Cotton Cultivation : प्रयोगशीलता व अभ्यासातून कापूस लागवडीत मिळवली मास्टरी

Intensive cultivation of cotton : यशस्वी ठरला सघन पद्धतीने कपाशी लागवड प्रयोग
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

विनोद इंगोले
High Density Cotton Cultivation : शास्त्रीय दृष्टिकोन, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती, आत्मसात केलेले व्यवस्थापन कौशल्य, हिशेबीवृत्ती आदी बाबींमधून दारोडा (जि. वर्धा) येथील दिलीप पोहाणे यांनी सघन कापूस लागवड, सोयाबीन आदी पिकांत मास्टरी मिळविली आहे. एकरी उल्लेखनीय पीक उत्पादकता मिळवताना पोहाणे पुरस्कारांचे धनी झाले आहेत.

वर्धा जिल्हा म्हणजे अतिपावसाचा पट्टा समजला जातो. दारोडा (ता. हिंगणघाट) येथील दिलीप नानाजी पोहाणे यांनी आपल्या या जिल्ह्यात प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून नाव मिळवले आहे. त्यांची शेती केवळ एक हेक्टर आहे. मात्र इतरांचे क्षेत्र कराराने घेत दहा एकरांवर ते शेती कसत आहेत. कापूस व सोयाबीन ही त्यांची खरिपातील मुख्य पिके आहेत. स्वःताच्या शेतात विहीर असून, तेथून दोन हजार फूट पाइपलाइनद्वारे त्यांनी सिंचनाची सोय केली. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा (वर्धा), तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या संस्थांचे मार्गदर्शन पोहाणे घेतात. त्यातूनच शेतीत प्रयोग करण्यास व सुधारित व्यवस्थापन करण्यास त्यांनी सुरुवात केली. विविध संस्था व कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत त्यांनी शेतीतील ज्ञान वाढवले आहे.

सुधारित व्यवस्थापनातील बाबी

-तीन वर्षांपासून सघन पद्धतीने कापूस लागवड करतात. यंदाचे तिसरे वर्ष आहे.
-९० बाय ३० सेंटिमीटरवर लागवड. (तीन बाय एक फूट). सघन लागवड पद्धतीत लागवड अंतर कमी केल्यास झाडांची एकरी संख्या १४ हजार ५०० पर्यंत जाते. मरतुकीची शक्‍यता पाहता
१२ हजार ५०० पर्यंत झाडे शिल्लक राहतात.
-लागवडीपूर्वी पुढील बेसल डोस देतात. १०-२६-२६- दोन बॅग्ज, सल्फर १० किलो, मॅग्नेशिअम १० किलो, झिंक पाच किलो. सर्व प्रमाण प्रति एकरी.
-तीन दातेरीच्या साह्याने जमिनीवर रेषा ओढल्या (मार्किंग केले) जातात. मजुरांच्या साह्याने बी टोबण्यात येते. बीटी बियाण्याच्या एकरी तीन पाकिटांचा वापर होतो.
-लागवडीनंतर १५ दिवसांनी उगवणीपश्‍चात तणनाशकाचा वापर होतो. त्यानंतर बारीक तण शिल्लक राहू नये यासाठी त्यानंतर २५ दिवसांनी मजुरांच्या साहाय्याने निंदण केले जाते. पीक तणमुक्‍त ठेवल्यामुळे वाढ जोमदार होते.
-झाडांची उंची सुमारे तीन फुटांपर्यंतच मर्यादित ठेवली जाते. त्यादृष्टीने झाडाच्या फांद्यांचे शेंडे खुडण्यात येतात. त्यामुळे झाडे दाटत नाहीत. किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाची फांदी आणि जमिनीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया होत झाडे निरोगी राहतात. पाती आणि बोंडांची गळ होत नाही असा पोहाणे यांचा अनुभव आहे.

Cotton Cultivation
Papaya Cultivation : केळीसह पपईतही मिळवली ‘मास्टरी’

-लागवडीच्या २५ दिवसांनी एकरी १०० किलो युरिया, ३० किलो पोटॅश, १० किलो मॅग्नेशिअम
असा खताचा दुसरा डोस. लागवडीपासून ५० दिवसांनी तिसरा डोस. त्यात १०० किलो युरिया राहतो.
-कीडनाशकाची पहिली फवारणी लागवडीनंतर ४० दिवसांनी. त्यानंतर प्रत्येक दहा दिवसांनी किंवा गरजेनुसार पुढील चार फवारण्या.
-प्रति झाडाला २५ बोंडे आणि वजन ५ ते ६ ग्रॅम यानुसार एकरी १७ ते १८ क्‍विंटलपर्यंत उत्पादकता गाठता येते असे पोहाणे सांगतात.

-गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डिसेंबरमध्येच कपाशीची वेचणी होते. त्यानंतर पऱ्हाट्या न जाळता रोटाव्हेटरच्या साह्याने शेतातच बारीक केल्या जातात. त्यातून जमिनीला
सेंद्रिय खत मिळते. सन २०१५ पासून या नियोजनात सातत्य आहे. एक टन शेणखतासाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. मात्र अशा प्रकारे पऱ्हाट्या कुजविल्यास केवळ एकरी दोन हजार रुपयांचा खर्च होतो. जमीन भुसभुसीत होऊन गांडुळांची संख्या वाढते असा पोहाणे यांचा अनुभव आहे. याच क्षेत्रात दोन ते तीन दिवसांनी गव्हाची पेरणी होते.

Cotton Cultivation
Papaya Cultivation : केळीसह पपईतही मिळवली ‘मास्टरी’

उत्पादन

सघन पद्धतीत पहिल्या वर्षी एकरी १० क्विंटल तर मागील वर्षी एकरी १७ क्विंटल (जानेवारीपर्यंत)
उत्पादन मिळाले. पुढे ठेवलेल्या फरदडीचे चार क्विंटल उत्पादन मिळाले. प्रति क्विंटल ७२००,
नऊ हजार ते ८५०० रुपये दर मिळाला. मशागत ते काढणीपर्यंत २० हजार रुपये खर्च होतो.
त्यानंतर चार वेचण्यांवर १७ हजार रुपये असा एकूण एकरी खर्च ३७ हजार रुपये होतो.

सोयाबीनची वाढविली उत्पादकता

सन २०१५ पासून पोहाणे ‘बीबीएफ’ पद्धतीने सोयाबीन घेतात. सन २०२१ मध्ये चोख व्यवस्थापनातून एकरी १५ क्‍विंटल उत्पादन त्यांनी घेतले. पीक स्पर्धेत तालुका स्तरावर त्यांना तिसरा क्रमांक मिळाला.
सन २०२१ मध्ये गव्हाचे त्यांना हेक्‍टरी ४३.५० किलो उत्पादन मिळाले. त्यासाठी पीकस्पर्धेत तालुकास्तरावर दुसऱ्या क्रमांकाने त्यांना गौरविण्यात आले. मागील वर्षी दीड एकरात त्यांनी करार शेती केली आहे. त्या ठिकाणी सोयाबीनचे एकरी १२ क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे.

मार्गदर्शन

पोहाणे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत ते अनेक शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करीत असतात. नागपूर विभागीय कृषी सहसंचाक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, दिलीप मानकर, सोयाबीन पैदासकार डॉ. सतीश निचळ, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, केव्हीकेचे तज्ज्ञ डॉ. जीवन कतोरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे, हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी राष्ट्रपाल मेश्राम आदींसह अनेक शेतकऱ्यांनी पोहाणे यांच्या शेतांना भेटी दिल्या आहेत.

चार वर्षांपासून मी पोहाणे यांच्या संपर्कात आहे. दोन वर्षांपूर्वी मुगाचे बियाणे पाठवून
त्यांनी व्यवस्थापन मार्गदर्शन केले. विक्रीवेळी हिरवा, दर्जेदार मूग पाहून तो सांगोल्याचा मूग आहे यावर व्यापाऱ्यांचा विश्‍वासच बसत नव्हता. तीळ लागवडही पोहाणे यांच्यामुळे फायदेशीर ठरली.

माणिक दत्तू पाटील,
चिनकेगाव, सांगोला, जि. सोलापूर
९४२००९३६०६

दिलीप पोहाणे- ९०४९९६९००७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com