
नाशिक जिल्ह्यातील तळेगाव वणी (ता. दिंडोरी) येथील शिंदे कुटुंबीयांनी फलोत्पादन (Horticulture) व भाजीपाला शेतीत (Vegetable Farming) पंचक्रोशीत स्वतःची ओळख तयार केली आहे. पूर्वी मालदांडी ज्वारी (Maldandi Jowar), भुईमूग, वांगी, कोबी, टोमॅटो (Tomato) आदी पिके ते घेत. सन १९९१ मध्ये रामचंद्र पंढरीनाथ शिंदे (Pandharinath Shinde) यांनी एक एकरांत द्राक्ष लागवड (Grape Cultivation) केली. त्या वेळी सिंचन स्रोत (Irrigation Source) सक्षम नसल्याने बागा जगविण्यासाठी मोठा संघर्ष वाट्याला आला. सन १९९७ मध्ये तीसगाव धरण झाल्यानंतर पाच किलोमीटरवरून सामूहिक पाइपलाइन करून पाणी उपलब्ध केले. थोरला मुलगा समाधान यांच्याकडे २००० मध्ये शेतीची जबाबदारी आली. सन २००६ पर्यंत तीन हेक्टरवर द्राक्ष लागवड झाली. शेतीत सुधारणा करताना तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची जोड दिली. सन २०११ मध्ये ट्रॅक्टर, अवजारे खरेदी केली. मजुरी खर्च, श्रम, वेळ यांत बचत होऊ लागली.
पिकांचे नियोजन
द्राक्षे-
जमिनीचा पोत, बाजारातील मागणी, कमी उत्पादन खर्च, व अनुकूल वातावरण या बाबी लक्षात घेऊन वाणांची निवड केली आहे. यात सफेद वाणात (कंसात लागवड एकर) थॉमसन (८), सोनाका (५), एसएसएन (१.५), क्लोन टू (२), सुधाकर (१), तर रंगीत वाणांत क्रिमसन (२.५), शरद (३) वाण आहेत. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने आयात केलेल्या ‘आरा १५’ या वाणाचा प्रयोगही २०१९ पासून सुरू आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने छाटणी करून १०० टक्के निर्यातक्षम उत्पादन घेण्यावर भर असतो. निर्यातदार व व्यापारी यांना विक्री होते. स्वतः विक्री करण्याचा प्रयत्न करताना बाजारपेठ समजून घेतली आहे.
टोमॅटो- पंधरा वर्षांपासून शास्त्रोक्त पद्धतीने टोमॅटो उत्पादन घेण्यात येते. नियमित लागवड पाच बाय दोन फूट तर पट्टा पद्धतीने ९ बाय २ फूट अंतरावर होते. लागवडीत झिगझॅग पद्धतीचा वापर होतो. लागवड जुलैमध्ये होऊन मार्च दरम्यान प्लॉट संपतो. रोगास कमी बळी पडणारे, फळांचा मोठा आकार, दीर्घकाळ उत्पादकता व बाजारात मागणी असणाऱ्या वाणांची निवड होते. हवा खेळती राहण्यासाठी ‘डबल’ बांबू व तारांचा वापर करून तारांची उंची सहा फुटांपर्यंत ठेवण्यात येते. हाताळणी, प्रतवारी व वजन करून बाजारपेठेत माल पाठवला जातो.
उत्पादन
गेल्या तीन वर्षांचा प्रातिनिधिक विचार केल्यास द्राक्षाचे एकरी ९ ते १० टन, तर टोमॅटोचे २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. द्राक्षात उत्पादन खर्च दोन लाखांपर्यंत, तर टोमॅटोत तो ७५ हजार रुपयांपर्यंत येतो. आगाप टोमॅटोमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन व प्रतवारी करून विक्री केल्याने दरांत फायदा आढळला आहे. एकाच व्यापाऱ्याला माल दिल्याने व्यवहार कायम ठेवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणी असताना स्वतः गुजरातमध्ये विक्री करून दरांचा फायदा घेत नुकसान टाळले. निर्यातक्षम माल प्रामुख्याने युरोपला तर स्थानिक बाजारपेठेसह देशांतर्गत सुरत, अहमदाबाद बाजारपेठेत मागणीनुसार दर ठरवून पाठवला जातो. द्राक्षाला गेल्या तीन वर्षांत सरासरी दर प्रति किलो ५०, ७५ ते ८० रुपयांपर्यंत मिळाले.
पीक व्यवस्थापनातील ठळक बाबी
-गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदींची निर्मिती.
-मातीची सुपीकता टिकविण्यासाठी ताग, धैंचा आदी हिरवळीच्या खतांचा वापर.
-द्राक्षात पान, देठ, माती परीक्षण करून खते व्यवस्थापन
-मजूरटंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक यांत्रिकीकरण, इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा वापर.
-प्रतवारीसाठी स्वतंत्र शेडची उभारणी
-कीड नियंत्रणासाठी चिकट, प्रकाश सापळे यांचा वापर
-हवामान केंद्राची उभारणी.
-अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट यापासून संरक्षणसाठी शेडनेट आच्छादन वापर
एकीतूनच यशाला गवसणी
पूर्वी कुटुंबाची अवघी १२ एकर शेती होती. पण सर्व सदस्यांनी एकत्र राहून जिद्दीने शेतीत यश मिळवीत २० एकर क्षेत्र खरेदी केले. यशाला गवसणी घातली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासून समाधान शेती पाहतात. आजही त्यांना वडील रामचंद्र, काका भाऊसाहेब, दत्तात्रेय शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत असते. भाऊ सोपान व गणेश यांचे सहकार्य असते. शेतीतूनच कुटुंबातील सदस्यांना नोकरी व व्यवसायात पाय रोवता आले.
---------------------------------------
संपर्क ः समाधान शिंदे, ९६०४८४०७८४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.