Silk Farming : साबळेवाडी झाली रेशीमवाडी

Sabalewadi Silk Farming : पुणे जिल्ह्यात साबळेवाडी (ता. बारामती) गावाची ओळख रेशीमवाडी म्हणून झाली आहे. कृषी- आत्मा विभाग, रेशीम कार्यालय यांच्या सहकार्यातून शेतकरी गट बांधणी, अनुदान आदींद्वारे रेशीम उद्योगवाढीस प्रोत्साहन मिळाले आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

संदीप नवले

Sabalewadi Village ; पुणे जिल्ह्यात साबळेवाडी (ता. बारामती) गावाची ओळख रेशीमवाडी म्हणून झाली आहे. कृषी- आत्मा विभाग, रेशीम कार्यालय यांच्या सहकार्यातून शेतकरी गट बांधणी, अनुदान आदींद्वारे रेशीम उद्योगवाढीस प्रोत्साहन मिळाले आहे. विक्री व्यवस्था तयार झाली आहे. कोरडवाहू पट्ट्यात शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा हुकमी पर्याय गवसला आहे.

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात सुमारे बाराशे लोकसंख्येचे साबळेवाडी गाव आहे. आज रेशीमवाडी अशी त्याची नवी ओळख तयार झाली आहे. सन २००५ च्या आसपास गावातील मोजके शेतकरी रेशीम व्यवसायाकडे वळले. कोषांना मिळणारा चांगला दर आणि पिकांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न पाहून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. शिवाय कृषी विभाग- आत्मा व जिल्हा रेशीम कार्यालयाने पाठबळ दिले. त्यातून तालुक्यातील पहिल्या रेशीम शेतकरी गटाची नोंदणी झाली. तंत्रज्ञान, मेळावे, प्रशिक्षण यातून अधिक चालना मिळाली. सध्या गटात १९ सभासद आहेत. तालुक्यातील आजमितीला २५० एकर क्षेत्र तुतीखाली असून, पैकी साबळेवाडी परिसरातील क्षेत्र १५० एकरांपर्यंत असावे.

व्यवसाय व्यवस्थापन

रेशीम शेड उभारणीसाठी शेतकऱ्यांनी दोन ते पाच लाख रुपयांपर्यत गुंतवणूक केली आहे. कर्नाटक, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथून अंडीपुंज आणले जातात. चॉकी सेंटरमधूनही बाल्यावस्थेतील अळ्या उपलब्ध होतात. बारमाही पाणी असल्यास शंभर ते दोनशे अंडीपुजांची एक अशा वर्षभरात चार ते पाचपर्यंत बॅचेस घेण्यात येतात. प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. अळ्यांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत पुरेशी जागा (स्पेसिंग) ठेवली जाते. उत्पादनवाढीत ही बाब महत्त्वाची असल्याचे शेतकरी आवर्जून सांगतात.

उत्पादन व कोषविक्री

एक एकर तुती क्षेत्र व प्रति २५० अंडीपुंजाची बॅच असते. शंभर अंडीपुंजांपासून ७० ते ८० किलो
किंवा काही वेळा त्याहून अधिक कोष उत्पादन मिळते. प्रति किलो सरासरी ५०० ते ६०० रुपये व त्याहून अधिक दरही मिळतो. प्रति बॅच किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. सुरवातीला पुण्यातील काही व्यापारी रेशीम कोषांची खरेदी करून ते बंगळूरला पाठवायचे. आता जिल्हा रेशीम कार्यालय व बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पुढाकाराने ई-नाम पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांची सोय झाली आहे. या बाजार समितीत सोलापूरसह, बंगळूर येथील व्यापारी येतात. मागील काही महिन्यांपासून जागेवरच खरेदी होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे.

Silk Farming
Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

मार्गदर्शन, अनुदान

पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी रेशीम उद्योगाचे अनुदान मिळविण्यासाठी पात्र आहेत. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी एकूण तीन लाख ५८ हजार ६५ रुपये अनुदान आहे. चालू वर्षापासून सिल्क समग्र -२ योजना सुरू झाली आहे. त्यातूनही अनुदानाचा पर्याय उपलब्ध आहे. प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे येथील साहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, रेशीम विकास अधिकारी संजय फुले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया
बांदल, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, संदीप आगवणे यांनी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित केले आहे. दरवर्षी ३० ते ४५ दिवस रेशीम महाअभियान कालावधीत शेतकऱ्यांना नोंदणीची संधी असते. पंधरा दिवसांचे प्रशिक्षण रेशीम संचालनालयातर्फे घेण्यात येते. त्यांना आठशे अंडीपुंजासाठी वर्षाला ७५ टक्के अनुदान देण्यात येते. कोष तयार झाल्यानंतर किलोला ३०० रुपयांच्या आत दर मिळाल्यास प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्यात येते.

Silk Farming
Silk Farming : रेशीमला आला 'सोन्या'चा भाव...

गटाचे रेशीम साहित्य विक्री केंद्र

रेशीमशेतीत प्रामुख्याने जाळी, चंद्रिका, पेपर, चुना, ब्लिचिंग पावडर, ट्रे असे विविध साहित्य लागते. अनेक वेळा शेतकऱ्यांना ते वेळेवर मिळत नाही. या अडचणी येऊ नयेत म्हणून गटाने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत संकल्प रेशीम शेतकरी गट` नावाने २०१९ मध्ये साहित्य विक्री केंद्र सुरू केले.
त्यास चांगला प्रतिसाद असून नगर, पुणे, सोलापूर भागांतील शेतकरी येथून खरेदी करतात.
महिन्याला सुमारे चार लाख रुपयांपर्यंत विक्री उलाढाल होत आहे.

पशुखाद्य निर्मिती

गटामार्फत पूरक साधन म्हणून पाच-सहा महिन्यापूर्वी गावातच ‘कॅटल फीड मिल’ उभारली आहे. येथे पशुखाद्य प्रक्रिया केली जाणार आहे. दुभत्या जनावरांसाठी मका भरडा तयार करून ५० किलो बॅगेच्या माध्यमातून गटाच्या नावाने विक्री होणार आहे. प्रक्रियेसाठी आवश्यक धान्याची खरेदी केली आहे.


आमचा पट्टा कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे उभारून कमी पाण्यात तुती लागवड केली
आहे. कृषी विभागाचे साह्य घेऊन सुमारे २० शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगर मार्केट व उत्कृष्ट रेशीम उत्पादकांकडे भेटी देण्याचे नियोजन आहे.
संजय गाडेकर, अध्यक्ष, रेशीम उत्पादक गट, साबळेवाडी
९४२३५८४२५९

पूर्वी ऊस, कांदा घ्यायचो. त्या तुलनेत एक एकरात चार बॅचेसमधून उत्पादन घेत रेशीम कोषनिर्मितीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.
विनोद गुळमकर,
साबळेवाडी ८७६६७१५०७०

कोष उत्पादनापर्यंत मर्यादित न राहता चॉकी, रिलिंग, ट्विस्टिंग, रेशीम वस्त्रनिर्मिती आदी उपक्रम
गावातच सुरू करून उद्योगाच्या सर्वांगीण वाढीस चालना देण्याचे प्रयत्न आहेत.
संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com