेदी करताना दिसतात.

खोंड खरेदी करताना कान, शिंग, बारीक शेपूट, तोंडावर कोसा, चित्रा, काळा हरणा, पांढरा असे रंग पाहिले जातात. शिवाय खोंडाची शरीरयष्टी, चपळपणा या बाबी तपासून त्यानुसार दर ठरतात. काळा मोरा ९० हजारांपासून दीड लाखापर्यंत, पांढरा कोसा ८० ते ९० हजार, चित्रा दीड ते दोन लाख असे दर आहेत.

एक वर्षाच्या आतील खोंडांना अधिक मागणी असते. खोंड तयार करताना १० ते १२ महिन्यांनंतर त्यांना गाडीला जुंपण्यात येते. शर्यतीच्या अंतरानुसार तालीम दिली जाते. सातू, हरभरा, डाळी, मटकी, तांबडा हुलगा यांचा भरडा दिल्याने खोंडांमध्ये ताकद येते. पायांत ताकद येण्यासाठी त्यांना नांगराला जुंपले जाते.

Sarjerao Sable and Bhimrao Sable
Bullock Cart Race : तळेगाव- बैलगाडा शर्यतीत त्याचे नाव महिलांचा सहभाग हे मुख्य आकर्षण

आर्थिक उलाढाल

आजमितीला गावात ५०० हून अधिक खिलार गायींचे संगोपन होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या दावणीला पाच ते १० पर्यंत गायींची संख्या आढळते. वर्षभरात सुमारे २०० ते ३०० पर्यंत खोंडांची विक्री होत असावी.

त्यातून कोटीहून अधिक उलाढाल होते. त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. जोडीला म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीचे पाणी गावात आल्याने नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. त्यातून उत्पन्नवाढीला अजून चालना मिळाली आहे.

आमच्या वडिलांनी देशी खिलार जनावरे सांभाळण्यास सुरुवात केली. दुसरी पिढी आता त्यांचे संगोपन करीत असून, ही परंपरा आमच्या घराण्यात जोपासण्यात येत आहे. खोंड विक्रीतून कुटुंबाच्या अर्थकारणास गती मिळाली आहे. घर बांधले आहे. खोंड अधिक चपळ होण्यासाठी आणि शरीरयष्टी उत्तम होण्यासाठी त्यावर मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे मागेल तो दर मिळतो. शर्यतीवर बंदी घातल्याने जनावरांची संख्या मध्यंतरी कमी केली होती. शर्यत सुरू झाल्याने आता खोंडांना मागणी वाढली आहे.
सर्जेराव साबळे ९७६६०३५६१४
दावणीला लहान मोठ्या गाई मिळून २० पर्यंत संख्या आहे. पैदाशीसाठी वळू आहे. त्यामुळे जातिवंत खिलार पैदास होते. या व्यवसायातून आर्थिक सक्षमता मिळवली आहे.
राजेंद्र निंबाळकर ७८७५३९४०९०
अनेक वर्षांपासूनच आम्ही गोपालन करतो. खोंड विक्रीतून उपजीविकेचे महत्त्वाचे साधन निर्माण झाले आहे. मुलगा गणेश यास वाहतुकीसाठी वाहन ऊन देता आले. वैशाली आणि सीमा या दोन मुलींचे ‘नर्सिंग’चे शिक्षण पूर्ण झाले. पैकी एक जण आता पुण्यात नोकरी करू लागली आहे. आता घर बांधण्याचे नियोजन केले आहे.
अप्पासो कांबळे ९६५७१८४७०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com