Agriculture Processing : डाळिंब दाणे, ज्यूस अन् जोडीला शहाळ्याची मलई

Pomegranate Processing ; पाणी, साखर व कोणतेही प्रिझर्व्हेटिव्हज समाविष्ट न करता नैसर्गिक स्वरूपातील व आकर्षक पॅकिंगमधील या उत्पादनांना मोठ्या शहरांतील हॉटेल्स व दवाखान्यांमधून नियमित बाजारपेठ तयार केली आहे.
Pomegranate Processing
Pomegranate Processing Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सोलापूर येथील मदन भानुदास कुलकर्णी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे मूळगाव गिरवी (ता. माळशिरस) असून, तेथे १० एकर शेती आहे. नोकरीनिमित्त त्यांचे वडील कुटुंबासह फार वर्षांपूर्वी सोलापुरात स्थायिक झाले. त्यामुळे मदन यांचे सर्व शिक्षण याच शहरात झाले. त्यांनी बी.ई. सिव्हिल ही अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहेत.

कृषी उद्योगाची आवड असल्याने बांधकाम व्यवसाय सांभाळत सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगातही पाऊल टाकले. सोलापूर भागातील चिंचोली ‘एमआयडीसी’ येथे त्यांची जागा होती. त्यामुळे येथेच एखादा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचे त्यांनी ठरवले.

मित्र प्रसाद शेंडे यांची त्यासाठी मदत झाली. आज ते कंपनीचे संचालक असून, पुणे येथील जबाबदारी सांभाळतात. मदन यांना पत्नी रंजना यांची साथ आहेच. शिवाय बी.ई. सिव्हिल पदवीनंतर ‘एमबीए’ करणारा मुलगा शुभमदेखील याच उद्योगात पुढे भविष्य घडवणार आहे.

Pomegranate Processing
Banana Processing : केळीपासून मूल्यवर्धित उत्पादने

डाळिंबावर सुरू केली प्रक्रिया

कोणता प्रक्रिया उद्योग निवडावा यासाठी मदन यांनी काही संस्थांची प्रशिक्षणे अनुभवली. अभ्यासदौरे केले. सोलापूर जिल्हा डाळिंब शेतीसाठी राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात या पिकाखाली सुमारे एक लाख एकर क्षेत्र आहे.

या फळाचा कोणताही भाग वाया जात नाही व त्याच्या प्रत्येक मूल्यवर्धित उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळू शकते हे मदन यांनी जाणले. शिवाय उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणजेच डाळिंबे येथे मुबलक मिळणार होती. अखेर याच फळावर आधारित उद्योगाकडे वाटचाल सुरू झाली. त्यासाठी ‘कार्वी ॲग्रो प्रोसेसिंग फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन केली आहे. कंपनीचे २६ सदस्य आहेत.

कोरोनानंतर गाठला महत्त्वाचा टप्पा

साधारण २०२० मध्ये उद्योगाचा श्रीगणेशा झाला खरा. पण नेमका त्याच वर्षी कोरोनाचा अडथळा आला. पुढची दोन वर्षे फार काही करता आले नाही. पण २०२२ नंतर पुन्हा जोमाने सुरुवात केली. मधल्या काळात उद्योगाला आवश्यक छोट्या-छोट्या ‘मशिनरी घेतल्या. उद्योगाला आणखी जोड काय देता येईल, ‘मार्केटिंग’मध्ये काय करता येईल याचा अभ्यास केला. आज अडीच-तीन वर्षांत ‘स्टार्टअप’ उद्योगाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मदन आले आहेत.

...अशी आहेत उत्पादने

  • यंत्राद्वारे डाळिंब ज्यूसची निर्मिती केली जाते.

  • डाळिंबाचे सोललेले दाणे (ताजी अनारदाना) व सुकवलेला अनारदाना तयार केला आहे.

  • डाळिंबाच्या सालीपासून खत व बियांपासून तेल तयार केले जाते.

  • या व्यतिरिक्त अननस, पेरू यांचा ज्यूस, सीताफळाचा पल्प, शहाळ्याची मलई आणि शहाळे पाणी अशी एकूण सुमारे आठ उत्पादने तयार केली आहेत.

  • फ्रूट स्नॅक असा ब्रॅण्ड तयार केला असून आकर्षक, लक्षवेधी पाऊच पॅकिंगमध्ये उत्पादने सादर केली आहेत.

  • पाणी, साखर, प्रिझर्व्हेटिव्ह यांचा समावेश न करता नैसर्गिक स्वरूपात उत्पादनांची निर्मिती.

यांत्रिक सेटअप

  • ज्यूसनिर्मिती, फ्रोझन प्रक्रिया तसेच पॅकिंग आदी कारणांसाठी स्वतंत्र यंत्रे आहेत.

  • डाळिंब सोलण्याचे काम स्वयंचलित यंत्र करते. दाणे वेगळे करण्याचेही यंत्र आहे.

  • सुमारे २५ महिलांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.

Pomegranate Processing
Onion Processing : कांदा प्रक्रिया उद्योगातील तंत्र

पुणे, मुंबई येथे बाजारपेठ

उत्पादनाच्या ‘मार्केटिंग’, ‘ब्रॅण्डिंग’वर विशेष लक्ष देताना पुणे येथे कार्यालय सुरू केले आहे. पुणे येथील सुमारे ५० हॉटेल्सना उत्पादने पुरवण्यात येत आहेत. येथील एका नामवंत हॉस्पिटल मदन यांच्याकडून दोन वर्षांपासून नियमित डाळिंब ज्यूस घेत आहे.

मुंबई येथेही हॉस्पिटलला अशाच प्रकारे पुरवठा होत आहे. डाळिंब ज्यूस, दाणे आणि शहाळयाच्या पाण्यालाही सर्वाधिक मागणी आहे. पुण्यातील काही हॉटेल्सना ‘रेसिपी’मध्ये शहाळ्याच्या मलईची गरज असते. त्याप्रकारे पुरवठा होतो. पुण्यात पणन विभागाच्या मदतीने गांधीभवन आणि बालेवाडी येथील आठवडे बाजारातही स्टॉलद्वारे उत्पादनांची विक्री होते.

...अशी होते विक्री

  • डाळिंब ज्यूस २०० मिलि ७० रुपये, अननस ज्यूस २५० मिलि ८० रुपये

  • पेरू ज्यूस २०० मिलि ९० रुपये, शहाळ्याचे पाणी २०० मिलि पाऊच ५५ रुपये

  • शहाळ्याची मलई किलोला ४०० रुपये, सीताफळ पल्प २५० रुपये असे दर.

  • डाळिंबाचे ताजे दाणे प्रति किलो ४०० रुपये, तर सुकवलेले दाणे १२०० रुपये.

  • दरमहा डाळिंब ज्यूस दोन हजार लिटरपर्यंत, पेरू ज्यूस १०० लिटर, अननस ज्यूस २०० लिटर, डाळिंब दाणे ५०० किलो, सीताफळ पल्प, शहाळ्याची मलई २५ ते ३० किलो अशी विक्री.

प्रसाद शेंडे ७७३८२७४४४५ (कंपनी संचालक)

उद्योगासाठी गुंतवणूक मोठी आहेच. शिवाय मार्केटिंग व विक्रीसाठीही खूप प्रयास करावे लागतात.त्यातूनच आजचा पल्ला गाठणे शक्य झाले. दुबई येथे अनारदाना निर्यातीला सुरुवात करून पुढील काळात अमेरिका, युरोपात निर्यात करण्याचे ध्येय आहे. डाळिंब उत्पादकांसोबतही करार शेती करून त्यांनाही या उद्योगातून फायदा देण्याचे उद्दिष्ट आहे.
मदन कुलकर्णी ९८५००४९६९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com