Team Agrowon
यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले.
यामुळे ऐन अक्षयतृतीयेच्या हंगामात आंब्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. या टंचाईमध्ये कोकणातील शेतकऱ्यांनी चक्क कर्नाटकमध्ये जाऊन कर्नाटकी आंबा खरेदी केला.
तसेच त्याचा हापूस म्हणून पुरवठा पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मात्र या प्रकरणी शेतकऱ्यांच्या नावाची बदनामी नको म्हणून प्रमुख आडतदारांनी याबाबत तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.
यंदा कोकणात ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील पावसाने हापूस आंब्यांचा मोहोर झडला. नंतर मोहोराच्या पोषक वातावरणासाठीची कडाक्याच्या थंडीची वाणवा, वाढलेले तापमान, फळधारणेच्या अवस्थेतील अवकाळी पाऊस आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहोर न लागल्याने घटलेले उत्पादन आदी कारणांनी यंदा आंब्याची टंचाई निर्माण झाली.
केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. यामुळे यंदा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेलाच नाही.