
श्रीधर ठाकरे
Agriculture Success Story: स्पेनमधील डरीड तसेच व्हॅलेनसिया परिसरात संत्र्याचा टॅंगो हा वाण रंग, चवीच्या बाबतीत नावारुपास आला आहे. टेबलफ्रुट म्हणून याचा वापर होतो. हा वाण सीडलेस असल्याने प्रक्रिया उद्योगाकडून चांगली मागणी आहे. स्पेनमध्ये अतीसघन पद्धतीने गादीवाफ्यावर संत्रा लागवड करण्यात येते. रोपनिर्मितीपासून प्रक्रियेपर्यंत काटेकोर नियोजन हे येथील संत्रा शेतीचे वैशिष्ट आहे.
महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट (मॅग्नेट) माध्यमातून नाशिक येथील सह्याद्री फार्म, महाऑरेंज यांच्या पुढाकाराने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आठ दिवसांचा स्पेन देशातील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्पेनमधील व्हेलेनसिया शहराचा परिसर हा संत्रा लागवड क्षेत्रासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
या देशात हिवाळ्यात ७ ते १२ अंश सेल्सिअस आणि उन्हाळ्यात ३८ ते ४४ अंश सेल्सिअस तापमान राहते. या देशात खासगी कंपन्यांव्दारे ८०० ते एक हजार एकरावरील संत्रा बागांचे व्यवस्थापन होते. बागांच्या व्यवस्थापनासाठी संबंधित भागातील अशासकीय संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाते. यासाठी शेतकऱ्यांना सल्लागार संस्थांना शुल्क द्यावे लागते.
फळबागेचे व्यवस्थापन
स्पेनमधील शेतकरी संत्रा कलमांची लागवड करताना अतीसघन पद्धतीने गादीवाफ्यावर २० फूट बाय सहा फूट अंतरानुसार लागवड करतात. भारतातील संत्रा लागवड ही १८ फूट बाय १८ फूट अंतरावर प्रचलीत आहे. त्यामुळे भारताच्या तुलनेत स्पेनमधील बागेत एकरी झाडांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्याचा उत्पादनाच्यादृष्टीने फायदा होतो. ठिबक सिंचनाने फळझाडांना पाणी आणि विद्राव्य खते दिली जातात. यातून मजुरीवरील खर्च आणि आर्थिक बचत देखील होते. या फळबागेचे काटेकोर व्यवस्थापन ठेवले जाते.
भविष्यात कलम मोठे झाल्यानंतर फांदीची वाढ ४५ अंशात होण्यासाठी लागवडीनंतर जमिनीवर खुंटी लावत दोरीच्या साहाय्याने फांद्यांना ताण दिला जातो. त्यामुळे ४५ अंशामध्ये फांद्यांची वाढ होते. यामुळे नव्या फांद्या फुटतात, त्यासोबतच अतिरिक्त वाढ थांबते. फळे खालच्या बाजूस राहत असल्याने सहज तोडता येतात. या तंत्रामुळे झाड फळांनी लगडलेले असताना देखील त्यास कोणत्याही प्रकारचा आधार देण्याची गरज भासत नव्हती. याउलट विदर्भातील संत्रा बागेतील झाड फळांचे अतिरिक्त वजन सहन करु शकत नाही. त्यामुळे झाडांना कायम बांबूचा आधार द्यावा लागतो.
संत्र्यासह लिंबूवर्गीय पिकामध्ये छाटणी महत्त्वाची आहे. स्पेनमधील शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीवर भर देतात. झाडाच्या मध्यभागी असलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते. या व्यवस्थापनामुळे बहरलेल्या सर्वच फांद्यांना सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. फळांचा दर्जा सुधारतो, उत्पादनातही वाढ होते. येत्या काळात भारतातही या पध्दतीचा अवलंब संत्रा बागायतदार करणार आहेत.
लिंबूवर्गीय पिकांच्या कीड,रोग व्यवस्थापनात पानांचे परिक्षण ही बाब महत्त्वाची आहे. त्यामुळे येथील शेतकरी सातत्याने पानांचे निरिक्षण करतात. लिंबूवर्गीय पिकात पान प्रामुख्याने कीड,रोगास संवेदनशील असते. पानाच्या परिक्षणातून कीड,रोगांचे विश्लेषण करणे शक्य होते. तसेच पिकाला आवश्यक असणाऱ्या नेमक्या अन्नद्रव्यांची कल्पना येते. पानांचे निरीक्षण, चाचणीनुसार कीडनाशकांचा कमी वापर केला जातो. प्रत्येक झाडाला आच्छादन असल्याने तण नियंत्रण होते, गादीवाफ्यात ओलावा देखील कायम राहतो. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापनाचा उत्पादकता आणि दर्जा सुधारात मोठा आधार ठरतो.
उत्पादकतेत आघाडी
नागपूरचे राजे मुधोजी भोसले हे दक्षिणेमध्ये स्वारीवर असताना त्या भागातील राजांनी त्यांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून संत्रा रोपांची भेट दिली होती. राजे भोसले यांनी ही संत्रा रोपे आपल्या सोबत आणत नागपूर परिसरात लागवड केली. कालांतराने या रोपांपासून मिळालेल्या संत्रा फळांची चव आणि दर्जा चांगला होता. त्यातूनच पुढे या भागात या संत्रा वाणाची लागवड वाढली. त्यालाच नागपूरी संत्रा असे म्हटले जाते. नागपूरी संत्रा वाणाची भारतातील उत्पादकता हेक्टरी ९ टन इतकीच आहे. स्पेनमधील टॅंगो वाणाची उत्पादकता ७० टन प्रती हेक्टर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वाणापासून किफायतशीर उत्पादन मिळते.
रोपवाटिकेचे व्यवस्थापन
स्पेनमधील रोपवाटिकांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पाहावयास मिळतो. संत्रा रोपांचे संगोपन देखील शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. प्लॅस्टिक कुंडीमध्ये कलमांची वाढ केली जाते. कुंडीच्या खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी विशिष्ट जाळी लावली जाते. मुळे जमिनीत जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी रोपाची कुंडी प्लॅस्टिक स्टूलवर ठेवली जाते. कुंडीतील रोपांची मुळे जमिनीत गेल्यास ती उपटून काढावी लागतात.
मुळे तुटल्यास कलम योग्यप्रकारे तयार होत नाही, लागवडीनंतर त्याची वाढ अपेक्षीत होत नाही. रोपवाटिकेत वापरात येणाऱ्या मातीचे वापरण्यापूर्वी परिक्षण केले जाते. मातीमध्ये रोपांच्या योग्य वाढीसाठी पोषक घटक आहेत किंवा नाही हे माहिती झाल्यानंतर ते घटक मातीत मिसळले जातात. माती निर्जंतुकीकरणावर भर दिला जातो. सुरुवातीच्यापहिल्यापासूनच रोपांच्या व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याने रोपांची बागेत चांगल्याप्रकारे वाढ होते.
आधुनिक प्रतवारी युनिट
स्पेनमध्ये शेतीकामासाठी मजूर टंचाई आहे तसेच मजुरीवर खर्चही अधिक होतो. त्यामुळे फळांच्या तोडणीसाठी दक्षिण आफ्रिकेतून मजूर आणले जातात. फळांच्या तोडणीनंतर आधुनिक प्रतवारी युनिटमध्ये फळांची स्वच्छता, प्रतवारी केली जाते. याठिकाणी वजनाप्रमाणे फळांची प्रतवारी केली जाते. या युनिटमध्ये बहुतांश कामे यंत्रमानवाच्या साहाय्याने केली जातात. प्रतवारी करताना चुकून डागाळलेली फळे काही प्रमाणात आल्यास त्यांना वेगळे करण्याचे काम मजुरांच्या साहाय्याने केले जाते.
टॅंगो वाणातून क्रांती
डॅरीड तसेच व्हॅलेनसिया या दोन्ही भागात संत्र्याचा टॅंगो हा वाण रंग, चवीच्या बाबतीत नावारुपास आला आहे. टेबलफ्रुट म्हणून याचा वापर होतो. हा वाण सीडलेस असल्याने प्रक्रिया उद्योगाकडून चांगली मागणी आहे. ‘सह्याद्री फार्म’ने हा वाण भारतात आयातकरून अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागात याची लागवड केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना हा वाण लागवडीसाठी उपलब्ध करुन दिला जात आहे.
- श्रीधर ठाकरे, ९८२२२२८५३३
(लेखक ‘महाऑरेंज’ चे कार्यकारी संचालक आहेत.)
( शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.