Nashik Grape Export : दिंडोरीच्या सुरेशमामांची द्राक्ष निर्यातीत यशस्वी झेप

Grape Farming : निर्यातीतून शिल्लक राहिलेल्या दर्जेदार मालाची ते साठवणूक करतात. त्यासाठी प्रीकूलिंग व शीतगृहाची सुविधा उभारली आहे. त्यातून देशांतर्गत बाजारपेठेतही ते समाधानकारक दर मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
Grape Farming
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यातील मोहाडीचा परिसर (ता. दिंडोरी) प्रगतिशील द्राक्ष बागायतदारांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सुरेश कळमकर ऊर्फ सुरेशमामा यांची प्रगतिशील, प्रयोगशील व निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार म्हणून पूर्वीपासून ख्याती आहे. त्यांचे वडील एकनाथ यांची अवघी १३ एकर शेती होती.

त्यातील काही जिरायती तर काही बागायती होती. त्यांची मुले पंढरीनाथ, पुंडलिक व सुरेश यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर या पिढीने भाजीपाला पिकांमधून बदल साधला. सन १९८२ मध्ये ११ वीत शिकत असताना धाकटे सुरेश यांचे शिक्षण काही कारणांमुळे खंडित झाले.

पुढे मालवाहू ट्रक खरेदी करून १९९० पर्यंत मालक-चालक म्हणून माल वाहतूक व्यवसाय केला. घरची द्राक्ष शेतीही विकसित केली. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनाही द्राक्षशेतीची वाट दाखवली. आर्थिक शिस्त जपताना उत्पन्नातून जमीन खरेदी व द्राक्ष लागवड ही प्रक्रिया कायम राहिली. सव १९९१ च्या दरम्यान शेतकऱ्यांचा गट तयार करून द्राक्षांची निर्यात देखील साधली. सन १९९६ मध्ये स्वमालकीचे ३५ टन क्षमतेचे शीतगृह उभारले.

त्यातूनच ‘कळमकर ॲग्रो एक्स्पोर्ट’ नावाने उत्पादक ते निर्यातदार अशी ओळख निर्माण केली. सन २०१० मध्ये पुन्हा दोन कोटींची गुंतवणूक करून १२० टन क्षमतेची शीतकरण सुविधा उभारली. त्या वेळी निर्यातीत मोठा आर्थिक फटका बसला. सन २०१६ मध्ये संयुक्त परिवार विभक्त झाला. मात्र आजही परिवार विचाराने एकत्र नांदतो आहे.

Grape Farming
Women Agriculture Success Story: ऊस रोपवाटिकेत एका महिलेचे यश; सारिका लठ्ठे यांचा प्रेरणादायी प्रवास

निर्यातक्षम द्राक्ष शेतीचे नियोजन

आज सुरेशमामांची ३६ एकर द्राक्ष बाग आहे. त्यात रेड ग्लोब १२ एकर, क्रिमसन १३ एकर, सुधाकर सीडलेस चार एकर व आरा ३६ वाण अडीच एकरांवर आहे. यांत्रिकीकरण, काटेकोर शेती पद्धतीचा अवलंब यामुळे निर्यातक्षम गुणवत्ता त्यांनी जपली आहे. वाणांच्या चाचण्या घेण्यासाठी स्वतंत्रपणे दोन एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. रंगीत वाण क्रिमसन व सफेद वाण सुधाकर सीडलेस यांची जर्मनी, यूके, नेदरलँड आदी देशांना निर्यात होते.

तर रेड ग्लोब या रंगीत वाणाची दिल्ली, मुंबई व काही प्रमाणात आखाती देशांत विक्री होते. एकूण उत्पादनाच्या ९० टक्क्यांवर निर्यात होते. तर उर्वरित मालाची साठवणूक होते. त्यासाठी दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक एकरवर प्रत्येकी ६० टन क्षमतेची दोन शीतगृहे (कोल्ड स्टोअरेज) उभारून १२० टन क्षमतेची साठवणूक क्षमता तयार केली आहे.

तर प्रत्येकी १५ टन क्षमतेची दोन अशी ३० टन क्षमतेची प्रीकूलिंग यंत्रणा उभारली आहे. यात भावासोबत भागीदारी आहे. अपेडा व जिल्हा उद्योग केंद्राचे पाठबळही त्यासाठी लाभले आहे. ‘एकनाथ ॲग्रो एक्स्पोर्ट’ या नावाने कंपनीच विस्तार केला आहे. शीतगृह व्यवस्था गरजेनुसार निर्यातदारांना भाडेतत्त्वावर देखील दिली जाते.

Grape Farming
Success Story: मसाल्याचा सुगंध, यशाचा गंध: ‘अर्चना मसाले’ची कहाणी

साठवणूक यंत्रणेचा फायदा

सुरेशमामा म्हणाले, की एक एकरातून समजा नऊ टन माल निर्यात झाला तर उर्वरित काही कारणाने निर्यात न होऊ शकलेला दोन टन माल आम्ही शीतगृहात ठेवतो. तो त्वरित विकल्यास त्यास किलोला २५ ते ३० रुपये दर मिळाला असता.

तेच जर शीतगृहात हा माल ठेवल्यास पुढे एक, दीड महिन्याने जेव्हा बाजारात त्याचा तुटवडा तयार होतो त्यावेळी त्याला १००, १४० रुपये दर मिळतो. दोन महिन्यांनी त्याला २०० रुपये दर मिळण्याची देखील संधी तयार होते. म्हणजे शीतगृहात माल ठेवून बाजारपेठेतील आवक व दर यांचा अंदाज घेऊन पुढे विक्री केल्यास समाधानकारक दर मिळतो असा आमचा अनुभव आहे.

आम्हाला निर्यातक्षम रेड ग्लोब व क्रिमसनला किलोला १०० रुपये दर मिळतो. एकूण क्षेत्रातून शीतगृहात सुमारे ३५ ते ४० टन मालाची साठवणूक केली जाते. मागणी व पुरवठा साखळीचा अभ्यास केल्यास विक्री व्यवस्था फायदेशीर करता येते हेच सुरेशमामांच्या शेतीतून दिसून येते. शीतगृहात माल ठेवल्यास पहिल्या महिन्यात किलोला साडेचार रुपये तर दुसऱ्या महिन्यात दोन रुपये असा खर्च असतो. मात्र मिळणाऱ्या चढ्या दरांमुळे हा खर्च वजा जाऊन नफा चांगला हाती पडतो.

शेती कायम प्रगतिशील ठेवण्याचा ध्यास

कधी नैसर्गिक आपत्तीचे फटके, तर कधी शासकीय धोरणांमुळे अडचणी, अशा सर्व समस्या, तोटे सोसून अभ्यासपूर्ण शेती पद्धतीने कळमकर परिवार पुढे गेला आहे. शेतीत सर्व पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. निर्यातक्षम गुणवत्ता असल्याने किलोला १०० रुपये दर जागेवर मिळायला हवा असे नियोजन असते. सुरेशमामांनी इटली देशात भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण प्रदर्शनाला भेट दिली आहे.

त्यातून आपल्या शेतीला उपयुक्त यंत्रांची उपलब्धता केली आहे. त्यामुळे मजूरटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. दक्षिण आफ्रिका, चिली, पेरू, इस्राईल, इजिप्त या देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील प्रगत शेती तंत्रज्ञान अभ्यासले आहे. सुरेशमामांना पत्नी सुमन यांची भक्कम साथ आहे. मुले जितेंद्र, रवींद्र शेती व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देतात. स्नुषा ज्योती, स्वाती यांचीही मदत असते. सुरेशमामांना २०१५ मध्ये शेतीनिष्ठ, तर २०२१ मध्ये कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुरेशमामांची शेती अभ्यासण्यासाठी सातत्याने शेतकरी येथे भेटी देत असतात.

सुरेश कळमकर ९८९०२९०५५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com