
उत्पादन खर्च व रासायनिक निविष्ठांचे प्रमाण कमी करण्यासाठी कसबे तडवळा (जि.उस्मानाबाद) येथील महेश जमाले केळी, ऊस, सोयाबीन या तीन पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचे तंत्र आत्मसात करीत आहेत. गायी, शेळी व कोंबडीपालनासह गांडूळखत, जीवामृत आदी निर्मिती करून एकात्मिक शेती पद्धतीचाही अवलंब केला आहे. उस्मानाबाद शहरापासून २५ किलोमीटरवर बार्शी-लातूर रस्त्यावर ढोकीनजीक कसबे तडवळा हे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेले गाव अशी त्याची ऐतिहासिक परंपरा आहे. सोयाबीन, हरभरा, तूर, ऊस आदी पिके इथे होतात. पाण्याचा तसा मोठा नैसर्गिक स्रोत नाही. विहीर व बोअरच्या पाण्यावरच शेती होते. गावातील सोमनाथ जमाले यांची ३२ एकर शेती आहे. मुलगा महेशने २००६ च्या दरम्यान बारावी शिक्षणानंतर शेतीची वाट धरली. आज सुमारे १५ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर शेतीत विविध प्रयोग करत महेश यांनी आपली ओळख तयार केली आहे. वडिलांसह आई पद्मिनी, पत्नी पूजा यांची त्यांना खंबीर साथ आहे. सेंद्रिय शेतीकडे पाऊल सन २००९ मध्ये महेश यांनी भेंडीचे पाऊण एकरात ३२ हजारांचे उत्पन्न घेतले. त्यातून उत्साह चांगलाच वाढला आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. मग ऊस, केळी यासारख्या पिकांकडे ते वळले. शेतीतील वाढलेला उत्पादन खर्च, त्या तुलनेत मिळणारे उत्पादन व त्याचे अस्थिर असलेले दर यांचा विचार करून महेश यांनी दहा वर्षांपूर्वी रासायनिक अधिक सेंद्रिय मात्र त्यातही सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर अशी शेती करण्यास सुरवात केली. गेल्या चार वर्षांपासून काही अपवाद वा प्रमाण वगळता संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनेच ते करताहेत. सेंद्रिय तूर महेश २०१६ मध्ये तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. तेथे गांडूळखत निर्मितीचे २१ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. विषय विशेषज्ञ डॉ. भगवान आरबाड, अपेक्षा कसबे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या वाटचालीत केंद्राचा मोठा वाटा असल्याचे महेश सांगतात. सन २०१७ मध्ये सेंद्रिय पद्धतीने दोन एकरांत तुरीचे ३२ क्विंटल उत्पादन घेतले. त्यावर्षी नेमके दर गडगडले. पण हताश न होता डाळ तयार करून ९० ते १०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली. त्याचवेळी गावातील काही शेतकऱ्यांनी गोपाळकृष्ण सेंद्रिय शेतकरी गट स्थापला. त्याचा मोठा फायदा ‘मार्केटिंग’साठी झाला ऊस, केळीत प्रयोग सेंद्रिय पद्धतीत उसाचे एकरी ६० टन, केळीचे २५ टन तर सोयाबीनचे ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. केळी हे त्यांचे पारंपरिक पीक आहे. मध्यंतरी दुष्काळामुळे ती काढावी लागली. पण पुन्हा वर्षापूर्वी मार्चमध्ये एक एकरवर जी-९ वाणाची लागवड केली आहे. यात लागवडीच्या पहिल्या आठवड्यात प्रतिझाड एक किलो गांडूळखत, त्यानंतर दर दहा दिवसांनी एकरी १०० लिटर व्हर्मिवॅाश ते देतात. जूनमध्ये प्रति झाड तीन किलो, सप्टेंबरमध्ये पाच व ऑक्टोबरमध्ये सात किलो गांडूळखत देण्यात येते. एप्रिल ते मेमध्ये धैंचा घेऊन फुलोऱ्यावर येताच तो बागेत गाडून टाकण्यात येतो. ठिबकद्वारे जीवामृत देण्यात येते. जैविक पद्धतीने तयार केलेले वेस्ट डिकंपोजर आणि जिवाणू संवर्धके यांचा वापर केला जातो. प्रति दोनशे लिटर पाण्यात एक लिटर जिवाणू संवर्धकासह तीन किलो शेण, दीड लिटर गोमूत्र, आणि दीड किलो गूळ यांचा वापर होतो. वेस्ट डिकंपोजर मध्ये बोरॅानच्या घटकासाठी कवठ फळाचा गर वापरण्यात येतो. शिवाय उंबर, रुचिक, दुधानी, कण्हेरी आदींच्या वनस्पतींचा पाला वापरण्यात येतो. जनावरे संगोपन व खत निर्मिती बाहेरून निविष्ठा आणण्याऐवजी शेतातच सेंद्रिय खते तयार करण्यावर महेश यांनी भर दिला आहे. त्यासाठी शेण, गोमूत्र उपलब्ध करण्यासाठी जनावरे संगोपनाचा त्यांचा मोठा फायदा होतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्नवाढ साधते आहेच. शिवाय रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर व त्यावरील खर्चही कमी झाला आहे. पाच गायी असून दोन गावरान डांगी गायी आहेत. पाच गायी प्रतिदिन ५ ते ८ लिटर दूध देतात. ३५ उस्मानाबादी शेळ्या व जातिवंत बकरा आहे. ३० देशी कोंबड्या आहेत. मुक्तगोठा संचार पद्धतीचा वापर केला आहे. वर्षाकाठी सुमारे २० ते २५ शेळ्या व बकरे यांची विक्री होते. त्यातून दोन ते अडीच लाखांचे तर कोंबड्या आणि अंडी विक्रीतून ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पक्क्या बांधकामासह १२ फूट बाय ४ फूट अंतराचा एक याप्रमाणे बारा बेडस तयार केले आहेत. प्रतिबेड चार टन गांडूळखत तयार होते. दर तीन महिन्यांतून एकदा खत त्यातून घेतले जाते. वर्षाला सुमारे ८० टन खतापैकी ३० टन शेतात वापरून उर्वरित खताची विक्री दहा हजार रुपये प्रति टन दराने होते. ॲग्रोवनची प्रेरणा पाच वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतकरी गटातर्फे उत्पादित सेंद्रिय तूरडाळीची यशकथा मे, २०१७ मध्ये ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली. त्याचा मोठा फायदा झाला. या दैनिकातील माहिती- ज्ञानाचा सातत्याने फायदा होत असून प्रेरणा मिळत असल्याचे जमाले सांगतात. संपर्क-महेश जमाले- ८७८८५२५२५९, ९७६३२३२७५३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.