Livestock Update : सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णीपासून पाच किलोमीटरवर अकोले खुर्द हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’पासून अवघ्या काही अंतरावर असल्याने या भागात पाण्याची शाश्वत सोय आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता ऊस, केळी आदी नगदी पिकांची शेती सर्रास सगळीकडे दिसते.
याच अकोले गावाच्या बाजूस नागनाथ पाटील यांची १५ एकर शेती आहे. त्यात १० एकरांत ऊस तर चार एकरांत तैवानी पिंक पेर आहे. नागनाथ यांचे वडील आजिनाथ शेतीच करीत. हे कुटुंब पूर्वीच शेतात राहायला आले. साहजिकच नागनाथ यांना लहानपणापासूनच शेतीची आवड लागली. आज १५ वर्षाहून अधिक काळ ते शेतीत उत्साहाने विविध प्रयोग करीत आहेत.
शेतकरी गटातून चालना
साधारण २०१८-१९ मध्ये टेंभुर्णीत कृषीरत्न सेंद्रिय शेतकरी गट स्थापन झाला. गटाचे अजिंक्य लोकरे अध्यक्ष तर डॉ. भारत कुबेर सचिव आहेत. गटात २३ शेतकरी आहेत. प्रत्येकाकडे देशी गाय आहे. श्री. लोकरे पंचगव्यानुसार उत्पादने निर्मिती करतात.
नागनाथही गटात सामील झाले. त्यांच्याकडे ही वडिलोपार्जित देशी खिलार गोसंगापन व्हायचे. मात्र गटातील प्रयोग व विचारांच्या आदान प्रदानातून आणखी चालना मिळाली. त्यावेळी दोन म्हशींची विक्री केली.
खिलार गाय मात्र ठेवली. जामखेडच्या बाजारातून प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे दोन गीर गायी खरेदी केल्या. आज प्रत्येकी दोन खिलार व गीर व एकेक वासरू असा सहा गायींचा गोठा आहे.
गोठा व्यवस्थापन
-मुक्त गोठा पद्धतीने गायींचे संगोपन. पावसाळ्यात शेडची व्यवस्था.
-चारा-पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या.
-पारंपरिक पद्धतीनेच दूध काढले जाते.
-दररोज सकाळी सहाच्या सुमारास प्रत्येकी अर्धा किलो सरकी पेंड, सकाळी सात वाजता व तासाभराने आठच्या सुमारास पुन्हा दहा किलो हिरवा चारा. सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान हेच शेड्यूल.
-शेण व गोमूत्र साठवणुकीची व्यवस्था.
दूध, तूप कुटुंबासाठी
नागनाथ यांच्याकडील प्रत्येक गाय दोन्ही वेळेस मिळून सुमारे सहा ते आठ लिटरपर्यंत दूध देते. त्यापासून तूप आणि ताक तयार केले जाते. मात्र विक्री न करता घरीच वापर केला जातो. नागनाथ यांना पत्नी मनिषा, भावजय वैशाली यांची गोसंगोपनात मोठी मदत होते.
शेतीच्या बळावरच कुटुंबातील प्रीतम, शुभम, हर्षाली ही मुले चांगले शिक्षण घेत आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात ती व्यस्त आहेत. मुलगा हर्षल मालेगाव येथे कृषी व्यवस्थापन पदवीचे शिक्षण घेत आहे.
स्लरी ढवळण्यासाठी यांत्रिक पध्दत
ऊस आणि पेरूला दर आठवड्याला शेण व गोमूत्रावर आधारित जीवामृत स्लरीचा वापर होतो. त्याच्या निर्मितीसाठी २०० लिटर ड्रममध्ये २०० लिटर पाणी, ३ किलो गूळ, २ किलो बेसन, चार लिटर ताक, ५ लिटर कल्चरचे विरजण, ५ लिटर गोमूत्र आणि २ किलो शेण यांचे मिश्रण करून सलग आठ दिवस ढवळले जाते.
डी कंपोजर द्रावण निर्मितीसाठी दोन किलो गूळ, ५ लिटर कल्चरचे विरजण आणि १ लिटर ताक याच पद्धतीने तयार केले जाते. सलग आठ दिवस दोन्ही ड्रममधील द्रावण
सातत्याने ढवळावे लागते. त्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेऊन खास एअर कॅाम्प्रेसरची यंत्रणा बसविली आहे. त्याच्या साह्याने ‘टायमर’ सेट करून दर तासाला पाच मिनिटे स्लरी आपोआप ढवळली जाते. आलटून-पालटून दोन्हीचा डोस पिकांना देण्यात येतो.
रसायनांचा वापर बंद, खर्चात बचत
नागनाथ यांच्याकडे सर्वाधिक ऊस आहे. पूर्वी रासायनिक खतांचा वापर ते करायचे. त्यातून उत्पादन खर्च वाढला. पण उत्पन्न तेवढे मिळत नव्हते. आता सेंद्रिय पद्धतीच्या वापरातून रासायनिक खते व अन्य निविष्ठांचा वापर पूर्ण बंद केला असून खर्चावरही नियंत्रण आले आहे.
जीवामृत स्लरी, पंचगव्य आदींचा वापर शेतीत होतो. त्यातून संपूर्ण शेतीसाठीच्या निविष्ठांवर होणाऱ्या खर्चात किमान ५० टक्के बचत झाली आहे.
जमिनीचा सुधारतोय पोत
वर्षाला सुमारे सहा ट्रॅाली शेणखत मिळते. त्याचा प्रत्येक क्षेत्राला आलटून-पालटून वापर होतो. उसाचे पाचट अजिबात न जाळता जागेवरच कुजविण्यात येते. दरवर्षी दोन एकरांत आलटून पालटून क्षेत्रात ताग, धैंचा आदी हिरवळीची पिके घेण्यात येतात.
अशा रीतीने संपूर्ण सेंद्रिय व्यवस्थापनातून उसाचे एकरी ५५ ते ६० टन उत्पादन नागनाथ घेतात. मागील वर्षी पेरूचे एकरी १२ टनांच्या पुढे उत्पादन त्यांना मिळाले आहे.
संपर्क-नागनाथ पाटील- ९७६५२२५५९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.