Poultry Management : उन्हाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन

Poultry Farming : उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात. त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकार क्षमतेवर होतो. यावरील उपाययोजना या लेखातून पाहुयात.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

डॉ. आर. सी. कुलकर्णी

Poultry Industry : विशेषतः मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत कोंबड्यांच्या व्यवस्थापनात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात.

कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २३ अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे. पण कोंबड्या २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकतात. कोंबड्या उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात त्याला पॅंटिंग (धापणे) म्हणतात.

उन्हाळ्यात प्रत्येक वेळी त्यांना शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पॅंटिंगचा आधार घ्यावा लागतो. त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकार क्षमतेवर होतो.

उष्माघाताची लक्षणे

उन्हाळ्यातील वातावरणातील तापमान वाढल्यानंतर कोंबड्यांना उष्णतेचा त्रास वाढतो. त्यानंतर ताण पडल्यावर कोंबडी जोरजोराने श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. श्वसन मार्ग, कातडी, व पोटाचे स्नायू याकडे रक्ताचा पुरवठा वाढतो.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.

उष्णतेचा त्रास होऊन हगवण लागते. त्यामुळे शरीरातील आवश्यक इलेक्ट्रोलाइट निघून जातात. त्यामुळे कोंबडी खूप कमजोर आणि क्षीण बनते.

विष्ठेमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने तूस/गादी जास्त ओली होते. गादीमधील अमोनियाचे प्रमाण वाढते. त्यामुळे श्वसननलिकेचा त्रास उद्भवतो.

उष्माघाताच्या त्रासामुळे कोंबड्या शांतपणे बसून राहतात. त्यांच्यात मंद व सुस्तपणा दिसून येतो.

Poultry Farming
Goat Poultry Farming : शेळी, कुक्कुटपालनावर भर द्यावा : डॉ. भिकाने

रोगप्रतिकारक्षमता कमी होते. जास्त उष्माघातामुळे मरतुकीचे प्रमाण वाढते.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता कमी होते. वजनात घट होते.

कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून बसतात.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी, थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात. दम लागल्याने तोंडाची उघडझाप करून धापा टाकतात.

त्वचा रखरखीत होते, रंगामध्ये बदल दिसून येतो. अंड्याची गुणवत्ता कमी होते.

तापमानाचा परिणाम

१८ ते २१ अंश = वाढीसाठी सोईस्कर तापमान.

२२ ते २५ अंश = हे तापमान त्रासदायक नसते. परंतु खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.

२६ ते ३० अंश = दिवसभरात खाद्य खाण्याचे प्रमाण घटते. त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागतो.

३१ ते ३५ अंश = उष्माघाताचा त्रास वाढतो. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडाने श्वास घेतात.

३५ अंश = हे तापमान खूप हानिकारक असते. मरतुक होण्याची शक्यता वाढते.

Poultry Farming
Poultry Business : कोकणात अनुकूल तंत्रातून यशस्वी पोल्ट्री व्यवसाय  

उपाययोजना

उन्हाळ्यात पाणी पिण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शुद्ध व थंड पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.

उन्हाळ्यात थोडी जास्त मोकळी हवा उपलब्ध करून द्यावी. शेडमधील संख्या इतर ऋतूपेक्षा कमी ठेवावी.

शेडमधील कामे पहाटे सकाळी पूर्ण करावीत. उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत शेडमधील कामे टाळावीत.

पिण्याच्या पाण्यातून जीवनसत्त्व अ, क आणि ई पुरवावीत. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहील.

क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करावा. त्यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील.

पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुपटीने वाढवावी.

लसीकरण पहाटे किंवा रात्रीच्या वेळी करावे.

व्यवस्थापन

उन्हाळ्यात खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने काटेकोरपणे पालन करावे.

उन्हाळ्यात कोंबड्या चार आठवड्यांच्या झाल्यावर त्यांना दुपारच्या वेळेत खाद्य देऊ नये.

उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत खाद्य भांडी उंचीवर ठेवावीत.

उन्हाळ्यात खाद्य अन्नघटक प्रथिने, अमिनो आम्ल आणि मेदयुक्त असावे. त्यामुळे कोंबडी कमी खाद्य खाऊन जास्तीत जास्त अन्नघटक मिळवते.

उन्हाळ्यातील खाद्य घटकांत तेलाचा वापर अधिक प्रमाणात करावा. खाद्यात ऊर्जेचे प्रमाण १८० ते १५० किलो कॅलरीने कमी करून अमिनो आम्ल, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा वापर अधिक प्रमाणात करावा.

अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा (७५० ते १००० ग्रॅम प्रति टन) या प्रमाणात वापरावा. त्यामुळे अंड्याचे कवच मजबूत राखण्यास मदत होईल.

मार्बलची तुकडे/ शिंपला चुरा संतुलित खाद्यावर दिवसातून एक वेळेस पसरावा. त्यामुळे अंड्याची गुणवत्ता राखता येईल.

शेडची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी, जेणेकरून थेट ऊन येण्याचे प्रमाण कमी होईल. हवा खेळती राहण्यासाठी बाजूभिंती आणि मध्यभागाची उंची जास्तीत जास्त ठेवावी. छत शक्यतो ॲसबेसटॉस पत्र्याचे असावे.

शेडच्या रुंदीच्या भिंतीस घराबाहेर हवा टाकणारे पंखे बसवावेत.

शक्य असल्यास छतावर उष्णतारोधक आवरण बसवावे. वाळलेले गवत पसरल्याने वातावरण थंड राहील.

शेडच्या आजूबाजूला झाडे असावीत. त्यामुळे सभोवतालचे वातावरण थंड राहाते. तापमान कमी राखण्यास मदत होईल.

बारदान बाजूच्या भिंतीवरील जाळीस लावून ओली करावीत. असे करताना शेडमधील आर्द्रता वाढणार नाही आणि तूस ओला होणार नाही याची काळजी घ्यावी.

छतावर स्प्रिंकलर्स लावावेत. जेणेकरून शेडमध्ये थंडावा राहील.

शेडमध्ये फॉगर्स बसवावेत. त्यामुळे तापमान कमी राखण्यास मदत होईल.

पिण्याचे पाणीपुरवठा करणारी टाकी शेडमध्ये बसवावी. जर बाहेर टाकी असेल तर त्यास बारदानाच्या साह्याने गुंडाळून त्यावर थंड पाणी मारावे.

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com