Pomegranate Farming : डाळिंब बागेने शेती झाली किफायतशीर

Fruit Crop Cultivation : मागील चार वर्षांपासून टप्प्याटप्प्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या १७ एकर क्षेत्रांवर टोमॅटो, झेंडू, पेरू, कांदा लागवड करून चांगले अर्थकारण साधले आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्‍याचा दक्षिण भागामध्ये आता उसाबरोबर डाळिंबाचे क्षेत्र वाढू लागले आहे. दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. या शिवारात बाळासाहेब जगताप यांची एकूण साडेपाच एकर शेती आहे. या शेतीचे व्यवस्थापन त्यांचा मुलगा संदीप यांच्याकडे आहे.

पुण्यामध्ये बीए पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीप यांनी काटेकोर शेती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. वडिलोपार्जित शेतीत पूर्वी बाजरी, गहू, ज्वारी, हरभरा लागवड असायची. परंतु संदीप यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अडीच एकरावर डाळिंब बागेचे नियोजन केले. सध्या त्यांच्या शेतीमध्ये डाळिंब, झेंडू, टोमॅटो, कांदा, चिकू लागवड आहे.

Pomegranate
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

डाळिंब बागेचे नियोजन

संदीप जगताप यांनी जानेवारी २०१४ मध्ये एक एकर माळजमिनीवर १४ फूट बाय १० फूट अंतराने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. प्रयोगशील शेतकरी आणि फळबाग तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे पहिल्यापासून योग्य व्यवस्थापन केले. योग्य प्रमाणात खतांचा वापर, शिफारशीनुसार कीड, रोग नियंत्रणाची उपाययोजना केली.

नोव्हेंबर २०१६ पासून डाळिंब फळांचे उत्पादन सुरू झाले. एक एकरातून सहा टन फळांचे उत्पादन मिळाले. परिसरातील बाजारपेठेत सरासरी ८५ रुपये प्रति किलो दर मिळाला. डाळिंब पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित आर्थिक नफा साधता येतो, असा आत्मविश्‍वास त्यांना आला.

त्यामुळे संदीप यांनी २०२१ मध्ये आणखी दीड एकरावर डाळिंब लागवड केली. शेतीला पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक विहीर आणि चार कूपनलिका आहेत. फळबागेला ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे. डाळिंब बागेच्या वर्षभर व्यवस्थापनाचा त्यांनी आराखडा तयार केला असून, खतांचा वापर, कीड, रोग नियंत्रणासाठी फवारणी नियोजनासाठी नोंदवही ठेवली आहे.

जमीन सुपीकतेवर भर

संदीप जगताप हे बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी सातत्याने संपर्कात असतात. तसेच विविध विषयांतील प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. माती, पाणी परीक्षणाच्या शिफारशीप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे. सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी डाळिंबाच्या प्रत्येक झाडाजवळ झेंडूच्या रोपांची लागवड केली जाते. पीकवाढीच्या टप्प्यानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर केला जातो.

डाळिंब बागेत पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचन केले आहे. दरवर्षी पाचटाचे आच्छादन केले जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारे जमिनीत ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ होत नाही. नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक झाडांना शेणखत, निंबोळी पेंड, लेंडीखत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण करून दिले जाते. गेल्या दहा वर्षांपासून बागेत तण नियंत्रणासाठी ग्रास कटरचा वापर केला जातो. त्यामुळे कापलेल्या तणाचे बागेमध्ये चांगले आच्छादन होते. मजुरीत बचत होते. पाचट तसेच कापलेल्या तणांच्या आच्छादनाचा फायदा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी होत आहे.

Pomegranate
Pomegranate Farming : गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात सातत्य

जिवामृत, सरकी पेंड स्लरी प्रत्येक पाण्याबरोबर दिली जाते. बागेमध्ये पूर्वी सेंद्रिय कर्ब ०.८० इतका होता, तो आता १.६७ झाला आहे. त्यामुळे जमीन भुसभुसीत झाली आहे. शेतीमधील दैनंदिन व्यवस्थापनामध्ये संदीप यांना वडील बाळासाहेब, आई सौ. कांताबाई आणि पत्नी सौ. मोनाली यांची चांगली मदत होते. फळबागेच्या व्यवस्थापनासाठी संदीप जगताप यांना तालुका कृषी अधिकारी राहुल माने, ‘आत्मा’चे महेश रूपनर यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असते. संदीप जगताप यांची डाळिंब फळबाग तसेच टोमॅटो, झेंडू पिकातील प्रयोगशीलतेची दखल घेत २०२४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ‘कृषिभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दर्जेदार डाळिंब उत्पादनावर भर

संदीप जगताप हे बहुतांश डाळिंबाची विक्री पुणे बाजारपेठेत करतात. सध्या दोन टप्प्यांत डाळिंब बाग असून, एकरी सरासरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते. आत्तापर्यंत प्रति किलोस सरासरी दर १०० ते १५० रुपये मिळाला आहे. यंदा जास्त पाऊस असल्यामुळे अडीच एकरांतून आतापर्यंत दहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. अजून दहा टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या बाजारपेठेत प्रति किलोस सरासरी १२० रुपये दर मिळाला आहे.

भाडे कराराने केली शेती

घरच्या साडेपाच एकर शेतीव्यतिरिक्त संदीप जगताप यांनी मागील चार वर्षांपासून टप्प्याटप्प्याने भाडे कराराने १७ एकर शेती घेतली आहे. खडकाळ आणि मुरमाड क्षेत्रावर प्रामुख्याने टोमॅटो, झेंडू, पेरू, कांदा या पिकांची लागवड आहे. सध्या तीन एकरांवर टोमॅटो, तीन एकरांवर झेंडू आणि दीड एकरावर पेरू लागवड आहे.

वर्षभर टोमॅटो आणि झेंडूची लागवड असते. या पिकांना ठिबक आणि प्लॅस्टिक आच्छादन केले आहे. शेतीच्या नियोजनासाठी वर्षभर सहा मजूर कार्यरत असतात.सध्या टोमॅटो, झेंडूचे उत्पादन सुरू झाले आहे.

आतापर्यंत टोमॅटोचे ४०० क्रेट उत्पादन झाले आहे. अजून एक हजार क्रेट टोमॅटो उत्पादन मिळण्याची आशा आहे. दसरा सणाच्या काळात पुणे परिसरातील बाजारपेठेत एक टन झेंडू विक्री झाली. सध्या बाजारपेठेत टोमॅटोला प्रति क्रेट ६०० ते ९०० रुपये आणि झेंडूला प्रति किलो सरासरी ५० ते १५० रुपये दर मिळाला आहे.

संदीप जगताप - ९८९०२४२१३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com