फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले सक्षम

केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश नामदेवराव पांढरे यांनी आपल्या २२ एकर शेतीपैकी सुमारे १२ एकरांत फळबागकेंद्रित शेती केली आहे. पेरू व डाळिंब ही त्यांची मुख्य पिके असून, त्यात काही वर्षांपासून सातत्य ठेवले आहे.
Guava cultivation
Guava cultivation
Published on
Updated on

केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश नामदेवराव पांढरे यांनी आपल्या २२ एकर शेतीपैकी सुमारे १२ एकरांत फळबागकेंद्रित शेती केली आहे. पेरू व डाळिंब ही त्यांची मुख्य पिके असून, त्यात काही वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. याच पिकांपासून शेतीचे अर्थकारण त्यांनी मजबूत केले आहे. पारंपरिक शेतीच्या तुलनेत त्यातून मिळणारे उत्पन्न निश्‍चितच आश्‍वासक असल्याचे ते सांगतात.  

बुलडाणा जिल्ह्यात खरीप, रब्बी पिकांबरोबरच फळबागांचेही क्षेत्र चांगल्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली, बुलडाणा तालुक्यांत पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या हे क्षेत्र तीनशे हेक्टरपेक्षा अधिक आहे. पेरूसाठी बाजारपेठ, तसेच स्थानिक पातळीवरून व्यापारी खरेदी करीत असल्याचा  फायदा या पिकाला होतो. याचमुळे शेतकरी पेरू लागवडीसाठी पुढे येत आहेत.  चिखली तालुक्यातील केळवद येथील गणेश नामदेवराव पांढरे यांची सुमारे २२ एकर शेती आहे. त्यातील सुमारे १२ एकर क्षेत्र त्यांनी फळबागांना दिले आहे. पारंपरिक शेती करताना काही क्षेत्रांत केलेले पीक बदल हे यशस्वी होण्यासाठी पूरक ठरू शकतात याचा अनुभव ते पेरू व डाळिंब या त्यांच्या मुख्य पिकांमधून घेत  आहेत. शेतीचे आर्थिक नियोजन चांगले होण्यासाठी हीच दोन पिके फायदेशीर ठरल्याचे ते सांगतात. दोन हेक्टरमध्ये मिडो ऑर्चर्ड पद्धतीने २०१२ मध्ये त्यांनी  पेरूच्या ‘जी विलास’ वाणाची लागवड केली. पेरूची थेट विक्री न करताना दरवर्षी हुंडी पद्धतीने व्यापाऱ्यांना बाग  दिली जाते. त्यामुळे काढणीच्या दरम्यान व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो असे ते सांगतात.  दोन वेळा छाटणी आर्थिक उत्पन्न चांगले मिळवायचे तर दर चांगले साधले पाहिजेत, त्या दृष्टीने मेअखेरीस एकदा व ऑगस्टमध्ये अशा दोन वेळा छाटणी घेतील जाते. पहिल्या छाटणीच्या उत्पादनाला योग्य दर मिळाला नाही, तर नंतरच्या छाटणीच्या उत्पादनाला चांगला दर मिळण्याची शक्यता असते. हुंडी पद्धतीचा वापर असला तरी व्यापाऱ्यांकडून अशावेळी चांगली रक्कम मिळते, असे पांढरे सांगतात. 

डाळिंबात राखले सातत्य एकेकाळी विदर्भात डाळिंबाच्या बागा झपाट्याने वाढत होत्या. अनेकांनी प्रति एकरी चांगले उत्पादन घेतले. परंतु कालांतराने डाळिंबाची शेती विदर्भातून कमी झाली. सध्या बोटावर मोजण्याइतक्याच डाळिंबाच्या बागा दिसून येतात. व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च व तुलनेने मिळत नसलेले उत्पादन, उत्पन्न यामुळे अनेकांना बागा काढाव्या लागल्या. मात्र हे पीक टिकवण्यामध्ये  पांढरे यांचे नाव घेता येते. बाग काढणे दूरच पण नव्याने ते लागवड करीत आहेत. आता जुनी व नवी मिळून दोन  हेक्टरवर म्हणजे अडीच एकरांत बाग उभी आहे. 

हमीच्या उत्पन्नासाठी एकच बहर विदर्भात डाळिंबाची शेती सुरू झाल्यानंतर अनेकांनी वर्षातून किमान दोन बहर घेण्यास सुरुवात केली. पांढरे यांनी मात्र वेगळा विचार करताना आर्थिक नियोजन हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. सततच्या बहरांमधून नुकसानीचा धोका पत्करण्यापेक्षा दरवर्षी डिसेंबरमध्ये बहर घेण्याचे ठरवले. या हंगामाची फळे जून-जुलैच्या दरम्यान बाजारात येतात. या काळात अन्य बहरांपेक्षा अधिक दर मिळतात असे त्यांनी सांगितले. व्यवस्थापनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो. झाडांना ताण कमी पडून फळधारणा चांगली होते. 

विक्रीचे नियोजन पांढरे यांच्याकडे अनुभव तयार झाल्याने डाळिंबाची विक्री व्यवस्था चांगल्या प्रकारे पाहतात. सोलापूर, राहाता तसेच जवळच्या इंदूर बाजारपेठेत बॉक्समध्ये पॅकिंग करून डाळिंब विक्रीस नेतात. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांसोबत संपर्क निर्माण झाला आहे. अलीकडील काळात किलोला २५, ३५ ते ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र नजीकच्या बाजारपेठेत मालविक्री तरीही किफायतशीर वाटत असल्याचे ते सांगतात. 

व्यावसायिक पिके  पेरूची नवी, जुनी मिळून सुमारे २२००, तर डाळिंबाची ७०० पर्यंत झाडे आहेत.  या व्यतिरिक्त खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक असते. त्यातून एकरी आठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. रब्बीतील हरभरा एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन देतो. फळबांगाशिवाय या दोन मुख्य पिकांचे उत्पन्न वर्षभरातील शेती अर्थकारणाला मोठी जोड देते. अजूनही पूरक उत्पन्नासाठी आंबा, हनुमान फळ, लिंबू व अन्य फळझाडे लावली आहेत. यामुळे उत्पन्नाचा स्रोत वर्षभर सुरू राहील असे नियोजन असते. फळबागांचे सिंचन ठिबकद्वारे होते. पाण्याचा काटेकोर वापर कसा होईल यावर कटाक्ष राहतो.

शेतीसाठी गायींचे पालनपोषण  शेतातील खर्च कमी करणे म्हणजे एकापरिने फायदा वाढवण्यासारखेच असते. रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून शेणखत व गोमूत्राचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने पांढरे यांनी दहा गीर गायींचे संगोपन केले आहे. बुलडाणा-चिखली मार्गाला लागून असलेल्या शेतात त्यांचा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंपासून १० ते १५ लिटर दूधही मिळते. 

मोठा आर्थिक आधार  पेरूच्या वर्षभरातील एकूण क्षेत्रातील उत्पनाबाबत बोलायचे तर २०१६-१७ मध्ये दोन लाख, २०१७-१८ मध्ये साडेतीन लाख, २०१८-१९ मध्ये साडेपाच लाख व २०१९-२० मध्ये साडेसात लाख रुपयांपर्यंत अर्थप्राप्ती झाली. डाळिंबानेही अशाच प्रकारे साथ दिली आहे.  सन २०१७-१८ मध्ये एकूण १४०० क्रेट उत्पादन, ५५ रुपये प्रति किलो दरासह ९ लाख रुपये उत्पन्न त्यांनी मिळाले. सन २०१८-१९ मध्ये सुमारे पावणेसात लाख रुपये, तर २०१९-२० मध्ये साडेसहा लाख रुपये उत्पन्न या पिकातून मिळाले. 

अर्थकारण सुधारले, प्रगती झाली  

गणेश पांढरे दहावीपर्यंत शिकलेले आहेत. मात्र वर्षभरात विविध पिकांच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक नियोजनातून त्यांना मुलांना उच्चशिक्षण देणे शक्य झाले. त्यांचा मोठा मुलगा पवन हा कृषी पदवीधर, एमबीए झाला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता पवन यांनी कृषी सेवा केंद्र व ट्रॅक्टर विक्री व्यवसाय सुरू केला आहे. मुलगा दीपक बारावीपर्यंत शिकला आहे. मुलगी भाग्यश्री बीएएमएस होऊन वैद्यकीय सेवेत कार्यरत झाली आहे. शेतीतील कामांसाठी दररोज पाच ते सहा मजूर तैनात असतात. तर हंगामात १० ते १२ मजूर उपलब्ध असतात. जेसीबी यंत्रही घेतले आहे. 

-  गणेश पांढरे, ९४२३३३८५७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com