Indian Agriculture : संयुक्त कुटुंब पद्धतीमुळेच प्रशंसनीय प्रगती

Banana Farming : जळगाव जिल्ह्यात ऐनपूर (ता. रावेर) येथील सुमारे ३२ सदस्यांचे व तीन पिढ्या एकत्र नांदणारे पाटील कुटुंब समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्श म्हणावयास हवे. आज शेतीत विविध समस्या तयार झाल्या आहेत.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात ऐनपूर (ता. रावेर) हे गाव केळी, पपई, कलिंगड, कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. काळी कसदार शेती लाभलेल्या गावास तापी नदीचा लाभ झाला आहे. त्यामुळेच परिसरात बागायती शेती चांगलीच वाढली आहे. या गावातील पाटील हे एकत्रित कुटुंब पध्दतीचे आदर्श उदाहरण म्हणता येईल.कुटुंबातील पहिल्या पिढीत म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये रमेश, सुरेश, गणेश व अशोक या पाटील बंधूंचा समावेश होतो. त्यातील रमेश सर्वांत मोठे.

परिवाराला एकसंध ठेवण्याची, मजबूत करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली. वडील वेडू पाटील यांच्याकडे जुजबी शेती होती. रमेश यांच्यावर शेतीची जबाबदारी आल्यानंतर ती पुढे १२ एकरांपर्यंत पोहोचली. त्या वेळेस सिंचन, अन्य तंत्रज्ञान, विजेची अडचण होती. अशा स्थितीत शेती करून प्रगती करणे अवघडच होते.

त्यांना बंधू सुरेश, गणेश यांनी साथ दिली. सर्वांत लहान बंधू अशोक यांनी शेतीत न येता शिकून, सवरून मोठे व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांना जळगावात उच्च शिक्षणासाठी धाडले. पदवी व अध्यापनासंबंधीचे शिक्षण घेऊन त्यांनी काही संस्थांमध्ये नोकरीही केली. पुढे ऐनपुरातील विद्यालयात अध्यापनासंबंधी नोकरीस ते लागले. मात्र त्यांचे शेतीकडेही लक्ष असायचे.

कुटुंबाने वाढविला शेतीचा पसारा

आज पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र नांदताहेत. बारा एकरांपासून शेतीचा व्याप दरवर्षी वाढत जात आज स्वमालकीची ७५ एकर शेती झाली आहे. गरजेनुसार विहिरी, कूपनलिका खोदल्या. शंभर टक्के शेती बागायती झाली आहे. केळी सुमारे २५ एकर, पपई १० ते १२ एकर, तूर व कापूस प्रत्येकी १० ते १२ व अन्य हंगामी अशी एकूण पीक पद्धती आहे.

शेती विकसित होत असताना पाटील बंधूंपैकी थोरले रमेश यांच्याकडे सर्व व्यवहार, आर्थिक नियोजन, सुरेश यांच्याकडे सिंचन व पशुधन, गणेश यांच्याकडे मजूर व्यवस्थापन, विपणन, शेतीमाल बाजारात पोहोचविणे आदी जबाबदाऱ्या असायच्या. शेणखतासाठी सुमारे ६० पशुधनाचा सांभाळ व्हायचा. त्याची जबाबदारी सुरेश चोखपणे पार पाडायचे. सुट्टीच्या दिवशी अशोक देखील शेतीत राबायचे. सेवानिवृत्तीनंतरही ते अधिकाधिक वेळ शेतीला देतात.

दुसऱ्या पिढीतही जबाबदाऱ्यांची विभागणी

घरातील सर्व मुख्य आर्थिक व्यवहार आजही पहिल्या पिढीतील रमेश यांच्याकडे आहेत. त्यांचे वय सुमारे ७२ वर्षे आहे. त्यांचे अन्य बंधूही सत्तरीपार आहेत. रमेश यांचे चिरंजीव व दुसऱ्या पिढीचे शिलेदार प्रवीण यांच्याकडे विपणन, व्यापाराची जबाबदारी आहे. अशोक यांचे चिरंजीव विपुल व गणेश यांचे चिरंजीव योगेश यांच्याकडे निविष्ठा वापराची जबाबदारी आहे. सुरेश यांचे चिरंजीव विनोद यांच्याकडे

मजूर व्यवस्थापन व त्यांचे वितरण अशी कामे आहेत. दर आठवड्याचे नियोजन, एकमेकांच्या अडचणी, सूचना यावर सर्व जण बसून निर्णय घेतात. सणवार, उत्सवाला सर्व सदस्य एकत्र येतात.

ऐनपुरात पाटील कुटुंबाचे टोलेजंग निवासस्थान आहे. अलीकडेच मजबूत घरही बांधले आहे. दोन बंधू एके ठिकाणी तर अन्य दोन बंधू दुसऱ्या घरी या पद्धतीने राहतात.

Indian Agriculture
Agriculture Success Story: फळपिकांसह माती, पर्यावरणाचेही जपले आरोग्य

नवी पिढी उच्चशिक्षित

नव्या म्हणजे तिसऱ्या पिढीतील विपुल अशोक पाटील यांनी शेतीचे शिक्षण घेतले असून ते नोकरीच्या मागे न लागता शेतीत रममाण झाले आहेत. रमेश यांचे चिरंजीव प्रवीण, सुरेश यांचे चिरंजीव विनोद, गणेश यांचे चिरंजीव योगेश देखील शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. कुटुंबातील काही युवावर्ग

जळगावात विविध उद्योगांत कार्यरत झाला आहे. राज प्रवीण पाटील एमबीबीएसचे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. विजय यांचे चिरंजीव यश एमएस (मेकॅनिकल) पदवी शिक्षणासाठी जर्मनी येथे गेला आहे. हर्ष विजय पाटील मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तर अभिनव विनोद पाटील यानेही अभियांत्रिकीतील पदविका घेतली आहे.

Indian Agriculture
Agriculture Success Story: पारंपरिक शेतीला फळबाग, पशुपालनाची जोड

निर्यातक्षम उत्पादनात हातखंडा

सर्वांच्या एकत्रित ताकदीमुळे शेतीतील कामे सुकर झाली असून व्यवस्थापन सुधारून शेतमालाचा निर्यातक्षम दर्जा मिळवणे शक्य झाले आहे. केळीचे एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत तर पपईचे प्रति झाड ४० ते ४५ किलो उत्पादन मिळते. तूर व कपाशीचेही एकरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. निर्यातक्षम केळीला मागील तीन वर्षात उच्चांकी २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता.

कुटुंबातील मंडळी जिज्ञासू व अभ्यासू आहेत. केळी मुख्य पीक आहे. या पिकातील कुकुंबर मोझॅक विषाणू व अन्य समस्यांवर उपाय शोधताना योग्य मार्गदर्शनासंबधी प्रवीण व विनोद या पाटील बंधूंनी

त्रिची येथे अभ्यास दौरा केला. विनोद गावातील शेतकरी उत्पादन कंपनीतही सक्रिय आहेत. घरातील वडीलधाऱ्या मंडळीचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्यांचे नियोजन पुढे जात नाही. विविध कंपन्या, तज्ज्ञ यांच्या संपर्कात हे कुटुंब असते. केळी पिकात शरद महाजन (उत्राण, ता. एरंडोल) यांचे मार्गदर्शन मिळते.

जमिनीतील सामू व क्षारांची समस्या लक्षात घेऊन ५५ अश्‍वशक्तीच्या वीजपंपाद्वारे तापी नदीवरून तीन जलवाहिन्यांतून पाणी शेतापर्यंत आणले आहे. तीन ट्रॅक्टर्स असून त्यात एक मिनी ट्रॅक्टर आहे. सहा सालगडी आहेत. अधूनमधून देशी कापसाचीही लागवड असते. देशी गाईंचेही संगोपन होते.

विनोद पाटील ८८०५६१८००५ (सुरेश पाटील यांचे चिरंजीव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com