
Agriculture Success : ढवळेश्वर (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील मयूर प्रफुल निकम हा कृषी शाखेतून ‘एमटेक’ झालेला युवक आहे. त्याचे वडील महाराज सयाजीराव गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे उपप्राचार्य आहेत.
माध्यमिक शिक्षण घेत असताना मयूरला घरच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील शेतीचाही अनुभव होता. त्यामुळे लहानपणापासूनच निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, सदोष निविष्ठा, व्यापाऱ्यांच्या नियंत्रणात असलेली बाजारपेठ आदी समस्या तो जाणून होता.
बारावी झाल्यानंतर वडिलांशी सल्लामसलत करून त्याने अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान शाखेतून पदवी घेण्याचं नक्की केलं. त्यानुसार नाशिक येथील के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातून याच विषयातील पदवी घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे पदव्युत्तर म्हणजेच एमटेक पदवीसाठी प्रवेश घेतला.
यंत्रावर संशोधन
एमटेकच्या अखेरच्या व द्वितीय वर्षात विद्यार्थांना संशोधन प्रकल्प करावा लागतो. मयूरनेही विषयाची चाचपणी सुरू केली. मालेगाव तालुक्यातील दाभाडी परिसरात डाळिंबावर मर रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या.
शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून पेरूची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याचे लक्षात आले. परंतु एखाद्या शेतीमालाचे क्षेत्र जास्त व उत्पादन जास्त झाल्यास बाजारभावांवर परिणाम होतात, शेतकऱ्यांचे नुकसान होते हे मयुरच्या लक्षात आले होते.
अशावेळी पेरूवर प्रक्रिया करणारे यंत्र तयार केले तर शेतकऱ्यांना मूल्यवर्धन करून त्यापासून पैसा मिळवता येईल असा विचार मनात आला. पेरूपासून पल्प तयार करणारी यंत्रे बाजारात होती. पण ती अत्याधुनिक असल्याने त्यांच्या किमती लाखाच्या घरात होत्या.
किफायतशीर किमतीत असे यंत्र तयार करता येईल का याचा विचार मयूरने सुरू केला. त्यासाठी ‘एमआयटी’मध्ये त्या काळी कार्यरत व सध्या सोलापूर जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत प्राध्यापक डॉ. के. पी. बाबर मार्गदर्शक लाभले.
यंत्र, त्याचे ‘डिझाइन’, पेरूच्या विविध जाती, प्रक्रिया पदार्थ टिकवण्याच्या पद्धती आदी विविध बाजूंनी अभ्यास केला. विभाग प्रमुख डॉ. दीपक बोरणारे, ‘एमआयटी’चे महासंचालक मुनीश शर्मा, संचालक डॉ. संतोष भोसले यांचेही मार्गदर्शन मिळाले.
अखेर अथक प्रयत्न व अभ्यासातून पेरूतील पल्प वेगळा करणारे (फ्रूट पल्प एक्स्ट्रॅक्टिंग मशिन) प्रयोगशाळा स्तरावरील यंत्र तयार करण्यास मयूर यास यश मिळाले आहे.
यंत्राची वैशिष्ट्य व कार्यपद्धती असे आहे...
-पाणीदार फळांच्या तुलनेत कमी पाणी असलेल्या पेरूसारख्या फळासाठी हे यंत्र अधिक उपयुक्त.
-पाच किलो प्रति तास प्रक्रिया अशी या यंत्राची क्षमता आहे.
-मोटर सिंगल फेजवरील असली त्याचा आरपीएम १४०० होता. त्यामुळे पेरूचा गर यंत्रात केवळ फिरत बसला असता. यंत्राचे ‘व्हायब्रेशन्स’देखील वाढले असते. त्यामुळे मोटरला गिअर बॉक्स जोडून आरपीएम १३० पर्यंत खाली आणला.
- रिअर बॉक्सला ‘शाप्ट’ लावला आहे. हॉपरही दिला आहे. ब्रशच्या साह्याने बिया व निरुपयोगी भाग वेगळे काढले जातात. चाळणीची (सीव्ह) सुविधा दिल्याने ‘फायबर’ युक्त लगदा (पल्प) त्याद्वारे गाळून वेगळा केला जातो.
-समजा एक टन पेरूवर प्रक्रिया करायची झाल्यास त्यासाठी ८० तास लागतात. त्यातून तेवढ्या कालावधीत ८५१ किलो पल्प, ११६ किलो बिया व टाकाऊ भाग वेगळे केले जाऊ शकतात. चाचण्यांमध्ये यंत्राची कार्यक्षमता ९०.३३ टक्के आढळली आहे.
-पल्पमध्ये पुढे मान्यताप्राप्त ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ घटकांचा वापर करून त्याची अंतिम उत्पादन निर्मिती व विक्री केली जाऊ शकते.
-यंत्राच्या मुख्य भागांमध्ये ‘फूड ग्रेड एसएस स्टील’चा वापर केला आहे. त्यामुळे पल्प आणि रसाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते.
-यंत्र सहज पाहिजे तेथे स्थलांतरित करता येते. शिवाय त्याचे भाग वेगळे करणे व जोडणेही शक्य होते.
-छोट्या बिया असलेल्या फळांसाठी यंत्राचा वापर होतो. (मोठ्या बियांसाठी नाही. उदा. आंबा)
पेटंट मिळविण्यात यश
या यंत्राचे वैशिष्ट्य व गुणधर्म पाहत त्यासाठी भारत सरकारकडे २०१८ मध्ये अर्ज करण्यात आला. त्याची सर्व प्रक्रिया व सोपस्कार पार पडल्यानंतर नुकतेच त्यास पेटंट मंजूर करण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
पुढील २० वर्षांसाठी त्यास संरक्षण मिळेल. माफक दरात हे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुढील उद्दिष्ट
सध्या विकसित यंत्रापासून व्यावसायिक स्तरावरील यंत्र निर्माण करणे सोपे होईल. मयूर यांनी आपल्या गावी कडधान्य, तृणधान्यांवरील प्रक्रिया उद्योग मॅजेस्टी न्यूट्रिक या नावाने सुरू केला आहे. यात क्लीनिंग, ग्रेडिंग, हरभराडाळ, बेसन पीठ निर्मिती सुरू केली आहे. विकसित केलेल्या यंत्रातच सुधारणा करून फळांपासून रस तयार करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.
संपर्क - मयूर निकम, ९४२३५२११०६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.