
Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्यानजीक वडोली निळेश्वर हे सुमारे २५०० लोकसंख्येचे गाव आहे. येथील बाळासाहेब श्रीरंग पवार यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांची १४ एकर शेती आहे. पूर्वी हा भाग दुष्काळी असल्याने जिरायती शेतीच ते करायचे.
सन २००५ मध्ये आरफळ योजनेअंतर्गत ‘कॅनॉल’च्या माध्यमातून पाणी आले. मग शेतीला टप्प्याटप्प्याने बागायती स्वरूप देण्यास व जमीन ओलिताखाली आणण्यास सुरुवात केली. विहीर बांधली. त्याच्या पाणीपातळीत वाढ झाली.
शेतात पाणी खेळू लागले. आज बाळासाहेब वयस्कर झाले आहेत. त्यांचे सुनील, अविनाश, नीलेश हे तीन मुलगे शेतीची जबाबदारी पाहतात. चुलत बंधू किशोर अशोक पवार नारळाचा ठोक व्यवसाय करतात. सुनील सह्याद्री साखर कारखान्यातील नोकरी सांभाळून शेती पाहतात.
प्रवाह ओळखून शेतीत बदल
सुनील व त्यांच्या बंधूंना मजूरसमस्या जाणवत होत्या. त्यामुळे कामे वेळेत होत नव्हती. अपेक्षित उत्पादन वाढ मिळत नव्हती. सध्याचा प्रवाह आधुनिक तंत्रज्ञानाचा व यांत्रिकीकरणाचा आहे हे समजून त्यानुसार पाऊल टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी व मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. खर्चाचा आकडा लक्षात घेऊन व त्यावर नियंत्रण ठेऊन उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले. जमिनीच सेंद्रिय कर्ब तसेच सुपीकता वाढविण्यावर भर दिला.
सुधारित व्यवस्थापनातील मुख्य बाबी
दरवर्षी किमान चार एकर आडसाली उसाची व को ८६०३२ वाणाची लागवड.रोपे पद्धतीने लागवड. आष्टा येथील नर्सरीतून रोपे आणून पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड.यंदा दोन ओळींतील अंतर सहा फूट ठेवले आहे. या बदलामुळे पिकास सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळण्यास मदत झाली आहे.
लागवडीपासून १५० दिवसांनी व त्यानंतर ६० दिवसांनी पाचट काढून त्याचा सरीत खत म्हणून होतो वापर. एकरी युरिया दोन पोती व सिंगल सुपर फॉस्फेट दोन पोती असा पाचट कुजविण्यासाठी वापर.
कारखान्याकडील कंपोस्ट, शेणखत तसेच पोल्ट्रीखताचा वापर.
काळ्या रानात फक्त खोडव्याचे पीक घेतले जाते. खोडव्यानंतर हळद, आले आदी पिके घेऊन फेरपालट केली जाते. ‘रोटेशन’ पद्धतीने वेगवेगळ्या प्लॉटमध्ये लागवडीचे नियोजन असल्याने जमिनीची सुपीकता ठेवण्याचा होतो प्रयत्न. हरभरा पाल्याचाही खत म्हणून होतो वापर.
मिळतेय उच्चांकी उत्पादन
सुधारित व्यवस्थापानातून सुनील यांनी एकरी ८०, ९० ते शंभर टन उत्पादनापर्यंत पल्ला गाठला. सन २०२१ मध्ये एकरी १२४ टन, तर मागील वर्षी सर्वाधिक १२८ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी मिळवले आहे. उत्पादन खर्च किमान सव्वा लाख रुपये होतो. खोडव्याचे ५५ ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. कारखान्याकडून प्रति टन ३१०० रुपयांच्या आसपास दर मिळतो.
हळद, आलेही यशस्वी
आले व हळदीचे दरवर्षी एक ते दीड एकरांत सातत्य राखले आहे. हळदीची मेमध्ये लागवड होते. त्याच दरम्यान त्यात मधुमक्याचे (स्वीटकॉर्न) आंतरपीक घेण्यात येते. जुलैच्या दरम्यान त्याची कणसे विक्रीयोग्य होतात. एकरी चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास प्रति टन १७ हजार रुपये दर बांधावर मिळतो. या आंतरपिकातून मुख्य पिकाचा भांडवली खर्च निघून जाण्यास मदत होते.
त्याबरोबर ४ ते ५ जनावरांसाठी मुरघास म्हणूनही मक्याचा पाला उपयोगात येतो. आले, हळदीचा पालाही न जाळता तो जमिनीत कुजवला जातो. हळदीचे एकरी ३५ ते ४० क्विंटल (वाळवलेले) तर आल्याचे २० ते २१ टनांपर्यंत उत्पादन मिळते. हळदीला प्रति क्विंटल १२ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळवला आहे. आल्यासही मागील वर्षीपर्यंत चांगला दर होता. यंदा तो खूपच खाली घसरला आहे. मात्र तरीही या पिकांमध्ये कायम सातत्य ठेवत असल्याने पुढे त्याचा निश्चित फायदा होत असतो, असे सुनील यांनी सांगितले.
शेतीतून प्रगती
पवार यांनी शेतीच्या आधारे कौटुंबिक प्रगती केली आहे. ट्रॅक्टरसह सर्व अवजारे, त्यासाठी मोठे शेड, चारचाकी वाहन आदी सामग्री आहे. चार हजार चौरस फूट आकाराचे घराचे बांधकाम सुरू आहे. सर्व मुलांच्या शिक्षणाला शेतीतील उत्पन्नाचा आधार आहे. सर्व जमा- खर्च लिहून ठेवण्यात येतो. सुनील यांचे वडील बाळासाहेब यांना महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अनिल ढोले यांचे शेतीत मार्गदर्शन होते. पवार कुटुंब ॲग्रोवनचे नियमित वाचकही आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.