Yashogatha : शंकरपूर-बोरुडी येथील अभंग बदामराव शेवाळे व त्यांचे बंधू केदार शेवाळे यंदा तब्बल ३४ एकरांवर तुरीचे पीक घेत आहेत. जवळपास ४० एकर उसाचे पीक काढून ते तुरीकडे वळले आहेत. ‘बीडीएन-७११’ या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या वाणापासून तूर लागवडीने त्यांनी सुरुवात केली. अलीकडच्या दोन वर्षांत तुरीचे बागायती वाण घ्यायचे म्हणून संपूर्ण क्षेत्रावर गोदावरी (बीडीएन २०१३ - ४१) या वाणाची पेरणी व लागवड ते करतात. तूर वगळता इतर शेतीत त्यांच्याकडे मोसंबी २४ एकर, चिकू ३ एकर, आंबा ३ एकर, आले १० एकर, कपाशी ८ एकर अशी पीक आहेत. सिंचनासाठी जायकवाडी जलाशयावरून पाइप लाइन केली आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणण्यात यश आले.
...असे वाढविले तुरीचे क्षेत्र व बदलले वाण
जवळपास ५ वर्षांपासून अभंग शेवाळे व त्यांचे बंधू केदार शेवाळे तूर शेती करत आहोत. सुरुवातीला त्यांनी पाच एकरांवर बीडीएन ७११ या वाणाची लागवड केली. अलीकडे या वाणात मर जास्त होऊ लागल्याने बागायती गोदावरी (बीडीएन २०१३ - ४१) वाणाकडे ते वळले. आता तूर सलग २२ एकर व आंतरपीक म्हणून १२ एकर तुरीचे पीक ते घेतात.
१) मशागत ः एप्रिलमध्ये नांगरट करून शेत तापवले जाते. जूनमध्ये रोटाव्हेटर मारून सरी सोडल्या जातात. पाऊस पडल्यावर टोकण पद्धतीने लागवड केली जाते.
२) पेरणी ः पारंपरिक शेतीत साधारणतः पाच फुटांवर तूर पिकाची पेरणी केली जायची. अलीकडील दहा वर्षांत ते बैलचलित शेतीपासून ट्रॅक्टरकडे वळले आहेत. छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने पाच फुटांवर सरी पाडून तुरीची लागवड केली जात होती. मात्र आता सुधारित वाणांचा स्वीकार केल्यापासून शेवाळे बंधूंनी ८ फूट बाय १.५ फूट अंतरावर लागवड करणे सुरू केले आहे.
३) खत व्यवस्थापन ः कमी खर्चाची व कमी ताणाचे पीक म्हणून शेवाळे बंधू तूर पिकाकडे पाहतात. या पिकाला खत देताना लागवडीनंतर २५ दिवसांनी डीएपी २ बॅग, एमओपी १ बॅग, फेरस सल्फेट १० किलो, झिंक सल्फेट १० किलो, सल्फर १० किलो असा पायाभूत डोस दिला जातो.
४) कीड व्यवस्थापन ः शेवाळे बंधूंच्या अनुभवानुसार तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटे अळी, पिसारी पतंग, काळी माशी, या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी दरवर्षी साधारणतः सात ते आठ फवारण्या घ्याव्या लागतात. गरजेनुसार एक ते दोन फवारण्या सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी, तर तीन ते चार फवारण्या कीड-रोग नियंत्रणासाठी ते घेतात.
५) जैविक घटकांचा वापर ः व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने जैविक घटकांच्या वापरावर त्यांचा विशेष भर असतो. कीड नियंत्रणात ट्रायकोकार्डचा वापर ते करतात. पहिल्यांदा २५ ते ३० व्या दिवशी ठिबकने ट्रायकोडर्मा प्रति एकर दोन लिटर दिल्यानंतर, त्यानंतर पुन्हा ६० दिवसांनी व नंतर ९० दिवसांनी ठिबकने तीन वेळा ट्रायकोडर्मा दिला जातो.
पुढील नियोजन
आताच्या घडीला तुरीचे पीक कायिक वाढ अवस्थेत असून, या महिनाभरात तूर पिकातील तणनियंत्रणासाठी कोळपणी करण्यात येईल. सोबतच खुरपणी व पिकाला मातीचा भर लावण्याचे काम केले जाणार असल्याचे अभंग शेवाळे यांनी सांगितले. तुरीमध्ये मर रोगामुळे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच ट्रायकोडर्माचा वापर करत असतो.
सामान्यतः जानेवारी महिन्यामध्ये तूर काढणीस येते. गेल्या वर्षी १४ क्विंटल उत्पादन प्रति एकर मिळाले आहे.
संपर्क ः अभंग बदामराव शेवाळे, ८२७५२३९२३८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.