
एकनाथ पवार
Parulebazar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परूळेबाजार (ता. वेंगुर्ला) गावाने शेती- बागायती आणि प्रकिया उद्योगांतून आपले अर्थकारण उंचावले आहे. विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीने देखील गावाला प्रगतिपथावर नेले आहे. विभाग, राज्य आणि केंद्रस्तर मिळून तब्बल २४ पुरस्कारांनी गावाला गौरविण्यात आले आहे. राज्यातील विविध मान्यवरांनी भेट देत गावचा आदर्श कारभार अभ्यासून प्रशंसा केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार हे निसर्गसंपन्न गाव (ता. वेंगुर्ला) आहे. परुळे, गवाण आणि कर्ली अशा तीन महसुली गावांचे मिळून असलेल्या या गावापासून प्रसिद्ध भोगवे बीच चार किलोमीटर, तर कर्ली खाडी दोन किलोमीटरवर आहे. चिपी विमानतळही नजीक आहे. गावचे अर्थकारण शेती, पूरक आणि प्रकिया उद्योगांवर अवलंबून आहे. नोकरी, व्यवसायासाठी गावातील तरुण मुंबई किवा अन्य शहरात जाऊ नयेत म्हणून स्वंयरोजगारांचे प्रयत्न गावपातळीवर सुरू असतात.
सर्वांगीण विकास
गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ९३४ हेक्टर असून, लोकसंख्या २२२३ आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊपर्यंत आहे. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये परुळेबाजाराचा समावेश होतो. रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे, सार्वजनिक शौचालये, गटारे बांधकाम, डिजिटल शाळा अशी विविध विकासकामे ग्रामपंचायतीने केली आहेत. दिवसेंदिवस विजेचा भासणार तुटवडा लक्षात घेऊन सौरऊर्जेवर भर दिला आहे. संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार चालू शकेल अशा क्षमतेचे सौर युनिट बसविले आहे. चार शाळांपैकी दोन डिजिटल असून, दोन शाळांमध्ये सौर युनिटची उभारणी केली आहे.
विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी ‘ॲप’च्या माध्यमातून टॉकिंग टीचर ही अभिनव संकल्पना राबविली आहे. ग्रामपंचायतीची इमारत सुसज्ज आहे. सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तरुणांना व्यायामशाळा उपलब्ध करून दिली आहे. सुमारे चाळीसहून अधिक युवक त्याचा लाभ घेतात. गावात सुसज्ज वाचनालय असून, त्यामध्ये सुमारे १२ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. पंधराव्या अर्थ आयोगातून १५ लाखांचा निधी गावाला मिळाला आहे. गावातील महिलांना गावातच रोजगार मिळावा असा प्रयत्न आहे. सरपंच प्रणिती पांडुरंग आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे, अन्य सदस्य आणि ग्रामस्थांचे संघटित प्रयत्न गावाला पुढे नेत आहेत.
गांडूळ खत व सांडपाणी शुद्धीकरण
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीतर्फे कचरा संकलन, प्रक्रिया अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प उभारले आहेत. रासायनिक खतांवरील खर्च कमी करावा या उद्देशाने शेतकऱ्यांना असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य केले जात आहे. गेल्या वर्षी वीसहून अधिक प्रकल्प तयार झाले. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात आला आहे. जैवइंधन (बायोगॅस) उभारणीत गाव आघाडीवर असून,
असे ६५ युनिट्स उभारले आहेत.
मान्यवरांच्या भेटी
ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची दखल पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य आणि केंद्रस्तरावर घेण्यात आली. त्यामुळेच ग्रामविकासाच्या राबविलेल्या संकल्पना पाहण्यासाठी राज्यभरातील
मान्यवर, तज्ज्ञ, विविध जिल्ह्यांतील जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी गावाला भेटी दिल्या आहेत. यात ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, मीनाताई आमटे यांचाही समावेश आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान
विकासकामांच्या माध्यमातून गावाने अनेक सन्मान मिळवले आहेत. त्यांची झलक पुढीलप्रमाणे.
निर्मल ग्राम.
ग्रामसभा गौरव स्पर्धा
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान
यशवंत पंचायत राज (दोन वेळा)
पर्यावरण विकास रत्न
राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान
सावित्रीबाई स्वच्छता अंगणवाडी स्पर्धा
लोकराज्य ग्राम
आर आर. आंबा सुंदर गाव स्पर्धा
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान
स्मार्ट ग्राम
-आयएसओ मानांकन
शेतकरी कंपनीची स्थापना
परुळेबाजारच्या गावकऱ्यांनी वातावरण व बाजारपेठांचा अभ्यास करून आंबा, काजू, नारळ, सुपारी मिरी, कोकम आदी फळबाग लागवडीवर भर दिला आहे. गावातील जमीन चढ उताराची आहे. पंधरा ते वीस वर्षांत फळ लागवडीखालील क्षेत्र शेकडो हेक्टरने वाढले आहे. भाताचे १३ हेक्टर, आंबा ११८२ हेक्टर, नारळ-५७.७४, काजू ३१८.५९, सुपारी सात, मसाला पिके सहा अशा हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून हजारो झाडांची समृद्धी आहे. त्यांच्यापासून कोट्यवधी रुपयांपर्यंत उलाढाल गावात होते.
त्यातून गावाचे अर्थकारण उंचावले आहे. पूर्वी व्यापारी गावात येऊन नारळ खरेदी करायचे. दर तेच ठरवायचे. शेतकऱ्यांना दर ठरवता यावेत व ते चांगले मिळावेत या हेतूने गावातील ३०० शेतकरी एकत्र आले. त्यांनी श्री देव आदिनारायण शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१७ मध्ये केली. आता व्यापारी कंपनीकडून नारळ खरेदी करतात. त्याशिवाय अन्य शेतकरीही कंपनीला नारळ पुरवू लागले आहेत. त्यातून हमखास दर त्यांना मिळू लागला आहे.
प्रक्रियेतून मूल्यवर्धन
गावातील काही शेतकऱ्यांनी काजू व कोकम प्रकियेवर आधारित उद्योग सुरू केले आहेत. कोकम सोल, सरबत, आगळ अशी विविध उत्पादनाची निर्मिती त्यातून होऊ लागली आहे. काजू प्रक्रियेचे तीन तर कोकम प्रक्रियेचे दोन उद्योग उभे राहिले आहेत. गावात फार मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन होते. त्याचे सोडण वा काथ्या हे घटक वाया जायचे. त्यापासून विविध कलात्मक व उपयोगी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण ग्रामपंचायतीमार्फत महिलांना देण्यात आले. त्यातून त्यांच्या बचत गटांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. गावात महिलांचे ३६ तर ११ पुरुष शेतकरी गट आहेत. एक सहकारी सोसायटी कार्यरत आहे.
................................................
प्रतिक्रिया
गावातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण शेती- बागायती फळपिकांवर आधारित आहे. गावच्या विकासाला त्यातून दिशा मिळाली आहे. नारळ, सुपारीची रोपेही आम्ही तयार करतो. त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार झाला आहे.
प्रणिती पांडुरंग आंबडपालकर
(सरपंच)
९४०४४४२५५०
संपर्क ः प्रदीप प्रभू (प्रयोगशील शेतकरी), ९४०५२६२८४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.