Khandesh Papaya : खानदेशी पपईचा दिल्लीपर्यंत डंका !

अवीट गोडी, रसाळ, गुणवत्ता यामुळे खानदेशी पपईला राज्यासह राजस्थान, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. थेट शिवार खरेदी व आर्थिक आश्‍वासकता यामुळे नंदूरबारसह धुळे, जळगावात पपईचे क्षेत्र व उलाढाल वाढली असून, राज्यात खानदेशी पपईने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Khandesh Papaya
Khandesh PapayaAgrowon
Published on
Updated on

खानदेश म्हटलं, की केळी (Banana), कापूस (Cotton), भरताची वांगी व जळगावचा सुवर्ण बाजार असे चित्र समोर उभे राहते. यात पपईचेचही (Khandesh Papaya) नाव घ्यावे लागेल. कारण खानदेशच्या मातीत पपई (Papaya Production) चांगल्या प्रकारे रुजली असून, शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे. केळीनंतर पपई हेच महत्त्वाचे फळ पीक (Fruit Crop) म्हणून पाहिले जात आहे.

नंदुरबारची आघाडी

खानदेशात पपईची सर्वाधिक लागवड नंदूरबार जिल्ह्यात. त्यातही शहादा पट्टा अधिक प्रसिद्ध.

गुजरात, मध्य प्रदेश सीमेजवळील शेतकरीही शहादा परिसरातील पपई शेतीचे अनुकरण करतात.

खानदेशात पपईची एकूण लागवड सुमारे नऊ हजार हेक्टरपर्यंत. पैकी नंदूरबार जिल्हा पाच हजार हेक्टर, त्यातही शहादा तालुका साडेचार हजार हेक्टर, धुळे दीड हजार व जळगाव अडीच हजार हेक्टर असे ढोबळमानाने वर्गीकरण.

धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, तर धुळे, जळगावातील चोपडा, यावल, रावेर व जामनेर भागांत लागवड अधिक.

Khandesh Papaya
Papaya Subsidy: पपईसाठी बिहार सरकार देतंय अनुदान

वाणंची निवड

पूर्वी ७८६- तैवान या वाणाला अधिक पसंती असायची. हा वाण उत्पादनाला चांगला आहे. टिकवणक्षमता असल्याने दूरच्या बाजारपेठेसाठी चांगला मानला जातो. गर लालसर गुलाबी, पातळ असतो.

मात्र विषाणूजन्य रोगांची समस्या अधिक असते. फुलोऱ्यात हा रोग आल्यास पीक हातचे जाण्याचा धोका असतो. उपायांवरील खर्चही वाढतो. अशा जोखमा कमी करण्यासाठी शेतकरी अन्य वाणांकडे वळले.

यातील काही वाणांचे चांगले व्यवस्थापन केल्यास दोन वर्षे उत्पादन घेता येते. उंचीही जास्त होत असल्याने शिडी लावून काढणी करावी लागते. फळा साल काहीशी पातळ, गर लालसर गुलाबी असतो. टिकवणक्षमताही चांगली असते.

Khandesh Papaya
Papaya Rate : खानदेशात पपईदरात सुधारणा

व्यवस्थापनातील बाबी

खानदेशातील लागवड फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान.

तयार रोपांची लागवड. रोपे उस्मानाबाद, जळगाव, शहादा, नंदुरबार आदी भागांतून आणली जातात. प्रति रोप १४ ते १५ रुपये पोहोच असा दर.

उंच गादीवाफा पद्धतीने आठ बाय सात फूट अंतरावर लागवड. काही ठिकाणी १० बाय सहा फूट अंतर.

काळी कसदार जमीन लागवडीसाठी योग्य मानली जाते.

पीक स्फुरदयुक्त खतांच्या वापराने जोमात येते. नत्राचा वापर नियंत्रणात ठेवावा लागतो. काढणीच्या वेळी पालाशची गरज. या अनुभवानुसार शेतकऱ्यांचे नियोजन.

बाग स्वच्छ ठेवावी लागते. विषाणूजन्य रोगग्रस्त पाने बाहेर काढावी लागतात.

सखल भागात पावसाळ्यात पाणी साचल्यास मर रोग येण्याची भीती.

केळीच्या तुलनेत कमी पाणी लागते. काढणीच्या वेळेस गरज अधिक.

पपईचे बेवड केळीसाठी लाभदायी मानले जाते. यामुळे तापी, गिरणा, अनेर नदीकाठचे शेतकरी किमान दोन वर्षांतून एकदा पपईची लागवड करतात.

हाताळणी व वाहतूक

काढणी केलेली फळे प्लॅस्टिक टोपल्यांत ठेवून बांधापर्यंत आणली जातात. बाहेरील वातावरणापासूनसंरक्षण होण्यासाठी ती पेरपरमध्ये गुंडाळली जातात. ट्रकमध्ये गवत अंथरून धक्का बसणार नाही अशी पद्धतशीर रचली जातात.

पपईची खानदेशात थेट शेतातून खरेदी होते. क्रेटचा वापर पॅकिंगसाठी टाळला जातो. कारण वाहतुकीदरम्यान बाहेरील वातावरणाचा थेट संपर्क येऊन फळ पिकून नुकसान होण्याची भीती असते.

उत्पादन

एकरी ६० ते ७० हजार रुपये उत्पादन खर्च. चांगले व्यवस्थापन करून एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन शेतकरी साध्य करतात. दर घसरल्यास आर्थिक गणित बिघडते.

दर (रुपये प्रति किलो) : सन २०२०- सुरुवातीला १२ ते पाच. सरासरी सात. सन २०२१- १२ ते तीन रु. सरासरी चार रु. कोविड काळात दरांना फटका बसला. सन २०२२- सुरुवातीला (नोव्हेंबर- डिसेंबर) २४ रु. अलीकडे १२ रु.

मुख्य बाजार दिल्लीचा

पपई उष्ण कटीबंधीय पीक आहे. उत्तर भारतात त्याचे उत्पादन कमीच आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाना येथे थंडीच्या काळात खानदेशातील पपईला उठाव असतो.

मध्य प्रदेशातील रतलाम, इंदूरच्या बाजारातही खानदेशातून पपई जाते. खानदेशात नोव्हेंबरमध्ये काढणी सुरू होते. त्या वेळी नंदुरबार, धुळे व जळगावात मिळून प्रतिदिन ५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) आवक असते.

डिसेंबरमध्ये १५० ट्रक, जानेवारीत २०० आणि फेब्रुवारीत ती १८० ते २०० ट्रक दरम्यान असते. मार्चमध्ये थंडी कमी झाल्याने आवक कमी होते. आवकेनुसार मार्चनंतर दरांत बदल होतात.

शहादा झाले केंद्र

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आवकेतील ६० टक्के हिस्सा दिल्लीच्या आझादपूर मंडीचा असतो. उर्वरित माल पंजाब, हरियानात जातो. दिल्ली, राजस्थानातील खरेदीदार शहादा दाखल होतात. काही खरेदीदार तर येथे व्यापारानिमित्त स्थायिक झाले आहेत. येथूनच पपईचे दर खानदेशसाठी जाहीर होतात. पपईच्या दृष्टीने शहादा केंद्र बनले आहे.

पद्माकर पाटील ९३७१७२२१००

संदीप पाटील ९०७५४५७६६५

(सायंकाळी सहा ते रात्री नऊ वेळेतच संपर्क)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com