Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : वणी (जि. यवतमाळ) येथील आनंद व आशिष या काळे बंधूंनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या डाळ मिल उद्योगात संपूर्ण तालुक्यात नाव कमावले आहे. अर्ध स्वयंचलित पद्धतीची डाळमिल, त्यातून तूर, हरभरा डाळनिर्मिती तसेच गव्हाचे क्लिनिंग- ग्रेडिंग कस्टमाइज्ड’ यंत्र वापरून उद्योगाला आधुनिक रूप दिले आहे.
Anand and Ashish Kale
Anand and Ashish KaleAgrowon

Development of Agriculture Industry : यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्‍यातील डाळ चवीसाठी देशभरात ओळखली जाते. या भागातील मातीचा गुणधर्म डाळीत उतरतो असे त्याचे महत्त्व आहे. सन १९८० च्या दशकात या भागात सुमारे पाच व्यावसायिक डाळ मिल होत्या. पैकी सध्या एकच सुरू आहे. वणी गावातील काळे कुटुंब या व्यवसायात तीस वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

त्यांची वडिलोपार्जित २५ एकर सामूहिक शेती आहे. सध्या आनंद व आशिष हे काळे बंधू शेती व प्रक्रिया उद्योग पाहतात. कपाशी, सोयाबीन, भाजीपाला यांच्यासह एक एकर शेडनेट उभारून काकडी, पालक, टोमॅटो आदी पिके ते घेतात. ठिबक सिंचनासह ट्रॅक्‍टरचलित अवजारे, पॉवर टिलर आदी यांत्रिकीकरण केले आहे.

डाळ मिल उद्योगाची सुरुवात

आनंद यांचे वडील वसंतराव यांचा घाऊक धान्य विक्री व्यवसाय होता. पावसाळ्यात गावांशी संपर्क तुटायचा. त्यामुळे मोठ्या बाजारातून धान्य खरेदी करून ते शेतकऱ्यांना विकत. उन्हाळ्यात शेतकरी बैलबंडीने गहू, तूर, हरभरा घेऊन जात व वर्षभराच्या धान्याची सोय करीत. या व्यवसायाच्या जोडीला प्रक्रिया उद्योगही असावा असे वसंतरावांना वाटले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्या काळात विकसित केलेली ‘मिनी डाळ मिल’, अर्थात सुरुवातीचे एक एचपी क्षमतेचे यंत्र त्यांनी १९८७ मध्ये खरेदी केले. त्याद्वारे तूर, हरभराडाळ ते शेतकऱ्यांना तयार करून देऊ लागले. या यंत्रणेत मजूरबळ, शारीरिक श्रम, मजुरीखर्च या गोष्टी अधिक होऊ लागल्या. पुढे दोन एचपी क्षमतेची व पुढे सात एचपी क्षमतेची मिनी डाळ मिलची सुधारित आवृत्ती विकसित झाली. काळेही व्यवसायात ‘अपग्रेड’ झाले. त्यांना या यंत्रांचा पुरेपूर वापर सुरू केला.

Anand and Ashish Kale
Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

उद्योग वळला स्वयंचलित यंत्राकडे

तीस वर्षांपासून विविध स्थित्यंतरे व अनुभव घेत काळे यांनी चिकाटी व जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवला. आज त्यांनी तूर व हरभराडाळ तयार करणारे वीस एचपी क्षमतेचे अर्ध स्वयंचलित यंत्र आपल्या गरजेनुसार (कस्टमाइज्ड) तयार करून घेतले आहे. ते चालविण्यासाठी केवळ एक मनुष्य पुरेसा ठरतो.

त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात मोठी बचत झाली आहे. ताशी दोन टन प्रक्रिया अशी क्षमता असली, तरी सद्यःस्थितीत एक टनापर्यंत प्रक्रिया होते. उद्योगासाठी ३० बाय ३० फूट आकाराचे शेड उभारले आहे. त्यासाठी सात ते आठ लाख रुपये, तर यंत्रासाठी १२ लाख रुपये खर्च आला आहे. पूर्वीच्या प्रक्रिया उद्योगातून मिळालेल्या नफ्यातूनच व्यवसायाचा आधुनिक विस्तार करणे शक्य झाले.

Anand and Ashish Kale
Success Story : शेतीच्या नोंदवहीमुळे झाली यशस्वी वाटचाल

...अशी होते प्रक्रिया

तुरीबद्दल प्रातिनिधिक सांगायचे तर डाळ निर्मितीची चार दिवसांची ही प्रक्रिया असते. सुरुवातीला प्रति एक क्‍विंटल तुरीमागे साडेसातशे मिली तेल आणि दोन ते तीन लिटर पाणी प्रक्रिया होते. ही तूर मोठ्या हॉपर्समध्ये ठेवण्यात येते. त्यानंतर ड्रायर व त्यानंतर डाळ मिल- रोलरची प्रक्रिया होते. यात छिलटा वेगळा होतो व अंतिम डाळ तयार होते. प्रति क्विंटल तुरीवर प्रक्रिया करून ६८ ते ७० किलो डाळ, २८ किलो छिलटा, तर चार किलोपर्यंत तुकडा मिळतो. यातील उपपदार्थ काळे शेतकऱ्यांनाच देऊन टाकतात.

हरभरा व तूरडाळ निर्मितीचा व्यवसाय सुमारे चार- पाच महिने चालतो. या कालावधीत एकूण सुमारे १२०० क्‍विंटल मालावर प्रक्रिया होते. वणी तालुक्यातील जवळपास सर्व गावांमधील ९० टक्के तूर, हरभरा उत्पादक आपल्याकडूनच डाळनिर्मिती करून घेत असल्याचे आनंद सांगतात.

गव्हासाठीचे ‘कस्टमाइज्ड’ यंत्र

व्यावसायिकतेचा आदर्श सांगणाऱ्या काळे यांनी गव्हाचे क्लिनिंग ग्रेडिंग युनिटदेखील खास गरजेनुसार बनवून (कस्टमाइज्ड) घेतले आहे. ते सांगतात, की या भागात गव्हाखालील क्षेत्र कमी आहे. मजुरांकरवीच काढणी होते. मळणी यंत्रातून गहू काढल्यावर त्यात खडे व अन्य अवशेष राहू शकतात.

त्यामुळे गहू स्वच्छ करून देण्यासाठी आधुनिक यंत्र तयार करून घेतले. १५० रुपये प्रति क्‍विंटल असा दर त्यासाठी घेण्यात येतो. वणी तालुक्‍यात अशा प्रकारचे हे एकमेव यंत्र असून एकूण एक हजार क्‍विंटलपर्यंत गव्हावर ही प्रक्रिया होते. वणी येथे काळे यांचे घाऊक धान्य विक्री केंद्रही आहे. तेथूनही डाळींची विक्री होते. दर्जा चांगला असल्याने ग्राहकांची मागणी असते.

आनंद काळे, ९८२२६४२२५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com