Mango Season : आमराया म्हणजे राजसी थाट आणि रसाळ्याची संस्कृती

Mango Update : कैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका उताऱ्याला द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या खुडी घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे.
 Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

Mango Orchard : विदर्भाचं सगळ्यात मोठं नुकसान गेल्या तीस वर्षात आमराया संपल्याने झालेलं आहे. आमराया फक्त आंब्याची झाडं नव्हती. त्यात एक राजसी थाट होता. रसाळ्याची संस्कृती होती. आपण एक स्पेसिज संपवत नसतो, एक अख्खी संस्कृती संपवत असतो.

आज मुली आंब्यांसाठी हट्ट करतात तेव्हा मी त्यांना सांगतो, तेरे पप्पा के दादा पाच हजार स्वेअर फिट में पवण्या नाम का घांस बिछाके आम को पकाते थे! एक बकेट आम हम ऐसे ही खेलते खेलते खा जाते थे. सगळं नॉस्टाल्जिया आहे.

लहाणपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसने, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे.

डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मध्ये मध्ये आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबणे हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.

कैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका उताऱ्याला द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या खुडी घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे.

 Mango
Mango GI : गुंता हापूस ‘जीआय’चा!

झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या झेल्यामधून खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा.

पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा. वीस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकूण आंब्यांच्या चवथा हिस्सा मिळायचा.

एकाच आमराईत आंब्याच्या शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानिक प्रजाती गुण्यागोविंदाने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्यासाठी तर शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खावा तर शेप्या नावडता.

उतरलेले आंबे बैलगाडीतून घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा ‘माच' घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादलीमध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असूनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू.” सर्व जण ओरडायचे “आंबा”!

दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवणे आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधून शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते? असा मोठा प्रश्न आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं साबण बनवण्यासाठी उपयोग होतो, कोणी म्हणायचं त्यापासून तेल काढतात.

पाऊस पडण्याच्या आधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिजची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरची लोणच्यांची चव वेगळी असायची.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com