
गोपाल हागे
Demand for Flowers : श्रावणानंतर व त्यानंतर प्रामुख्याने गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत फुलांना मागणी व बाजारातील आवक वाढत राहते. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबे ४० ते ४५ वर्षांपासून या शेतीत टिकून आहेत. याच पिकांवर त्यांचे अर्थकारण मुख्यतः अवलंबून आहे. पातूरच्या फुलांचा सुगंध अकोला, बुलडाणा, वाशीम आदी जिल्ह्यांत पसरत आहे.
श्रावण सरू झाल्यापासून फुलांना मागणी वाढू लागते. आजपासून गणेशोत्सव मंगलमय वातावरणात सुरू होत आहे. इथूनपुढे दसरा, दिवाळीपर्यंत बाजारात विविध फुलांची मागणी व उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू राहील. अकोला जिल्ह्यातील काही गावे फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने जिरायती शेती होते. सिंचनाची सोय असलेल्या भागांत शेतकरी पारंपारिक पिकांच्या सोबतीने भाजीपाला व फळपिकेही घेतात.
निसर्गाच्या भरवशावर असलेल्या शेतीला विविध आपत्ती, अनिश्चित बाजार दर यांचा फटका बसतो. त्यामुळेच शेतकरी अन्य नगदी पिकांकडे वळले. त्यामुळेच पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यात सिंचनाची सोय असलेले शेतकऱ्यांनी फुलशेतीला पसंती दिली. या पिकांमध्ये पातूर तालुक्याचे क्षेत्र सातत्याने अधिक राहिले आहे.
तालुक्यातील पातूर, शिर्ला, देऊळगाव आदी गावांनी ४० ते ५० वर्षांपासून फुलशेतीची परंपरा जपली आहे. झेंडू, गुलाब, शेवंती, निशिगंध, चमेली, मोगरा आदी फुले येथील शिवारांमधून पाहण्यास मिळतात. त्यातून नियमित उत्पन्नांसोबत वर्षभर रोजगाराची सोय निर्माण झाली.
मुख्य बाजारपेठ अकोला
अकोला ही फुलांची मुख्य बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. काही शेतकरी थेट बुलडाणा, वाशीम आदी जिल्ह्यांतही फुले पाठवतात. अकोला बाजारात फुलांच्या दररोज होणाऱ्या आवकेपैकी ८० टक्के माल स्थानिक शेतकऱ्यांचा असतो. काही बाजारपेठांत फुलांचा बाजार सकाळी भरत असल्याने एक दिवस आधी तोडणी केलेली फुले येतात.
अकोल्यात मात्र दुपारी दोननंतर बाजार सुरु होतो. त्यासाठी शेतकरी सकाळीच तोडणी केलेली फुले घेऊन येतात. त्यामुळे ती ताजी, टवटवीत असतात. हंगामानुसार झेंडू, गॅलार्डिया, लिली, निशिगंध, गुलाब, कुंदा, मोगरा आदींची विविधता येथे पाहण्यास मिळते.
शेतकऱ्यांचे नियोजन
गणेशोत्सवापासून फुलांची मागणी वाढण्यास सुरवात होते. या काळात फुले उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी जून, जुलैच्या दरम्यान लागवडी करतात. काही शेतकरी बिगरहंगामी फुलांना मिळणारा अधिकचा दर पाहून मेमध्येही लागवड करतात. यंदा पातूर येथील उमेश फुलारी यांनी मेमध्ये झेंडू घेतला. आत्तापर्यंत ८० ते १२० रुपये प्रति किलो दर त्यांनी मिळवला.
याच गावातील मंगेश व अरुण हे फुलारी बंधू वर्षभर चार एकरांत फूलशेती करतात. झेंडू, निशिगंध ही त्यांची प्रमुख पिके आहेत. वैभव फुलारी गुलाबाची शेती करतात. त्यांची तीन एकर शेती असून बहुतांश क्षेत्र फुलांसाठीच ते देतात.
जिल्हयात अनेक शेतकऱ्यांकडे फूलशेती खालील क्षेत्र दहा गुंठ्यांपासून एकर, दोन एकरांपर्यंत आहे. अनेक कुटुंबांनी ४० ते ५० वर्षांपासून फुलशेतीची परंपरा जपली आहे. आता तरुणपिढीकडे शेतीची सूत्रे आहेत.
प्रतिक्रिया
पातूर तालुक्यात पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला, हळद, संत्रा, मोसंबी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. एकट्या तालुक्यात फुलशेतीचे क्षेत्र १६० हेक्टरपेक्षा अधिक आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गुलाब शेतीला लाभ दिला जातो. काही शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे.
धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर
९८३४४१६०३८
पारंपारिक पिकांपेक्षा फुलशेतीला प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांच्या घरात नियमित ताजा नगदी पैसा येत आहे.
किरण दंदी, कृषी विभाग, आत्मा, पातूर
शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी शाश्वत स्वरूपाच्या योजना हव्यात. ही हंगामी शेती असल्याने पीकविम्याचे कवच मिळत नाही. काही फूलपिके शेतात दीर्घकाळ राहात असल्याने हा विचार झाला पाहिजे.
-उमेश फुलारी, फूल उत्पादक, पातूर
९७६४४०२०५३
गेल्या सहा- सात वर्षांपासून फूलशेती करीत आहे. यंदा तीन एकरात निशिगंध व अर्धा एकरात
गॅलार्डिया लावला आहे. दर चांगले मिळाले तर एकरी ८० ते ९० हजार रुपये मिळून जातात.
-वाघुजी ढगे, फूल उत्पादक
सोळा ते सतरा वर्षांपासून फूलशेती करीत आहे. यंदा दोन एकरांत निशिगंध लागवड आहे.
एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न ही शेती देऊन जाते. अकोल्यात मध्यम स्वरूपाची बाजारपेठ आहे. अजून मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास फायदा होईल.
संदीप साहेबराव चेंडाळणे, चिंचोली गणू, ता. बाळापूर
९९२१००४३००
अकोला बाजारात हर्राशी पद्धतीने विक्री होते. यामुळे चांगल्या फुलांना अधिकाधिक दर मिळवून देण्याचा प्रयत्न असतो.
प्रमोद लांजेवार, खरेदीदार, फूल मार्केट, अकोला
अकोला फूल बाजारपेठ
फुलांचे सरासरी दर रुपये प्रति किलो (प्रातिनिधीक)
झेंडू २० ते २५
गुलाब ८० ते १००
चायनीज गुलाब- ८० रुपयांचे बंडल ( प्रति२० फुलांचा गुच्छ)
निशिगंध ७० ते १००
लिली ८० ते ९०
शेवंती ४० ते ५०
-बाजारात नियमितपणे सरासरी २० ते ३० क्विंटल फुलांची आवक.
-मुख्य हंगामातील आवक ७० ते ८० क्विंटलपेक्षा जास्त.
-मालाचे चुकारे पद्धत दर आठवड्याला.
-ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत आवकेचे प्रमाण अधिक.
- गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत उलाढाल व मागणी अधिक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.