Papaya Cultivation : केळीसह पपईतही मिळवली ‘मास्टरी’

वढोदा (जि. जळगाव) येथील संदीप पाटील यांनी केळी पिकापाठोपाठ पपई पिकातही प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी अशी ओळख तयार केली आहे.
Jalgaon News: Fruit Crop
Jalgaon News: Fruit CropAgrowon

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात वढोदा (ता. चोपडा) हे तापीनदीकाठील गाव आहे. येथे काळी कसदार व मध्यम जमीन आहे. परिसरात मुबलक जलसाठे आहेत. कांदेबाग केळी निर्यातीसाठी (Banana Export) वढोदा व लगतचे विटनेर ही गावे प्रसिद्ध आहेत.

वडोदा येथील संदीप सुभाष पाटील यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनात (Banana production) आपली ओळख तयार केली आहे. त्यांची एकूण ३० एकर शेती आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीचे व्यवस्थापन (Agricultural Management) हाती घेतले.

दरवर्षी जूनमध्ये (मृग बहर) सहा एकर आणि सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये (कांदेबाग) सहा एकर अशी सुमारे १० हजार झाडांपर्यंत त्यांची लागवड असते.

ग्रॅंड नैन वाणासह येल्लकी या दाक्षिणात्य केळी वाणाचा प्रयोगही यशस्वी केला आहे. एकरी ३५ टनांपर्यंत केळीचे उत्पादन मिळते. सहा कूपनलिका आहेत.

अर्ध स्वयंचलित (सेमी ऑटोमेशन) ठिबक यंत्रणा आहे. तीन सालगडी, दोन मोठे ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टर आहे.

पपईचे व्यवस्थापन

संदीप यांनी केळीसह पपई पिकातही आपली ‘मास्टरकी’ सिद्ध केली आहे. सलग १० वर्षांपासून त्यांनी लागवडीत सातत्य ठेवले आहे. सुमारे सहा एकर क्षेत्र त्यासाठी राखीव ठेवले आहे. पूर्वी ते तैवान ७८६ याच वाणाची लागवड अनेक वर्षे करायचे.

मात्र या वाणाला विषाणूजन्य रोग हमखास येतो. त्यामुळे नुकसानही होते. त्यावर उपाय शोधण्यासाठी या वाणाच्या जोडीला त्यांनी एकूण क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रावर दुसऱ्या एका वाणाचे क्षेत्र वाढवले आहे.

या वाणाला या रोगाची समस्या अत्यंत कमी असून, फवारणीचा खर्चही कमी आहे. त्याची रोपे उस्मानाबाद परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रति रोप १४ ते १६ रुपयांत पोहोच दिली जातात.

व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

१) लागवड फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान उंच गादीवाफा पद्धतीने व दहा बाय सहा फूट अंतरावर.

२) एकरी सुमारे ७०० झाडे असतात.

३) ठिबकमध्ये डबल लॅटरल पद्धतीचा वापर.

४) संदीप सांगतात की पपईत सर्वात मोठी समस्या डाऊनी व विषाणूजन्य रोगांची. पावसाळ्यात फवारणी अधिक करावी लागते.

पीक स्फुरदयुक्त खतांच्या वापराने जोमात येते. नत्राचा वापर नियंत्रणात ठेवावा लागतो. काढणीच्या वेळी पालाशचा योग्य पुरवठा होतो.

५) विषाणूजन्य रोगाला अटकाव म्हणून बाग स्वच्छ ठेवणे, रोगग्रस्त पाने बाहेर काढून त्यांची विल्हेवाट, बाग तणमुक्त ठेवण्यावर भर.

६) सखल भागात पावसाळ्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेण्यात येते. अति पावसात मर रोगाची समस्या तयार होते.

Jalgaon News: Fruit Crop
Red Banana : लाल केळी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का?

वाणांचा अभ्यास व त्यानुसार निवड

संदीप सांगतात, की केळीसाठी पपईचा बेवड चांगला असतो. पपईचा काढणी हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होतो. तैवान ७८६ वाणांचे उत्पादन चार महिन्यांपर्यंत सुरू राहते.

मात्र दुसरा वाण एप्रिल- मेपर्यंत उत्पादन देऊ शकतो. त्याच्या काढणीनंतर केळीची लागवड होते. चांगले व्यवस्थापन ठेवल्यास दुसरा वाण दोन वर्षांपर्यंतही उत्पादन देऊ शकतो.

झाडाची उंचीही १५ फुटांपेक्षा जास्त होते. दोन वाणांमध्ये तैवान ७८६ ची टिकवणक्षमता अधिक आहे. त्यामुळे दूरच्या बाजारात पाठविण्यासाठी तो अधिक चांगला आहे. त्याचा गर लालसर गुलाबी, पातळ असतो.

साल दणकट असल्याने व्यापारी त्याची मागणी करतात. दुसऱ्या वाणाची साल काहीशी पातळ, गर मोठा, लालसर गुलाबी असून, तैवान वाणापेक्षा तो गोड आहे. दोन्ही वाणांचे उत्पादन एकरी ३० ते ३५ टनांच्या आसपास मिळते.

बांधावरच मिळवले ‘मार्केट’

संदीप हे विपणन (मार्केटिंग) क्षेत्रात हुशार आहेत. व्यापारी, खरेदीदारांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. राज्यभरातील पपईचे मार्केट व घडामोडी याबाबत ते ‘अपडेट’ असतात.

कोविड काळातही याच गुणांच्या जोरावर त्यांनी पपईची चांगली विक्री साधली होती. दर्जा उत्तम असल्याने चोपडा, शहादा येथील व्यापारी बांधावरूनच खरेदी करतात. तेथून दिल्ली, पंजाब, हरियाना आदी भागांत पपई पाठवली जाते.

मिळालेले दर

अलीकडील वर्षांचा विचार केल्यास प्रति किलो ७ ते १५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. सन २०२० मध्ये हंगामाच्या सुरुवातीला १२ रुपये, तर सरासरी सात रुपये दर मिळाला.

मागील वर्षी (२०२२) सुरुवातीला (नोव्हेंबर- डिसेंबर) हाच दर २४ रुपये, तर सध्या १२ ते नऊ रुपये असे दर सुरू आहेत. एकूण उत्पन्न एकरी तीन लाख रुपयांपर्यंत मिळते.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

१) संदीप सांगतात की डाऊनी मिल्ड्यू व विषाणूजन्य रोग यातील फरक जाणवायला हवा.

२) डाऊनीमुळे झाड अशक्त होऊन विषाणूजन्य रोगाची समस्या वाढते.

३) दरवर्षी एकरी ९ टन प्रमाणात शेणखत.

४) केळीची एकाच क्षेत्रात सलग दोन वर्षे लागवड टाळली जाते. केळीचे अवशेष जमिनीत गाडले जातात.

५) पाण्याचा अतिवापर टाळतात. त्यासाठी ‘सेमी ऑटोमेशन’ यंत्रणा पूरक ठरते आहे.

Jalgaon News: Fruit Crop
Banana Crop Insurance : केळी फळपीक विमा योजनेत वराती मागून घोडे

६) अधिकाधिक जैविक व विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर.

७) केळी व फलोत्पादन विषयातील राष्ट्रीय परिषदांमध्ये (उदा. तिरुचिरापल्ली) हिरिरीने सहभाग.

८) राज्यासह परराज्यांत (तमिळनाडू, आंध्र प्रदेश)) दौरे. यातून मोठा मार्गदर्शक शेतकरी मित्र गोतावळा तयार केला. सतत शिकून घेण्याची वृत्ती, नवे प्रयोग, जिद्द हे गुण अंगीकारले.

९) जमीन सुपीकता तसेच गुलाबी बोंड अळी, अमेरिकन लष्करी अळीची समस्या टाळण्यासाठी मका, कापूस लागवड अनेक वर्षे टाळली आहे.

संदीप पाटील, ९०७५४५७६६५ (दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेतच)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com