
Onion Market News : कांदा पिकासाठी अहिल्यानगर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी-विक्री करणे सोपे व्हावे यासाठी १९५४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना अहिल्यानगर शहराशेजारी झाली. आज ती शहराच्या मध्यभागी आहे.
मुख्य बाजार समितीत महत्त्वाचे योगदान असलेल्या माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे तर नेप्ती येथील उपबाजार समितीला ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले आहे. किसानसिंग गोविंदसिंग परदेशी हे बाजार समितीचे पहिले अध्यक्ष तर १९५६ मध्ये गणपतराव भाऊराव काळे हे पहिले उपाध्यक्ष ठरले.
बाजार समितीच्या विकास, विस्तारात आमदार शिवाजी कर्डिले यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे. एकवीस संचालक मंडळ असलेल्या या बाजार समितीचे सध्या भाऊसाहेब बोठे अध्यक्ष, रभाजी सूळ उपाध्यक्ष आहेत.
‘नेप्ती’ची वाढती कांदा बाजारपेठ
बाजार समितीच्या सुरुवातीपासूनच येथे भुसार मालासह कांद्याचे लिलाव होतात. कांद्याची आवक वाढू लागली तशी जागा अपुरी पडू लागली. मग २०११ मध्ये शहरापासून बाहेर असलेल्या ७९ एकर क्षेत्रावरील विस्तीर्ण नेप्ती उपबाजारात (ता. अहिल्यानगर) लिलाव सुरू झाले. दिवसेंदिवस बाजाराचा लौकिक वाढत आहे.
सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होतात. मार्च ते नोव्हेंबर या काळात गावरान तर ऑगस्ट ते नोव्हेंबर काळात लाल कांद्याची आवक होते. दहा वर्षांपूर्वी वर्षाला दहा ते बारा लाख क्विंटल आवक व्हायची. आज ती २५ ते ४० लाख क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. दर लिलावाला दहा ते बारा हजारांच्या संख्येने शेतकरी कांद्याची विक्री करतात.
स्पर्धेमुळे चांगला दर
लिलावात शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा यासाठी खरेदीदारांची संख्या मर्यादित न ठेवता ‘मागेल त्याला परवाना’ हा उपक्रम राबवला. त्यामुळे खरेदीदार, अडत्यांची संख्या वाढली. सध्या कांद्याचे ६० खरेदीदार व १०५ अडते आहेत.
साहजिकच खरेदीदारांची संख्या व स्पर्धा वाढून बोली अधिक वाढते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. मागील पाच वर्षांचा विचार करता ऑक्टोबर २०२० मध्ये क्विंटलला सर्वाधिक कमाल नऊ हजार रुपये, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये सहा हजारांपर्यंत दर मिळाला.
पारदर्शक व्यवहारामुळे शेतकरी या बाजाराला पसंती देतात. त्यामुळे राज्यात नेप्ती बाजार समितीत सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची आवक होत असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. त्यांना सहायक सचिव सचिन सातपुते व संजय काळे यांची साथ मिळते.
..अशी आहे आवक स्थिती
अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, छ. संभाजीनगर आदी ठिकाणांहून येथे होते कांद्याची आवक.
कोरोना काळात बाजार समितीने प्रशासनाच्या परवानगीने सर्व नियमाचे पालन करत लिलाव सुरू ठेवले. त्या काळात नेहमीच्या तुलनेत तीस टक्के आवक कमी होती. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या बाबीला बाजार समितीने प्राधान्य दिले.
शेतकऱ्यांसाठी सुविधा
शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खुले कांदा लिलाव.
वाहनांच्या वजनासाठी ५० टन क्षमतेचे दोन वजनकाटे. सर्व अडत केंद्रांवरही आधुनिक वजनकाटे. वजनाचा संदेश शेतकऱ्यांना तातडीने जाण्यासाठी संगणकीकृत सुविधा.
शुद्ध पाण्यासाठी दोन शुद्धीकरण यंत्रे, -चोवीस तास ‘जनरेटर’
सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, शेतकऱ्यांना रोख आणि थेट खात्यावर पैसे जमा करण्याची सुविधा.
पाऊस व नैसर्गिक संकटांमुळे कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून ७८ हजार चौरस फुटाचे शेड.
परदेशात निर्यात
नेप्तीच्या बाजारातून खरेदीदारांच्या माध्यमातून बांगलादेश, श्रीलंका, दुबई, अफगणिस्तान आदी देशांत वर्षाला ३०० टनांपर्यंत लाल व गावरान कांद्याची निर्यात होते. टिकावू आणि दर्जेदार कांदा असल्याने परदेशात त्यास चांगली मागणी आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, राजस्थान, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतूनही येथील कांद्याला मागणी आहे. बाजार समितीने अहिल्यानगर रेल्वे विभागाशी समन्वय ठेवला आहे. पुरवठ्यासाठी गरज भासल्यास व्यापाऱ्यांना स्वतंत्र बोगी उपलब्ध करून दिली जाते.
अभय भिसे, ७३५००१२३०५, (बाजार समिती सचिव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.