Nature Tourism : कृषी विकासासह निसर्ग पर्यटनाकडे मालेची वाटचाल

Success Story : पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्याच्या प्रसिद्ध भातपट्ट्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग संपन्न गाव म्हणून मालेची ओळख आहे. गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सुमारे ८५ एकर डोंगराळ क्षेत्र भात, भाजीपाला आदी पिकांखाली आले. शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचे स्रोत लाभले. कृषी विकासासह गावाने निसर्ग पर्यटन विकासातून समृद्धी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Nature Tourism
Nature TourismAgrowon
Published on
Updated on

Pune Village Story : पुणे जिल्ह्यातील माले (ता.मुळशी) हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गसंपन्न टुमदार गाव आहे. पाचशे ते सहाशे उंबऱ्याच्या या गावातील शेतकऱ्यांचे भात हेच मुख्य पीक आहे. केवळ डोंगराळच नव्हे तर दुर्गमही असल्याने गावच्या विकासाला मर्यादा आल्या होत्या. हवामान आणि भौगोलिक परिस्थिती फळशेतीसाठी अनुकूल होती.

त्यातून ग्रामस्थ, तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आदींच्या चर्चेतून हापूस आंबा लागवड मोहीम राबविण्याचे नक्की झाले. त्यातून शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडांना हापूस आंब्याचे कलम करायचे ठरवले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गणेशखिंड (पुणे) येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील तज्ज्ञ व स्थानिक अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून सुमारे ६०० झाडांवर कलमे करण्यात आली.

शेतकऱ्यांनी झाडांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले. कष्टाला गोड फळे येऊ लागली. आता पुणे बाजार समितीमध्ये कोकण हापूसचा हंगाम संपल्यावर मुळशी आणि माले पंचक्रोशीतील आंबा दाखल होऊ लागला आहे.

डोंगरावर फुलले नंदनवन

ज्या डोंगराळ माळरानावर कित्येक वर्षे कुसळाशिवाय काही उगवले नाही तिथे बागायती शेती होत आहे. जमीन लागवडयोग्य होऊन सुमारे ८५ एकर क्षेत्र भात, भाजीपाला आदी पिकांखाली आले आहे. गावाच्या दक्षिणेकडील गोयंड्याचा माळ परिसरात गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. येथे पावसाच्या पाण्यावर केवळ कुसळ उगवायचे.

शेतकरी आपली जनावरे येथे चरायला घेऊन जात.. परंतु येथील लाल माती अत्यंत कसदार आहे. त्यामुळे हे माळरान शेतीसाठी विकसित करायचे असा विचार पुढे आला. त्यास कृषी विभागाने साथ दिली. त्यातून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय झाला. कृषी विभागाने सुमारे २३ लाख रुपये निधी मंजूर केला.

तालुका कृषी अधिकारी के. एम. हिरामणी, मंडल कृषी अधिकारी आर्यन कोतकर यांनी मार्गदर्शन केले. माले येथील कृषी सहायक जी. एस. जाधव, कृषीसेवक एस. बी. कंदगुळे, कोंढावळे येथील कृषी सहायक एम. सी. फासे यांनीही खाचरे तयार करण्यास मदत केली. आता हीच खाचरे शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत शेतीची साधने झाली आहेत.

Nature Tourism
Success Story : संगमेश्वर तालुक्यातील संतोष भडवळकर यांनी शेतीमध्ये मिळवली स्वयंपूर्णता

चारसूत्री भात लागवडीस प्रोत्साहन

भाताची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाच्‍या सहकार्याने सहा वर्षांपासून चारसूत्री लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यात येत आहे. बहुतांश शेतकरी त्याचा वापर करीत आहेत. त्यातून १० ते २० टक्क्यांपर्यंत एकरी उत्पादन वाढले आहे.

माले परिसरातील इंद्रायणी भात पुणे बाजारात प्रसिद्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट माले गावातून खरेदी करता येत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे.

निसर्ग पर्यटनाकडे वाटचाल

माले गाव आणि पश्‍चिम घाट परिसर पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक अज्ञात धबधबे आणि पर्यटन ठिकाणे आहेत. ही संधी साधून निसर्ग पर्यटन विकास व त्याचा आराखडा तयार करणार असल्याचे माजी सरपंच सोनल शेंडे यांनी सांगितले.

विकास साधताना तो पर्यावरणपूरक राहावा, धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण असावे यासाठी सशुल्क परवाना पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. प्रदूषण, अपघात रोखण्याचेही प्रयत्न असतील.

गावविकासातील ठळक बाबी

पाण्यासाठी बंधारे मुळशी हा अतिवृष्टीचा तालुका आहे. मात्र उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती असते. त्यावर उपाय करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत सात सलग बंधारे बांधले.

यात कृषी विभाग, जिल्हा परिषद तसेच सकाळ माध्यम समुहाच्या सकाळ सोशल फाउंडेशनचाही हातभार लागला. आता परिसरातील विहिरींचे पाणी टिकण्यास मदत झाली असून त्याचा उपयोग उन्हाळी पिकांसाठी होत आहे.

ओढ्यालगतची सुमारे १२० एकर जमीनही ओलिताखाली आली आहे. वाडी वस्त्यांवरील रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचे पक्के रस्ते बांधण्यात आले. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी शासनाच्या विविध विभागांकडून मिळाला.

दुग्धव्यवसायास चालना

शेतीला उत्पन्नाची जोड म्हणून रोजगार हमी योजनेतून १९ गोठे बांधणी व त्यासाठी ८० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. विकास सोसायटीद्वारे नऊ शेतकऱ्यांना ८० लाख रुपयांचे कर्ज गोठा उभारणी आणि म्हैस खरेदीसाठी देण्यात आले. कुक्कुटपालनासाठी प्रत्येकी ७० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. पंधरा लाख रुपये खर्चून पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी केली जात आहे.

ग्रामपंचायतीची चार मजली इमारत

गावातील कृषी संलग्न विविध कार्यालये एकाच छताखाली यावीत यासाठी ग्रामपंचायतीची चार मजली इमारत माजी संरपंच बेबीताई गोरे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आली.

यात कृषी विभाग, तलाठी कार्यालय, ई. सेवा केंद्र आदी प्रमुख सेवा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह ई. लर्निंगची सुविधा लायन्स क्लब ऑफ अशोकनगर (पुणे) यांच्याद्वारे उपलब्ध करून दिली आहे.

Nature Tourism
Success Story : संगमेश्वर तालुक्यातील संतोष भडवळकर यांनी शेतीमध्ये मिळवली स्वयंपूर्णता
वर्षानुवर्षे पडीक माळरानावर शेती करू असे स्वप्नातही वाटले नव्हते.मात्र आता वर्षातून किमान दोन पिके घेणे शक्य होणार आहे. शेती वाढविण्याची मानसिकता तयार झाली आहे.
राजेंद्र दातीर, शेतकरी
गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमातून ८५ एकर डोंगराळ जमीन शेतीयोग्य झाली. त्यामुळे शेती विकण्याच्या मानसिकतेपासून शेतकऱ्यांना दूर घेऊन जाण्यात यश आले. शेतीला शाश्‍वत पाण्यासाठी बंधारे आणि पाइपलाइन या दृष्टीने पाणी योजना राबविणार आहोत.
सोनल शेंडे, माजी सरपंच ८४८४८११२१४
गावविकासासाठी शासन आणि ग्रामस्थ एकत्रित कार्यरत आहोत. शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यत पोचविण्याचा प्रयत्न आहे.
विजय कुदळे, ग्रामसेवक, ९६२३२५०९८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com