Pomegranate Crop Management : डाळिंब पिकातील सूत्रकृमींचे व्यवस्थापन

Pomegranate Pest Disease Management : डाळिंब हे निर्यातक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळपीक मानले जाते. परंतु अलीकडच्या काळात डाळिंब पिकात अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. सतीश भोंडे, डॉ. विवेक सवडे

डाळिंब हे निर्यातक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळपीक मानले जाते. परंतु अलीकडच्या काळात डाळिंब पिकात अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातील सर्वांत धोकादायक समस्या म्हणजे मुळे खाणारी लहान पण घातक कीड सूत्रकृमी (Nematodes). नाशिकमधील डाळिंब उत्पादन क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने मध्यम ते खोल काळी माती (व्हर्टिसोल्स) आढळते, ज्यात ओलावा धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे काळी माती विविध कीटकांसाठी विशेषतः वनस्पती परोपजीवी सूत्रकृमींसाठी अनुकूल ठरते.

डाळिंब पिकाचं नुकसान करणाऱ्या महत्त्वाच्या सूत्रकृमींमध्ये रूट नॉट सूत्रकृमी (Meloidogyne spp.), रेनीफॉर्म सूत्रकृमी (Rotylenchulus reniformis) आणि सिट्रस सूत्रकृमी (Tylenchulus semipenetrans) यांचा समावेश होतो. डाळिंबामध्ये सूत्रकृमी मुळे होणारे नुकसान पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर ३० टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत परिणाम करू शकते. मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी हे डाळिंब उत्पादनासाठी जागतिक स्तरावरही मोठा धोका निर्माण करत आहेत. हे आकाराने अत्यंत लहान असल्याने साध्या डोळ्यांनी सहजतेने दिसू शकत नाहीत. त्यातच ते मातीमध्ये राहून मुळांवर गाठी करतात.

Pomegranate Farming
Pomegranate Crisis: डाळिंबाला वाढत्या उष्णतेचे ग्रहण

सूत्रकृमी म्हणजे काय?

सूत्रकृमी हे मुळांमध्ये प्रवेश करून मुळांची वाढ थांबवतात, गाठी निर्माण करतात. त्यांच्यामुळे झाडाच्या अन्नद्रव्य व पाणी शोषण्याच्या कार्यात अडथळे येतात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, पानगळ होते. उत्पादनात मोठी घट होते.

सूत्रकृमी संसर्गाची प्रमुख लक्षणे

मुळांवर अनेक लहान-मोठ्या गाठी तयार होतात. मुळे झुबक्यांसारखी दिसतात.

झाडाची पाने पिवळी पडतात.

झाडाची वाढ खुंटते.

नियमित पाणी दिले तरी दिवसा झाड वाळलेले दिसते.

संक्रमित झाडांमध्ये फांद्या व कळ्या फुटत नाहीत.

फुले पूर्ण वाढ होण्याआधीच गळून पडतात.

फळ उत्पादनामध्ये मोठी घट होते.

डाळिंब पिकात सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कसा होतो?

संक्रमित रोपवाटिकेतून रोपांसोबत - लागवडीसाठी वापरण्यात आलेली रोपे मुळातच सूत्रकृमीने बाधित असतील तर त्यांचा प्रसार शेतामध्ये अन्य झाडांपर्यंतही होतो. संपूर्ण बाग सूत्रकृमीग्रस्त हबोते.

संक्रमित मातीमुळे - पूर्वीच्या पिकांमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास आणि अशा जमिनीत कोणत्याही निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना न करता डाळिंब बागेची लागवड केलेली असल्यास नव्या झाडांवरही सूत्रकृमी आक्रमण करतात.

पाण्याचा प्रवाह - संक्रमित असलेल्या एखाद्या झाडापासून प्रवाहीत होणाऱ्या पाण्याच्या वाहतुकीतून दुसऱ्या झाडांपर्यंत पोहोचू शकतात.

Pomegranate Farming
Pomegranate Farming: क्रॉपकव्हरद्वारे उष्णतेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

व्यवस्थापन

ज्या क्षेत्रात लागवड करायची आहे, तिथे माती परीक्षण व सूत्रकृमींची तपासणी अवश्य करावी.

लागवडीच्या सुरुवातीलाच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात.

लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति खड्डा किंवा प्रति रोप द्यावे. याचे प्रमाण जमिनीच्या प्रकारावर आणि सूत्रकृमीचा प्रादुर्भावानुसार कमी अधिक करता येते.

पर्प्युरेओसिलिअम लिलॅसिनम - पूर्वीचे नाव पॅसिलोमायसेस लिलासिनस (Purpureocillium lilacinum = Paecilomyces lilacinus) १ किलो प्रति १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून घ्यावे. २ ते ३ आठवडे सावलीत ठेवून, त्यात आवश्यक ओलावा राहील या प्रकारे चांगले मुरवून घ्यावे. हे मिश्रण प्रत्येक झाडाला अर्धा ते एक किलो या प्रमाणात दर ३ महिन्यांनी एकदा द्यावे.

बागेत टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, काकडी इ. सूत्रकृमींसाठी संवेदनशील अशी आंतरपिके घेणे टाळावे. कारण या पिकांमुळे सूत्रकृमींचा प्रसारास मदत होते.

त्या ऐवजी सूत्रकृमीला प्रतिबंध करणाऱ्या झेंडू, अॅस्टर या सारख्या पिकाची लागवड करावी. झेंडूच्या मुळांतून स्रवणाऱ्या थायोफिन या नैसर्गिक रसायनामुळे सूत्रकृमींना अटकाव होते. त्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.

* वरील सूत्रकृमीनाशके ही भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या शिफारशीनुसार.

सूत्रकृमींवर प्रभावी जैव-नियंत्रण

ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जिनिअम किंवा स्युडोमोनास फ्लुरोसन्स किंवा पॅसिलोमायसेस लिलासिनस यासारखे (१×१० चा ८ घात बिजाणू प्रति ग्रॅम असलेले) जैविक घटक २०० ग्रॅम प्रति एकरी वापरावेत.

वरील जैविक घटकांचे प्रत्येकी २ किलो या प्रमाणातील मिश्रण प्रति १०० किलो शेणखत किंवा गांडूळ खत किंवा निंबोळी पेंड यासोबत मिसळून सावलीमध्ये ओलावा टिकवून मुरवून घ्यावे. असे जैवसमृद्ध मिश्रण लागवडीच्या वेळी किंवा लागवडीनंतर ५०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे वापरता येते.

ज्या क्षेत्रात सूत्रकृमींची संख्या जास्त आहे, तिथे फ्लुयोपायरम (३४.४८ टक्के एससी) ६२५ मिलि प्रति हेक्टरी ठिबक सिंचनाद्वारे किंवा आळवणीद्वारे द्यावे.

बागेत ज्या ज्या ठिकाणी सूत्रकृमीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसत आहेत, अशा ठिकाणी फ्लुयोनसल्फोन (२ जी) १० ग्रॅम प्रति हेक्टरी आळवणीद्वारे द्यावे.

वरील उपाययोजना नियमित केल्यास डाळिंब पिकातील सूत्रकृमींचे नियंत्रण प्रभावीरीत्या करणे शक्य आहे.

डॉ. सतीश भोंडे ९८२२६५०६६१

सेवानिवृत्त अतिरिक्त संचालक, नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (NHRDF), नाशिक

डॉ. विवेक सवडे ९३२५०९४३८३

(पी.एच.डी. नेट - कृषी कीटकशास्त्र असून खासगी कंपनीत कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com