Success Story : जमीन सुपीकतेला सर्वोच्च प्राधान्य देणारी नानोटेंची शेती

Fertile Land In Akola : अकोला जिल्ह्यातील निंभारा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे यांनी अधिक उत्पादनाचा हव्यास न धरता जमीन सुपीकतेला अधिक प्राधान्य दिले आहे. पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याची पद्धत, जमिनीला विश्रांती देणे, रासायनिक खतांचा मर्यादित वापर आदी विविध नियोजनातून त्यांनी आपल्या मातीचे आरोग्य चांगले राखले आहे.
Success Story
Success StoryAgrowon
Published on
Updated on

Agriculture Management : काही वेळा एकरी अधिक उत्पादनाचा हव्यास मारक ठरतो. आज जमिनीच्या सुपीकतेचा मुद्दा जागतिक पातळीवर चिंताजनक बनला आहे. रासायनिक खतांचा भडिमार, घेतलेल्या उत्पादनाच्या तुलनेत जमिनीला कमी प्रमाणात केलेली पीक अवशेषांची परतफेड यामुळे काही ठिकाणी जमिनी नापीक होत चालल्या आहेत.

अशा पार्श्‍वभूमीवर अकोला जिल्ह्यातील निंभारा येथील गणेश नानोटे यांनी आपल्या ४५ एकर शेतीत जमिनीची सुपीकता हीच बाब केंद्रस्थानी ठेवली आहे.

नानोटे यांचे शेती व्यवस्थापन

पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून नानोटे यांनी जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे सुरू केले आहे. ते सांगतात, की काळी आई मला जन्म देणाऱ्या आईएवढीच महत्त्वाची आहे. आईची आपण ज्या प्रकारे सेवा करतो, तिच्या आरोग्याची काळजी घेतो त्याच तन्मयतेने शेतीची सुद्धा काळजी घेणे आवश्यक वाटते.

जमिनीची सुपीकता किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज शेती सुरू केली त्याच्याच दोन-तीन वर्षांत आला. सुरुवातीला यांत्रिकीकरणाचा अभाव होता. त्यामुळे बैलांच्या आधारे शेती करीत होतो. नानोटे सांगतात, की १९९५-९६ मध्ये पहिल्यांदा गव्हाचे काड जमिनीत गाडले त्या वेळी काही लोक मला अडाणी म्हणाले. काही हसले.

कारण आमच्या भागात शेती जितकी स्वच्छ असेल तितका तो शेतकरी चांगला समजला जायचा. आणि मी नेमके याउलट काम म्हणजे पीक अवशेष, काडीकचरा जमिनीतच गाडत होते. त्याचे परिणाम पुढे चांगले जाणवायला लागले.

जमिनीच्या सुपीकतेचे व्यवस्थापन

नानोटे यांच्याकडील जमीन सर्वसाधारण हलकी, मध्यम व १० टक्के चुनखडीयुक्त आहे. या जमिनीत उत्पादनाच्या मर्यादा त्यांनी ओळखल्या. ‘एनपीके’ खतांची मात्रा जमिनीच्या मगदुराप्रमाणे ठेवली. माती परीक्षणावर सातत्याने भर दिला. कमी कालावधीच्या पिकांसाठी (उदा. सोयाबीन) रासायनिक खतांच्या मात्रा अगदी १० टक्क्यांवर आणल्या.

पीक फेरपालट कटाक्षाने पाळली. तीन वर्षांत एकदाच नांगरट करण्यावर भर दिला. त्या काळात घरी भरपूर जनावरे होती. त्यामुळे शेणखताचा वापर केला जायचा. मात्र मागील १० वर्षांपासून शेणखताचा वापर बंद केला आहे. त्याऐवजी शेतातच उपलब्ध पीक अवशेष, तणे, काडी कचरा, कुटार, बांधावरील पालापाचोळा कुजविणे आणि ते शेतात गाडणे सुरू केले.

गव्हाचे कांड २७ वर्षांपासून, कपाशीचे अवशेष १४ वर्षांपासून, तर केणा व अन्य तणे आठ वर्षांपासून जमिनीत गाडले जात आहेत. रोटाव्हेटर आल्यानंतर हे काम अधिक सुकर झाले आहे.

Success Story
Forest Land Encroachment : अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटण्याची आशा

पोहोचवले जागतिक स्तरावर

निंभारासारख्या आडवळणाच्या गावात शेती करणारे नानोटे आज जगात पोहोचले आहेत. ‘ग्लोबल फार्मर नेटवर्क’मध्ये त्यांचा समावेश झाला आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठांच्या समित्यांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

राज्य, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध ‘वेबिनार्स’ तसेच फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘पॅन आशिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात ते सहभागी झाले. जर्मनी व अर्जेंटिनातूनही त्यांना कृषी परिषदांसाठी निमंत्रणे आली होती.

मात्र तांत्रिक अडचणींमुळे उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांची शेती विद्यार्थी, शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचे ठिकाण बनली आहे. शेतकऱ्यांसह परदेशी तज्ज्ञही येथे भेटी देतात. इंटरनेटसह ‘चॅट जीपीटी’सारख्या अत्याधुनिक साधनांचाही नानोटे वापर करीत आहेत.

उन्हाळी पिके टाळली

कापूस, सोयाबीन, तूर ही खरिपातील, तर कांदा, गहू आदी रब्बीत पिके असतात. नगदी म्हणून केळी पीक आहे. उन्हाळ्यात मात्र संपूर्ण शेत रिकामे ठेवण्यावर कटाक्ष असतो.

उत्पादनात राहिले सातत्य

जमिनीच्या मगदुराचा विचार करून दोन झाडांतील अंतर, जातींची निवड, झाडांची संख्या, त्यासाठी रासायनिक निविष्ठांची मात्रा असे अगदी काटेकोर नियोजन होते. जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया आवर्जून केली जाते. मातीचा जिवंतपणा टिकवून ठेवल्याने सेंद्रिय कर्ब ०.७० ते ०.९० दरम्यान झाला आहे.

शेतात गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्या शेतातील मातीवर कृषी विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्याने अभ्यास केला. त्यानुसार सेंद्रिय कर्ब व मातीचे सर्व गुणधर्म योग्य असल्याचे निष्कर्ष मिळाल्याचे नानोटे सांगतात.

पिकांचे उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळत असून, कपाशीचे १० क्विंटल, सोयाबीन ७ ते ८ क्विंटल, तूर ५ ते ६ क्विंटल, गहू १५ क्विंटलच्या आसपास, कांदा ७ ते १० क्विंटल, केळी घड २० ते २२ किलो असे सातत्य राखले आहे. कपाशीचा १६५ दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. फरदड घेतली जात नाही. गव्हाचा बेवड चांगला असल्याचे नानोटे सांगतात.

संपर्क - गणेश नानोटे, ९४२१८३२२९३, ९५७९१५४००४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com