
Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्याचा पूर्व भाग प्रामुख्याने दुष्काळी आहे. जिरायती पिके हाच पर्याय असतो. त्यातून मिळणारे उत्पन्नही जेमतेम असते. तालुक्यातील सायने खुर्द येथील विजय काशिराम सोनवणे यांची हीच परिस्थिती होती. त्यांनी शेती व पीकपद्धतीत बदल घडविण्यास सुरुवात केली.
सिंचनाला पहिले प्राधान्य देत २००७ मध्ये दहीकुटे बंधारा परिसरातून पाइपलाइन केली. दोन विहिरी खोदल्या. पाण्याची सक्षम व्यवस्था तयार झाल्यानंतर खरिपात मका तर रब्बी हंगामात कांदा घेण्यास सुरुवात केली. त्यातून शेतीचे चित्र बदलत गेले. काहीशी आर्थिक स्थिरता आली.
परिस्थितीने पाठ सोडली नाही
सन २०१७ व २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पुन्हा एकदा समस्यांनी घेरले. जनावरे विकावी लागली. संघर्ष बिकट होत गेला. दरम्यान, विजय यांच्या पत्नी लताबाई यांचे निधन झाले. मोठा मुलगा मोहन यास शेतीच्या जबाबदारीमुळे शिक्षण सोडावे लागले.
दरम्यान, धाकटा मुलगा धनंजयने राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो सेट-नेट परीक्षेची तयारी करू लागला. परंतु घरच्या शेतीचा पसारा पाहता त्यालाही शेतीत उतरावे लागले. आर्थिक प्रगतीचा विचार करून मित्र व नातेवाइकांसोबतच्या चर्चेतून २०१९ च्या दरम्यान शेवगा लागवडीचा निर्णय घेतला.
प्रतिकूलतेतही यश
दीड एकरात पहिल्यांदाच शेवगा घेतला. उत्पादनात यश मिळाले. पण २०२० मध्ये कोरोना- लॉकडाउनच्या संकटात ७ ते ८ रुपये प्रति किलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांना शेवगा विकण्याची वेळ आली. तोटा झाला. पण धनंजय मागे हटले नाहीत.
त्यांनी जिद्दीने हे पीक पुढे कायम ठेवले. पुढील टप्प्यात दीड एकरांत सदोष बियाण्याच्या समस्येने नुकसान झाले. फळधारणा न झाल्याने बाग काढून टाकण्याची वेळ आली. मग निवड पद्धतीने बियाणे उपलब्ध केले. येत असलेल्या प्रत्येक समस्येला जिद्दीने तोंड दिले.
अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीट अशा समस्या झेलल्या. दुष्काळात टॅंकरने पाणी विकत घेऊन बाग जगविली. पण न खचता धनंजय यांनी प्रत्येक समस्येवर उत्तर शोधले. काळ्या जमिनीत कुशल व्यवस्थापन साधून पीक यशस्वी केले. त्यात हातखंडा मिळवला. आज शेवग्याचे क्षेत्र आठ एकरांपर्यंत विस्तारले आहे.
सोनवणे यांची शेती दृष्टिक्षेपात
एकूण शेती- १६ एकर
शेवगा- ८ एकर
मिरची- दीड एकर
कांदा- चार एकर
उर्वरित क्षेत्रात चारापिके
व्यवस्थापन- ठळक बाबी
ओडिशी वाणची निवड. सुरुवातीला १० बाय ५ फूट अंतरावर लागवड. आता प्लॉट हवेशीर राहावा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान कमी राहावे व व्यवस्थापन सोपे व्हावे यासाठी १२ बाय ६ फूट अंतरावर लागवड.
बाजारातील वर्षभरातील मागणी अभ्यासून वर्षांत दोन वेळा छाटणी नियोजन. यात पहिली छाटणी जून-जुलैमध्ये. याचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबरला सुरू होते. हा हंगाम संपल्यानंतर फेब्रुवारीच्या दरम्यान दुसरी छाटणी. त्याचे उत्पादन मेमध्ये सुरू होते.
छाटणी झाल्यानंतर टाकाऊ काड्यांची यंत्राद्वारे बायोमास निर्मिती. त्यांचे झाडांच्या मुळाजवळ आच्छादन. त्यातून बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची ४० ते ५० टक्के बचत.
प्रत्येक झाडाला वर्षांतून एकदा एक पाटीभर शेणखत
फूलगळ, फूलकुज या मोठ्या समस्या. वेळोवेळी निरीक्षणे नोंदवून फवारण्या व काटेकोर सिंचनाकडे विशेष लक्ष.
लेखाजोखा
उत्पादन
नोव्हेंबर- (पावसाळी बहर) ५ ते ६ टन. पावसाळ्यात उत्पादनाच्या अंगाने आव्हाने अधिक.
या काळात शेवग्याला मागणी चांगली. दर प्रति किलो ५० ते ६० रुपये, कमाल १०० रुपर्यांपर्यंत मिळतात.
मे महिना-उत्पादन- १० ते १२ टन.
या काळात दर २५ ते ५० रुपये, तर सरासरी दर ३५ रुपयांपर्यंत मिळतात. दर कमी असले तरी उत्पादन अधिक मिळत असल्याने अर्थकारण फायदेशीर ठरते.
गुणवत्ता
मध्यम जाड, दोन फूट लांबी, हिरवेपणा अशी मालाची गुणवत्ता असल्याने स्थानिक व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. चेन्नई, हैदराबाद, कोलकता आदी ठिकाणी हा शेवगा पाठवला जातो.
संयुक्त कुटुंबाचा आदर्श
सोनवणे कुटुंब स्वतःची आठ एकर तर काका नथू सोनवणे यांची आठ एकर अशी १६ एकर शेती सांभाळते. वडील विजय यांच्यासह भाऊ मोहन, भावजय जयश्री यांचाही शेतीत महत्त्वाचा वाटा असतो. कुटुंबातील सर्व सदस्य गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. एकमेकांच्या विचारविनिमयातून शेती व कुटुंबातील निर्णय घेतले जातात. त्यातूनच प्रगती करणे शक्य झाले.
शेतीत यांत्रिकीकरण केले. बुलेट, फोर व्हीलर घेतली. पाइपलाइन केली. अडचणी येतच राहतात. मागील वर्षी बागेला माल लगडलेला असताना अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावून नेला. सुमारे चार-पाच लाखांचे नुकसान झाले. संकटे येत राहतातच. पण उपाय शोधून पुढे गेले पाहिजे असे हे कुटुंब आवर्जून सांगते. या प्रवासात काकांसह काकू शारदा यांचीही साथ व मार्गदर्शन कायम लाभले आहे.
धनंजय सोनवणे ८२०८३१८८२८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.