
Agri Tourism Center Update : आज ८ जून म्हणजे जागतिक समुद्र दिन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. विविधता आणि नैसर्गिक साधनसपंत्तीने नटलेला जिल्हा आहे.
कोकणातील सुप्रसिद्ध भजनसम्राट बुवा कै. परशुराम पांचाळ यांनी कोकण दर्शन गजरात कोकणचे सार्थ वर्णन केले आहे. ‘नारळी, पोफळी, करवंद लालबोंडु, काजूच्या जांभा, नावारूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा,’ असा उल्लेख त्यांना या गजरात केला आहे.
शेतीची जपलेली आवड
कुडाळ तालुक्यातील तुळसुली तर्फे माणगाव हे देखील निसर्गरम्य गाव आहे. दापोलीच्या कृषी विद्यापीठांतर्गत मुळदे संशोधन केंद्रापासून दीड किलोमीटरवरील या गावात कुडाळ-बामणादेवी मार्गावर गजानन गंगाराम कुडाळकर यांचे घर आहे.
त्यांचे मूळ गाव कुडाळ असून, तेथे ते पूर्वी किराणा मालाचे दुकान चालवीत. परंतु शेतीची आवड असल्यामुळे त्यांना केवळ शेती करावी असे सतत वाटे. त्यातूनच तुळसुलीत पडीक जमीन पाहणीत आली. आर्थिक जुळवाजुळव करीत ती खरेदी केली.
तज्ज्ञ व मित्रमंडळीनी नारळ, सुपारी लागवडीचा सल्ला दिला. आपल्या वातावरणाला पोषक अशा नारळाच्या जातींची माहिती घेत त्यांची लागवड केली. शिवाय आंबा, काजू, मिरी आदींचीही रोपे लावली. पाण्याची पुरेशी सोय करण्यासाठी विहीर खोदली.
शेती विकास, पर्यटन केंद्राचा ध्यास
सन १९९५-९६ च्या सुमारास तत्कालीन युती सरकारने सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. त्यातून जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पर्यटन बहरत गेले. शासनाकडूनही कृषी पर्यटन व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत होते. सहाजिकच कुडाळकर यांच्या मनातही ही संकल्पना रुजू लागली.
शेतीची आवड व प्रेम यातून त्यांनी मन ओतून शेती विकसित करण्यास सुरुवात केली. सुमारे १० लाख बँकेकडून कर्ज आणि स्वगुंतवणुकीतून तुळसुली येथे १५ एकर, मुळदे येथे २०, तर पुन्हा तुळसुलीत ६ एकर अशी टप्प्याटप्प्याने जमीन घेत आजमितीला ४१ एकर शेती समृद्ध केली आहे. सन १९९० पासून शेतीतील तगडा अनुभव तयार झाला आहे.
शेतीतील विविधता
आज नारळाची एक हजार हजार, सुपारी दोन हजार, वेंगुर्ला चार व सात या काजूवाणाची मिळून ८००, तर अमृत कोकमची २०० झाडे आहेत. मिरी, दालचिनी, जायफळ, थाई पेरू, चिकू, जाम आदींच्याही काही झाडांची लागवड आहे. पाच एकरांत बांबू पैकी दोन एकर सलग, तर तीन एकर बांधावर त्याचे कुंपण आहे.
भविष्यात कृषी पर्यटन संकल्पना राबवायची या हेतूने बांधालाही विविध झाडांची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीनेच व्यवस्थापनावर भर दिला. १०० बाय ४० फूट आकाराचे शेततळे आहे. आठ ते दहा कामगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे.
नारळाने फुलवले अर्थकारण
सन १९९० व १९९५ या काळापासून नारळाच्या एक हजार झाडांची जोपासना होते. प्रति झाड सरासरी १०० ते कमाल १५० नारळ उत्पादन मिळते. दरवर्षी एकूण सरासरी ८० हजार ते कमाल एक लाखापर्यंत नारळ मिळतात. त्यांना मोठी मागणी असून, प्रति नग १५, २० ते २५ रुपये दराने कुडाळ बाजारपेठेत विक्री होते. शहाळ्याला ४० रुपये दर मिळतो. व्यापारी बागेत येऊनही खरेदी करतात.
कोकण हेरिटेजची उभारणी
दोन वर्षांपूर्वी मुलगा मोहनीशच्या साथीने कोकण हेरिटेज नावाने कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. पत्नी लक्ष्मी यांचीही शेती व व्यवसायात समर्थ साथ कुडाळकर यांना मिळते. स्वीमिंग पूल, वातानुकूलित खोल्या, आकर्षक बागबगीचा आदी सोयीसुविधा आहेतच.
शिवाय विविध दहा हजार झाडांनी फुललेली समृद्धी पर्यटकांना आपल्या विवंचना काही काळ विसरण्यास भाग पाडते. लग्नसमारंभ, मेळावे, गेटटुगेदर, विद्यार्थी सहली, कृषी मार्गदर्शन मेळावे या ठिकाणी होतात. पर्यटकांना विविध फळे चाखायला मिळतात. त्यांच्याकडून खरेदीही होते.
विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री तथा माजी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींनी भेट देऊन पर्यटन केंद्राचे कौतुक केले आहे. व्हिजन सिंधुदुर्ग या मुंबईतील संस्थेकडून उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने, तसेच मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने कुडाळकर यांचा गौरव झाला आहे.
प्रयोगशील वृत्ती जपत त्यांनी लॉकडाउनमध्ये दहा एकरांत कलिंगड लागवडीचा प्रयोग केला. पंधरा वर्षांपूर्वी १५ एकरांत ऊसशेती केली. भेंडी, हळद आदींचे प्रयोग केले. ड्रॅगन फ्रूटची दहा झाडे लावली आहेत.
संपर्क - गजानन कुडाळकर, ९४२२०५४८८२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.