
Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात आनोरे (ता.धरणगाव, जि. जळगाव) हे कापसासह अळू पानांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. तालुका ठिकाणापासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या या गावातील रवींद्र महाजन यांनीही अन्य शेतकऱ्यांप्रमाणे अळू व भाजीपाला शेतीत नाव मिळवले आहे.
त्यांची दोन ठिकाणची मिळून एकूण सात एकर शेती आहे. सिंचनासाठी विहीर असून पाणी मुबलक आहे. गिरणा धरणातून पाटचारीस पाणी आल्यास विहिरीत जलसाठा जूनपर्यंत टिकतो. मात्र पाऊसमान कमी झाल्यास सिंचनाच्या अडचणी येतात. बैलजोडीही असून गोसंगोपनही केले जाते. चारा साठवणगृहही आहे.
व्यावसायिक पीक पद्धती
रवींद्र यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीची सूत्रे हाती घेतली. त्यांचे वडील भागवत बारमाही भाजीपाला शेती करायचे. हा वारसा रवींद्र यांनी जपला. शिवाय आजोबा, पणजोबांच्या काळापासून सुरू असलेली अळूची शेतीही चांगल्या प्रकारे जोपासली. दरवर्षी अळूचे पाच ते १० गुंठे क्षेत्र असते. तीन ते चार गुंठ्यांत गवती चहा, तेवढ्यात क्षेत्रात गिलके, प्रत्येकी आठ ते दहा गुंठ्यात भेंडी टोमॅटो, बांधावर किंवा विरळ क्षेत्रात गवार असते. कापसाची तीन ते चार एकरांत लागवड असते. रब्बी व काही प्रमाणात खरिपात मका असतो. फेरपालट पद्धतीने पिकांची विविधता जपली आहे.
...अशी आहे अळूची शेती
महाजन कुटुंबाने अळूचे गावरान वाण जपले आहे. दरवर्षी लागवडीसाठी त्याचाच वापर होतो. बाजारातून आणण्याची गरज भासत नाही. या अळूच्या पानांचा आकार मोठा असून त्यापासून वड्या व भाजीही करता येते. चवीसही तो चांगला असून घशाला खाजत नसल्याचे रवींद्र सांगतात.
अळूचे एका क्षेत्रातील पीक आटोपल्यानंतर त्याचे कंद काढून ते झाडाखाली झाकून साठवितात. गारवा झाडाखाली कायम राहील यावर भर देतात. त्यासाठी ओल्या तागाच्या गोण्या कंदांवर ठेवतात. दरवर्षी जून तसेच पाणी उपलब्ध असल्यास डिसेंबरमध्येही अळूची लागवड होते.
दोन ओळींत एक फूट तर दोन कंदांमधील अंतर सात ते आठ इंच असते. मक्याप्रमाणे दोन ओळीत लागवड होते. जवळपास सर्व व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीचेच असते. रासायनिक खते व कीडनाशके यांचा जराही वापर होत नाही. दोन वेळेस तण नियंत्रण करावे लागते. रवींद्र सांगतात, की या पिकाला पाण्याची शाश्वत व्यवस्था असणे आवश्यक असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी द्यावे लागते.
काढणी व विक्रीचे नियोजन
लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी काढणी सुरू होते. पुढे तीन ते चार महिने प्लॉट सुरू राहतो. एकूण सुमारे पाच ते सहा महिन्यांचे हे पीक आहे. दर आठवड्याला चार हजार ते पाच हजार पानांची काढणी व विक्री होते.
काढणीचे काम शक्यतो कुटुंबातील सदस्यच करतात. मात्र बाजारपेठेची आगाऊ नोंदणी असल्यास व पुरवठ्याचा दबाव वाढल्यास मजुरांची मदतही अशावेळी घेतली जाते. रवींद्र यांनी व्यापाऱ्यांसोबत करार केले आहेत. त्यानुसार दर निश्चित केलेले असतात.
व्यापारी बांधावर येऊन अळूची खरेदी करतात. काही वेळा काढणीचा मजुरी खर्चही व्यापारी करतात. वर्षभराचा विचार केल्यास अळूच्या पानाला शेकडा ५० ते ६० रुपये दर मिळतो. १० पानांची गड्डी असते. अशा शंभर गड्ड्या एकत्रित बांधल्या जातात. बाजारात आवक कमी असल्यास शेकड्याला ९० ते काही वेळा त्याहून अधिक दरही मिळतो.
अर्थकारण केले मजबूत
गवती चहाचे अळूसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळते. चहा लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांत तो कापणीस येतो. पुढे दोन वर्षे बिनखर्चिक तो उत्पादन देतो. बारमाही त्याची लागवड करता येते. दोन ते अडीच गुंठ्यांत एका महिन्यात २५ बंडल (प्रति बंडल १० ते १२ किलो) उत्पादन त्यापासून मिळते.
प्रति बंडल २५० ते ३०० रुपये दर मिळतो. अळूच नव्हे तर बहुतांश भाज्या सेंद्रिय पद्धतीनेच पिकवल्या जातात.गोसंगोपन असल्याने शेणखत पुरेसे असते. भेंडी व टोमॅटोस हिवाळ्यात दर बरे असतात. त्यामुळे याच काळात लागवड करून उत्पादनही साध्य केले जाते. भेंडी, टोमॅटो व गिलक्यास कमाल ४० रुपये दर मागील काळात त्या त्या हंगामात मिळाला आहे.
अळूला १० गुंठ्यांत पाच हजारांच्या दरम्यान उत्पादन खर्च येतो. निव्वळ नफा २० ते २५ हजार रुपयांपर्यंत असतो. गवती चहापासूनही १० ते १२ हजार रुपये नफा मिळतो. अन्य भाजीपालाही चांगले उत्पन्न देऊन जात असल्याने वर्षभरातील अर्थकारण मजबूत होऊन जाते. आई भटाबाई, वडील भागवत, पत्नी उषाबाई असे कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबत असल्याने मजुरांवरील मोठ्या खर्चात बचत झाली आहे.
गोसंगोपनामुळे रोजच्या दूधविक्रीतूनही काही उत्पन्न हाती पडते. शेतीला शेणखत, गोमूत्र मिळते. कृषी विभाग- आत्माचे धरणगाव येथील समन्वयक दीपक नागपुरे यांचे मार्गदर्शन रवींद्र यांना मिळते गावातील संत सावता माळी शेतकरी गटात रवींद्र सक्रिय असून त्यातून शेतीमध्ये सुधारणा, नव्या प्रयोगासंबंधी मार्गदर्शन मिळते. महाजन दांपत्याला सायली व सचिन अशी शाळेत शिकणारी मुले आहेत. त्यांच्यामुळे शेतातील श्रमांचा ताण हलका होतो.
आनोऱ्याच्या अळू पानांना उठाव
आनोरे अळू पानांच्या उत्पादनात अनेक वर्षांपासून पुढे आहे. अधिकचे श्रम या पिकात लागतात. कारण दररोज पानांची काढणी करावी लागते. त्यांना जळगाव, धरणगाव, एरंडोल, चोपडा, भुसावळ, रावेरपर्यंत मागणी असते.
अनेक शेतकरी हातविक्रीही करतात. आनोऱ्यात सुमारे ४५ एकर क्षेत्र अळूखाली असावे. गुजरातमध्ये पात्रा भजीत अळूचा मोठा वापर केला जातो. एप्रिल, मेमध्ये या राज्यात किलोवर अळू पानांना मागणी असते.
चाळीस ते ५० रुपये प्रति किलो दर त्या काळात मिळतो. गुजरातमधील सुरत, बारडोली, अहमदाबाद, बडोदा येथील बाजारांतही बारमाही मागणी असते. आनोऱ्यातील काही शेतकरी बारडोली, सुरत येथील हॉटेलचालक, अडतदारांना बारमाही अळू पानांचा पुरवठा करतात.
रवींद्र महाजन ९९२३११४७२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.