
पत्नीचे कर्करोगामुळे अकाली निधन झाले. सुखी संसार अर्ध्यावरच मोडला. आधीपासूनच सेंद्रिय शेतीकडे (Organic farming) वळलेल्या श्यामराव मोगल (कसबे सुकेणे, जि. नाशिक) मग आरोग्यदायी, सकस अन्ननिर्मितीबाबत अधिक गंभीर झाले. आज द्राक्षे, गहू, कांदा, गूळ आदींसाठी थेट ग्राहक बाजारपेठ (Consumer market) तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र फक्त पैसा नको तर पुढच्या पिढीच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे या उद्देशाने त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रबोधनही सुरू केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) म्हणजे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा हुकमीपट्टाच आहे. येथील श्यामराव सीताराम मोगल यांनी रासायनिक अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय शेतीत (Farmer) आपली ठळक ओळख तयार केली आहे. मानवी आरोग्य व पर्यावरण हिताला सर्वोच्च प्राधान्य देत केवळ उत्पादनावर (Production) भर न देता लोकांमध्येही सकस व आरोग्यदायी अन्नाबाबत जागृती करण्यास सुरुवात केली आहे.
सुरुवातीची वाटचाल
महाविद्यालयीन जीवनात १९९८ पर्यंत श्यामराव यांनी खेळाची मैदाने गाजवली. हॅंडबॉल प्रकारात राष्ट्रीय पातळीवर अनेक सुवर्ण पदके (Gold medals) मिळवीत खेळाडू म्हणून नाव कमावले. शिक्षणानंतर शासकीय नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. पण तांत्रिक अडचणींमुळे नोकरी मिळाली नाही. दरम्यान, २००३ मध्ये वर्षा यांच्यासोबत ते विवाहबद्ध झाले. घरची चार एकर शेती होती. १५ ते २० म्हशींचे संगोपन करू लागले. पत्नीची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने २००८ मध्ये प्राध्यापिका म्हणून त्यांना नोकरी (Job) मिळाली. त्यांना पुढे जाण्यासाठी श्यामरावांनी प्रोत्साहन दिल्याचा वाटा महत्त्वाचा होता.
सुखाला दृष्ट लागली
पत्नीची नोकरी, शेती आणि संसार अशी घडी स्थिरस्थावर झाली असताना सुखाला दृष्ट लागली. वर्षा यांना २०१५ मध्ये रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. श्यामरावांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुंबई, पुणे येथे १७ हून अधिक रुग्णालये पालथी घातली. तब्बल २२ लाखांचा खर्च केला. पुढे पत्नीची दृष्टी गेली, एकेक अवयव निकामी होत गेला. शर्थीची झुंज अखेर अयशस्वी ठरली. १४ एप्रिल, २०१७ मध्ये पत्नींचे निधन (Wife Death) झाले. पाठी असलेल्या लेकींचा खरा आधार गेला. खूप वेदना झाल्या. पण खचून चालणार नव्हते. शोक करीत राहण्यापेक्षा लेकींना घडवू या उद्देशाने मानसिक ताकद एकवटली आणि श्यामराव पुन्हा उभे राहिले.
निरोगी आयुष्यासाठी सर्व काही
मानवी रोगांमधील (diseases) अनेक कारणांमध्ये रसायनांच्या अनियंत्रित वापराचा समावेश होतो. आपल्याला दोन पैसे कमी मिळतील तरी चालेल पण ग्राहकांना विषमुक्त शेतीमाल द्यायचा हा संकल्प श्यामरांवांनी दृढ केला. तसे २०११ पासून सेंद्रिय शेतीला (Organic Farm) त्यांनी सुरुवात केली होती. आपले आजी- आजोबा ठणठणीत होते. यामागील रहस्य हे आरोग्यवर्धक व विषमुक्त आहार असल्याचे ते जाणून होतेच. मात्र पत्नीच्या निधनानंतर ते याबाबत अधिक गंभीर होऊन काम करू लागले.
शेती (Agriculture)
-आपल्या चार एकरांसह १६ एकर करार पद्धतीने शेती.
-द्राक्ष, (Grapes) ऊस, गहू, कांदे, (Onion) सोयाबीन ही मुख्य पिके. उसाची आडसाली लागवड. त्यानंतर खोडवा.
कांद्याची डिसेंबरमध्ये लागवड. गव्हाची (Wheat) नोव्हेंबर मध्यात पेरणी. केवळ द्राक्षात ‘रेसिड्यू फ्री’ व्यवस्थापन म्हणजे फक्त रासायनिक बुरशीनाशकांचा वापर. अन्यथा, बाकी सर्व पिकांत शंभर टक्के सेंद्रिय
शेती.
वाण
द्राक्षे- थॉम्पसन, काळी नानासाहेब पर्पल
ऊस- को-८६०३२
गहू - बन्सी. खाण्यासाठी व प्रक्रियेसाठी उत्कृष्ट. टपोरे मध्यम दाणे
कांदा - नाशिक गुलाबी, वजन व अधिक उत्पादकता
व्यवस्थापन- ठळक बाबी
- सन २०११ पासून कुठल्याही पिकाचे (Crop) अवशेष जाळत नाहीत. गव्हाचे काड, ऊस चिपाड, काडी कचरा, तण, जनावरांचे शेण-मूत्र शेतातच कुजवून सेंद्रिय खतांची निर्मिती. त्यातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत. जमीन ‘पैलवान’ झाली. पिके किडी- रोगप्रतिकारक झाली.
- गंगापूर धरणाच्या आवर्तनाद्वारे पाण्याचा वापर.
- रब्बी पिके काढल्यानंतर जमिनीला तीन महिने, तर खरीप व दिवाळीनंतर एक महिना विसावा.
- १५ देशी गायी, एक बैलजोडी. शेण- गोमूत्रापासून जिवामृत निर्मिती व वापर
- कुठलेही तणनाशक न वापरता निंदणी. मशागतीसाठी ८० टक्के बैल मेहनतीला प्राधान्य. जमीन (Land) कमी तुडविली जात असल्याने भुसभुशीत.
- काढणीपश्चात हाताळणी, प्रतवारी करूनच विक्री
- चिकू, आंबा, पेरू, रामफळ, सीताफळ, कवठ, अंजीर, केळी, पपई, कडुनिंब आदींची शेतीत विविधता. परागीभवनसाठी शेतपरिसरात मधमाशांचा अधिवास जपला.
- किमान मनुष्यबळाचा वापर करून कुटुंबकेंद्रित शेती.
गेल्या तीन वर्षांतील एकरी उत्पादन
द्राक्षे- ८, १२ ते १४ टन.
ऊस- ६० ते ७५ टन.
गहू- १२ क्विंटल.
कांदा- १३ ते १७ टन.
वर्षा ब्रॅंडने मिळवली बाजारपेठ
सकस व सेंद्रिय माल असल्याने श्यामरावांकडील शेतीमालाची मौखिक प्रसिद्धी झाली आहे. त्यातूनच मुंबई, पुणे, नाशिक परिसरात थेट ग्राहकपेठ (Customer base) तयार झाली आहे. सेंद्रिय उसापासून ते अन्य गुऱ्हाळघरातून
रसायनविरहित गूळ तयार करून घेतात. दरवर्षी गव्हाची ४०, ४५ ते ५५ रुपये, तर द्राक्षांची १०० रुपये प्रति किलो दराने थेट ग्राहकांना विक्री होते. कांदा (onion) २५ किलोच्या गोणीतून विकण्यात येतो. काही शेतीमाल व सोयाबीनही व्यापारी वा बाजार समितीतही विक्री होते. पत्नीच्या स्मृती जपण्यासाठी सर्व उत्पादनांचा ‘वर्षा’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे.
अधिक दर मिळवण्याचा फायदा
श्यामराव सांगतात, की आठ टन ऊस कारखान्याला २५०० रुपये प्रति टनाने दिला होता. त्यातून २० हजार रुपये मिळाले. त्या तुलनेत गूळनिर्मितीकडे वळल्यानंतर ८८७ किलो विक्री झाली.
किलोला शंभर रुपये दराने त्याचे ८८ हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता किमान ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न हाती आले. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान(NHRDF) येथे शेतीमालातील रासायनिक अंश पातळीच्या चाचण्या केल्या. त्यामुळे ग्राहक आगाऊ मागणी नोंदवून ठरलेले दर देतात. सोयाबीनसाठी मात्र बाजारपेठ (Market) शोधावी लागते आहे.
गटशेतीसाठी आग्रही
केवळ पिकवण्यापुरते मर्यादित न राहता सेंद्रिय शेतीमालाची बाजारपेठ वाढावी यासाठी श्यामराव जनजागृती करतात. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढ या आर्थिक अंगाने लक्ष असते. सध्या आरोग्यदायी मालाला मागणी वाढत असल्याने परिसरात गटशेतीच्या अंगाने कामकाज सुरू आहे.
सध्या १५० पोती सेंद्रिय गव्हाची (Organic Wheat) ऑर्डर आहे. मात्र तेवढी उपलब्धता नाही. येत्या काळात
सुमारे दीडशे एकरावर गटाने गहूशेती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कार्याचा गौरव
दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर ‘हम किसीसे कम नही’ नावाने सेंद्रिय शेती (Organic Farming) व त्याआधारीत प्रश्नमंजूषा ही मालिका सुरू होती. श्यामरावांनी त्यात भाग घेतला होता. अंतिम स्पर्धेत त्यांचा संघ विजयी होऊन एक लाख रुपयांचे पारितोषिक त्यांना मिळाले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेनेही कर्मवीर भूषण पुरस्काराने श्यामरावांना सन्मानित केले आहे. वडील सीताराम, आई पार्वताबाई, पुनर्विवाहानंतरची पत्नी वर्षा, मुली विशाखा, ओवी व भक्ती यांची समर्थ साथ त्यांना मिळते. शिक्षक श्रीकांत ढवळे यांचे त्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. मागील वर्षी श्यामरावांनी पिकविलेला सेंद्रिय कांदा(Organic Onion) कृषिदिनी बैलगाडीत वाजत गाजत पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणला. बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यास क्विंटलला उच्चांकी ४,२०० रुपये दर मिळाला होता.
संपर्क : श्यामराव मोगल ९८२३८०५८७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.