Ragi Crop : चंदगड तालुक्यातील सदानंद गावडे यांनी नाचणी पिकात तयार केली ओळख

Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदवडे (ता.चंदगड) येथील डॉ. सदानंद गावडे यांनी नाचणी पिकात पंचक्रोशीत ओळख तयार केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी नाचणीच्या पारंपरिक जाती जतन केल्या आहेत. गावडे यांनीही याच जातींच्या आधारे नाचणीची शेती यशस्वी केली आहे.
Ragi Crop
Ragi CropAgrowon
Published on
Updated on

Sugarcane, Ragi Update : कोल्हापूर जिल्हा ऊस व दुधासाठी प्रसिद्ध असला तरी कोकणाकडील चंदगड, आजरा आदी भाग भात, नाचणी यांसारख्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. नांदवडे (ता. चंदगड) गावचा परिसरदेखील नाचणीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील सदानंद नरसू गावडे नाचणी उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास या विषयांतील त्यांनी ‘पीएचडी’ घेतली आहे. राज्याच्या विविध भागांत उत्खनन विषयासाठी त्यांनी दौरे केले आहेत. आपले संशोधनकार्य सुरू ठेवण्याबरोबर कुटुंबीयांसमवेत ते गावी शेतीत रमले आहेत.

नाचणीची शेती

गावडे यांची दहा एकर शेती असून ती डोंगराळ व ओढ्याच्या काठी आहे. वाहून जाणारा गाळ अडवून त्यांनी काही शेती सुपीक करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी एक एकर क्षेत्र नाचणी, पाच एकर ऊस तर उर्वरित क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. चंदगड तालुक्यात बहुतांशी नाचणीच्या जुन्या जातीच घेतल्या जातात. गावडे यांनी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे.

पंचक्रोशीत नाचणी अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. या भागात नाचणीच्या पारंपरिक वाणांना माकडीचे टकले, कोळशी, गिड्डापा, गिड्डीगवळण, मनजी, लाव्हा, थोरला आदी नावांनी ओळखले जाते.

Ragi Crop
CM Dhami Sown Ragi : नाचणीच्या पेरणीत दंग उत्तराखंडचे मुख्यमंत्री

पीक व्यवस्थापनातील बाबी

पीक व्यवस्थापनाबाबत बोलायचे तर पाऊस व हवामान यांची संभाव्य परिस्थिती पाहून गावडे नाचणी पिकाचे नियोजन करतात. यंदा पाऊस लांबल्याने ही प्रक्रिया उशिरा सुरू आहे. सुरुवातीला रोपवाटिका तयार केली जाते. रोपे सरीमध्ये खोचून लावली जातात. तिसऱ्या दिवशी खत दिले जाते.

सेंद्रिय घटकांचा वापर म्हणून एकरी २०० लिटर जिवामृत फवारणी होते. दशपर्णी अर्काचाही वापर होतो. साधारणतः सप्टेंबरपर्यंत फुलोरा येतो. नोव्हेंबरच्या दरम्यान पीक काढणीस येते. कोवळी नाचणी खाण्यासाठी थोडी लवकर काढली जाते.

तर विक्रीसाठी परिपक्व नाचणीची काढणी होते. कणसे नव्वद टक्के परिपूर्ण झाल्यानंतर कापणी खुरप्याने केली जाते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाच्या स्थितीनुसार काढणीची प्रक्रिया पूर्ण होते.

उत्पादन

एकरी १५ क्विंटल व काही वेळा त्याहून उत्पादन गावडे यांनी घेतले आहे. गेल्या वर्षी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत त्यंचा दुसरा क्रमांक आला होता. गेल्या वर्षी नाचणीस त्यांना प्रति क्विंटल ३५६० रुपयांपर्यंत दर मिळाला. शेत तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत एकरी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च आला.

उत्पादनाबरोबर पाच गाड्या चारा मिळाला. त्यातून दहा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. नाचणीची बहुतांश विक्री व्यापाऱ्यांना, तसेच शासनाच्या वतीने असलेल्या विक्री केंद्रांमध्येही ती दिली जाते.

ऊस व भाताचे उत्पादनही दरवर्षी घेण्यात येते. उसाचे एकरी ४० टनांपर्यंत तर भाताचे उत्पादन ३० ते ४० क्विंटलपर्यंत होते. नाचणीची शेती व त्यातील अनुभवांवर आधारित गावडे एक पुस्तिकाही लवकरच प्रकाशित करणार आहेत.

संपर्क - डॉ. सदानंद गावडे, ९०७५५३३१८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com