
Agriculture Success Story: नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी आच्छादन तंत्राचा वापर करून आपल्या बागेचे उन्हाच्या तीव्र तडाख्यापासून संरक्षण केले आहे. पैकी सातमाने येथील केवळ जाधव यांनी संपूर्ण बागेला स्ट्रक्चर व नेटचा तर सावतावाडी येथील प्रसाद संजय अहिरे यांनी झाडांसाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. त्यातून फळांचा आकार, चकाकी, रंग उत्कृष्ट मिळवून भर उन्हाळ्यात डाळिंबाची निर्यातक्षम गुणवत्ता निर्माण केली आहे.
स ध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंशांच्या पुढे गेले असून संपूर्ण शेतशिवार भाजून निघत आहे. नाशिक जिल्ह्यातही मार्चअखेरीला पारा ४१ च्या पुढे गेला. अलीकडील वर्षांत तीव्र तापमानाचा पिकांना विशेषतः फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे. शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पद्धतीने उपाय शोधताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक केवळ घेवर जाधव व बंधू प्रवीण हे त्यापैकीच एक आहेत.
डाळिंब बागेचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मागील काही वर्षांपासून बागेवर पॉलिथिन नेटचा वापर त्यांनी सुरू केला आहे. त्यांची ५० एकर डाळिंब बाग आहे. पैकी मृग बहरात १५ एकर तर हस्त बहरातील २२ एकर अशा रीतीने ३७ एकर बागेत ते नेटचा वापर करतात. मृग बहरातही नेटचा काही प्रमाणात वापर होतो.
...असे आहे आच्छादनाचे तंत्र
सुमारे नऊ वर्षांपूर्वी जाधव संपूर्ण बागेला आच्छादन न करता ते झाडापुरते मर्यादित करायचे. मात्र त्यामुळे झाड वाकून जायचे. काड्या कमी करण्याची गरज भासत असे. पारंपरिक पद्धतीने ठिबक सिंचन बांधणी असल्याने पाणी खोडाजवळ पडायचे. सर्व समस्या लक्षात घेऊन सुरू केलेल्या नेटचा वापर आता फायदेशीर ठरू लागला आहे. मृग बहराची फळे उन्हाळी हंगामात १०० ग्रॅम वजनाची झाल्यानंतर नेटचा वापर सुरू होतो. त्यासाठी द्राक्ष बागेला कायमस्वरूपी स्ट्रक्चर उभे करतात त्याच पद्धतीने डाळिंब बागेतही केले आहे.
त्यासाठी एकरी सुमारे एक लाख तीसहजार रूपये तर नेटसाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. स्ट्रक्टर पुढील अनेक वर्षे टिकते तर नेटचा वापर पुढील तीन वर्षांसाठी करता येतो. जमिनीपासून नेट सुमारे १० फूट उंचीवर आहे. स्ट्रक्चरची उभारणी केल्याने झाडांची मुळे देखील सावलीत येतात. खोडापासून दोन फुटांवरील भागात ठिबक सिंचन यंत्रणा उभारल्याने पाणी बाजूला पडते. त्यामुळे सूत्रकृमी, फ्युजारियम आदींची समस्या उद्भवत नाही.
...असे झाले आच्छादनाचे फायदे
सूर्यकिरणांची तीव्रता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली. छाटणीपश्चात कॅनॉपी चांगली तयार होते. फुलगळ व फळगळ कमी झाली. सनबर्निंग होत नाही. फळांना आकर्षक रंग, आकार तयार होऊन चकाकी येते. गारपीट झाल्यानंतर गारा नेटवर पडत असल्याने आतील झाडे, फळे सुरक्षित राहतात. बुरशीजन्य रोग व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
उत्पादन व दर
सन २०१३ नंतर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. अनेक जण बागा काढून टाकत होते. मात्र जाधव यांनी मातीतील सेंद्रिय व जैविक घटकांचे प्रमाण वाढून जमीन कसदार केली. आता - एकूण व्यवस्थापनात सुधारणा होऊन एकरी सात ते नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते. २०० ते ४०० ग्रॅमपर्यंत फळाचे वजन मिळते. जागेवरच प्रति किलो १०० ते १२० रुपये दर मिळतो. स्ट्रक्चरसाठी करावा लागणारा खर्च एकदाच (वन टाइम) येत असल्याने व नेटसाठीही तो तीन वर्षांसाठी असतो. त्या तुलनेत डाळिंबाला दर चांगले मिळून नफ्याचे प्रमाण चांगले असल्याचे जाधव सांगतात.
केवळ जाधव ७५८८५५४०६५
क्रॉप कव्हरने केले झाडांचे संरक्षण
सावतावाडी (ता. मालेगाव) येथील युवा प्रयोगशील शेतकरी प्रसाद संजय अहिरे दरवर्षी सुमारे तीन एकरांत डाळिंब घेतात. त्यांनीही उन्हाळ्यात ४५ अंशांपर्यंत जात असलेल्या तापमानापासून बागेचे नुकसान वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. अर्थात, प्रत्येक हंगामात त्याचा एकदाच फुलोरा अवस्थेनंतर फळांचे संरक्षण करण्यासाठी वापर होतो. काढणीच्या सुमारे एक महिना आधी हे कव्हर काढले जाते. अहिरे सांगतात की तीन एकरांत सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत त्यसाठी खर्च येतो.
क्रॉप कव्हरचे झालेले फायदे
अहिरे सांगतात, की दरवर्षी क्रॉप कव्हरवर खर्च करावा लागत असला तरी फळांचा दर्जा अप्रतिम असतो. ‘सनबर्न’ पासून फळाचे संरक्षण होते. फळाला आकार, चकाकी व वजन असते. त्यामुळे कव्हरमध्ये नसलेल्या बागेतील फळांपेक्षा किलोला १० ते १२ रुपये दर अधिक मिळतो. उन्हाळ्यात पाण्याची गरज तुलनेने कमी असते. एकूण फायदे पाहता आच्छादनाचे तंत्र फायदेशीर ठरत आहे. अहिरे यांना एकरी पाच टनांपासून ते सात टनांपर्यंत उत्पादन मिळते. मागील वर्षी किलोला ११२ रुपये दर त्यांना मिळाला होता.
प्रसाद अहिरे ९९७५४०७२९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.