Orange Orchard : संत्रा बाग, नर्सरी, क्रेटनिर्मिती...

शेंदूरजनाघाट (ता. वरुड, अमरावती) येथील उद्धवराव फुटाणे यांनी प्रगतिशील व प्रयोगशील संत्रा बागायतदार अशी ओळख तयार केली. वडिलांच्या काळापासून असलेला रोपवाटिका व्यवसाय विस्तारला. त्यापुढे जाऊन अभियंता मुलाच्या साथीने क्रेट निर्मिती व्यवसाय सुरू केला. नुकतीच संत्रा मंडी उभारली आहे. अशा रीतीने शेतीतील उत्पन्नातूनच विविध आर्थिक स्रोत वाढवून शेतीसह कौटुंबिक अर्थकारण व त्यातील उलाढाल विस्तृत करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
Orange Orchard
Orange OrchardAgrowon

राज्यात सर्वाधिक संत्रा लागवड (Orange Cultivation) असलेला भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हा पट्टा ओळखला जातो. या पिकाखालील एकूण एक लाख ५० हजार हेक्‍टरपैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र या दोन तालुक्‍यांतच असावे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया (California Of Vidarbh) असेही म्हटले जाते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये हा भाग असल्याने संत्रा उत्पादनासाठी (Orange Production) येथील वातावरण पोषक ठरते. याच कारणामुळे या भागात संत्रा लागवड वाढण्यास मदत झाली.

Orange Orchard
Nagpur Orange : ‘जी २०’मध्ये नागपुरी संत्र्याऐवजी टायगर कॅपिटल म्हणून ब्रॅण्डिंग

प्रयोगशीलतेचा आदर्श

वरुड तालुक्यात प्रयोगशील संत्रा बागायतदार पाहण्यास मिळतात. शेंदूरजनाघाट येथील उद्धवराव फुटाणे हे त्यापैकीच एक होत. सुमारे ३७ एकरांवर त्यांनी संत्रा बाग विकसित केली आहे. अठरा बाय १८ फूट अंतरावर लागवड असून, एकरी १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादकता साध्य केली आहे. विक्री व्यापाऱ्यांना करण्यावरच भर असतो. प्रति टन २० ते २५ हजार रुपये दर मिळतो. बागेचा एकरी व्यवस्थापन खर्च किमान ७५ ते ८० हजार रुपये असतो. बागेच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे सिंचनासाठी सात विहिरी व सात बोअरवेल्स आहेत.

Orange Orchard
Nagpur Orange : नागपूर संत्रा हंगाम अंतिम टप्प्यात

नर्सरी व्यवसायाची वाढ

उद्धवराव यांचे वडील गुलाबराव लक्ष्मणराव फुटाणे यांनी १९७२ मध्ये रोपवाटिका (नर्सरी) व्यवसाय सुरू केला. त्या वेळी १५ ते २० हजार रोपनिर्मिती व्हायची. उद्धवराव यांनी ही परंपरा पुढे जपली. केवळ संत्रा बागेतील उत्पन्नावर अवलंबून न राहाता आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी नर्सरी व्यवसायही वृद्धिंगत केला. त्यामुळेच आजच्या घडीला रोपनिर्मिती वर्षाला तीन ते साडेतीन लाख संख्येच्या घरात पोचली आहे.

मुख्यतः संत्रा रोपनिर्मिती होते. त्याशिवाय काही प्रमाणात मोसंबी व लिंबू पिकाची रोपेही तयार होतात. खुंट (रूटस्टॉक), मातृवृक्ष देखील उद्धवरावांच्या नर्सरीत उपलब्ध होतात. त्यामुळे कीड-रोगरहित कलमांचे उत्पादन करणे शक्‍य होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने देशातील अन्य भागांतील शेतकऱ्यांकडून या रोपांना मागणी राहते. विशेष म्हणजे पाच ते सात राज्यांच्या निविदा प्रक्रियेतून होणारा पुरवठाही या नर्सरीतून केला जातो. त्यातून रोपांच्या दर्जाविषयी कल्पना येऊ शकते.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अधिस्वीकृती त्यासोबतच कृषी विभागाचा परवानाही त्यांच्याकडे आहे. नर्सरीत गादीवाफा व ठिबक सिंचनाचा वापर होतो. याशिवाय हिरवळीची खते, ट्रायकोडर्मा व लाभदायक सूक्ष्मजीवांचाही वापर केला जातो. त्यातून रोपे निरोगी तयार करण्याचा प्रयत्न असतो.

क्रेट व्यवसायाचे स्वरूप

‘पीपी’ (एकवेळ वापरासाठी), ‘सीपी’ (दोन ते तीन वेळा वापर) व ‘एचडी’ (दीर्घकाळ वापरासाठी) अशा तीन ग्रेडसमध्ये क्रेट तयार केले जातात. त्यानुसार त्यांचे १०० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत दर आहेत. दररोज सरासरी १५०० ते १७०० क्रेट्‍सची विक्री होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल ५० ते ८० रुपये प्रति किलो दराप्रमाणे गुजरात, जळगाव, दमण, नागपूर येथून उपलब्ध होतो.

राजस्थान, परतवाडा, अमरावती, वरूड, मोर्शी, मध्य ंप्रदेशातील पांढुर्णा, सौंसर, काटोल, सावनेर, नरखेड या भागातून व्यापारी क्रेट खरेदीसाठी या ठिकाणी येतात. पंधरा मे ते जून अखेरपर्यंत क्रेटची उत्पादन केले जाते. या काळात बाजारात संत्रा राहतो. केवळ संत्राच नव्हे, तर आंबा, द्राक्षे या पिकांसाठीही आपल्या क्रेटची विक्री होत असल्याचे उद्धवराव यांनी सांगितले. एकूण मागणी पाहात वर्षभर क्रेटचे उत्पादन करण्यावर भर आहे. वर्षभरात तीन लाखांहून अधिक क्रेटचे उत्पादन करण्याची क्षमता अशा रीतीने उद्धवरावांनी तयार केली आहे.

संत्रा मंडीची उभारणी

व्यापारी, मध्यस्थांना टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री शक्य व्हावी यासाठी उद्धवरावांनी संत्रा मंडीची देखील उभारणी केली आहे. शेतकऱ्यांकडून थेट संत्रा खरेदी करून क्लीनिंग, ग्रेडिंग देखील केली जाते. असा प्रतवारी केलेला संत्रा क्रेटच्या माध्यमातून राज्यात व परराज्यांतील बाजारपेठेत पाठविण्यात येतो. आतापर्यंत तीस हजार क्रेट्‍सपर्यंत विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.

पत उंचावली

एकेकाळी केवळ तीन-चार एकर शेती होती. मात्र केवळ शेतीतील उत्पन्नातूनच टप्प्याटप्प्याने ६० एकर शेती घेण्यापर्यंत उद्धवरावांनी प्रगती साधली. अन्य व्यवसाय वाढवले. या सर्वांतून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १०० जणांना रोजगार देण्यात ते यशस्वी झाले. मुलाला अभियंता करणे शक्य झाले. एकूण उलाढालीतून २० ते २५ टक्के नफा मिळतो. उद्धवराव केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संपर्क शेतकरी आहेत. शेतीतील कार्याची दखल घेऊन सन २०१७ मध्ये उद्यान पंडित पुरस्काराने त्यांना गौरविण्यातही आले आहे.

क्रेटनिर्मिती उद्योग

शेतीतील उत्पन्नाचे स्रोत वाढवले तरच शेतीतील नफा व एकूण अर्थकारण यात वाढ होईल हे उद्धवराव यांनी जाणले. त्यातूनच त्यांनी अभियंता झालेल्या अनिकेत या मुलाला क्रेट व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली. राज्यातील संत्रा उत्पादनात सर्वाधिक वाटा वरुड, मोर्शी या तालुक्‍यांचा असल्याने या भागात हंगामात व्यापारी संत्रा खरेदीसाठी मंडी उभारतात. हा माल क्रेटच्या माध्यमातून देशात सर्वदूर पोहोचविण्यात येतो. त्यासाठी क्रेटची गरज मोठ्या प्रमाणात लागते. उद्धवरावांनी नेमकी हीच गरज व संधी ओळखली. नोव्हेंबर२०१६ मध्ये त्यांनी ‘माऊली प्लॅस्टिक’ नावाने उद्योगाची पायाभरणी केली. प्रति दिन (२४ तासांत) २७०० ते २८०० पर्यंत क्रेटचे उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.

- उद्धव फुटाणे, ९४२२८५७५७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com