नाशिक जिल्ह्यातील खामखेडा (ता. देवळा) हे गाव गिरणा नदीकाठी (Girana River) वसले आहे. ग्रामविकासात (Rural Development) आपली ओळख निर्माण करण्याबरोबरच प्रयोगशील वृत्तीने येथील शेतकऱ्यांनी शेतीविकासातही (Agriculture Development) आपले प्रावीण्य सिद्ध केले आहे. एकवेळी नदीकाठी मुबलक पाणी असल्याने उसाच्या लागवडी (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणावर होत्या.
मात्र ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाल्याने वीस वर्षांत त्या कमी झाल्या. त्यानंतर टोमॅटो, कोबी, कांदा, ढोबळी व साधी मिरची, कलिंगड आदी पिके येथे रुजू लागली. सुधारित तंत्र व नावीन्यपूर्ण पद्धतीची जोड देत गुणवत्ता व एकरी उत्पादनात शेतकऱ्यांनी वाढ साधली.
वर्तमान शेती पद्धती
-गावचे भौगोलिक क्षेत्र १३८० हेक्टर. पैकी कृषक क्षेत्र ८०५ हेक्टर.
-सिंचन स्रोतांचा विकास केल्याने गाव १०० टक्के ओलिताखाली. विहिरी, गिरणा नदी व डोंगराच्या कडेला सुळे डावा कालवा यांचा फायदा.
-पर्जन्यमान चांगले असल्याने भूजलपातळी वाढली आहे.
-खरिपात सुमारे ७०० ते ८०० एकरांवर कोबी लागवड.
-आदर्श पद्धतीने उन्हाळी कांदा उत्पादन. साहजिकच प्रत्येकाच्या घरासमोर अद्ययावत बांधलेल्या कांदाचाळी दिसून येतात.
-फळपिकात डाळिंब, द्राक्ष व अन्नधान्यांत मका, बाजरी.
-२५ हून अधिक शेतकऱ्यांकडे कुक्कुटपालन. मका उत्पादन मोठया प्रमाणावर असल्याने कुक्कटपालनात प्रक्रियेसाठी स्थानिक विक्री.
-पदवीधर तरुण शेतकरी प्रयोगशील वृत्तीने राबत असल्याने कष्ट आणि प्रयोगशीलतेचा संगम आढळून येतो. त्यातूनच अर्थकारण सक्षम करून शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे येथे पाहायला मिळते. त्यामुळेच गावात कृषी समृद्धी नांदते. कृषी, बँकिंग, आरोग्य, वाहतूक अशा सेवा येथे उपलब्ध झाल्या आहेत.
गाव म्हणजे कोबीचे आगार
सन २००० नंतर उसाचे क्षेत्र कमी होत असताना गावातील बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी
अन्य गावांची प्रेरणा घेत कोबी घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आव्हाने होती. मात्र व्यवस्थापन सुधारून व अभ्यासातून शेतकरी या पिकात तरबेज झाले. पाच गुंठ्यांपासून ते ७ ते ८ एकरांपर्यंत लागवडी करणारे शेतकरी येथे दिसतात. खरीप हंगामात लागवडीला सर्वाधिक पसंती असते.
मे महिन्यापासून शेतकरी गादी वाफ्यावर रोपेनिर्मितीला सुरुवात करतात. जमिनीचा प्रकार, उतार आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सरी वरंबा अथवा सपाट वाफ्यावर लागवड होते. मुबलक चांगले
कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, पोटॅश यांचा जमिनीच्या मगदुराप्रमाणे वापर होतो. जमिनीत वाफसा तपासून प्रवाही व सूक्ष्म पद्धतीने सिंचन होते. वाणांच्या कालावधीनुसार लागवडीपासून ७० ते ७५ दिवसांत ऑक्टोबरअखेर काढणी होते.
अर्थकारण उंचावले
दरवर्षी कोबीच्या दरांत चढ उतार पाहायला मिळते. ज्या काळात हे पीक गावात रुजले, त्या वेळी विक्री व्यवस्था सक्षम नव्हती. शेतकरी गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा, बिल्लीमोरा या बाजारात नेऊन मालाची विक्री करत. परराज्यांतील बाजारपेठांच्या मागणीप्रमाणे वाण, गड्डे आकार, वजन या बाबींकडे त्यांनी लक्ष दिले. आता गुजरातसह राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातील व्यापारी
खामखेड्यात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ तळ ठोकून असतात. थेट बांधावर थेट काट्यावर वजन होऊन रोख व्यवहार होतात. एकरी सरासरी १५ ते २०, २५ टनांपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता किमान १० रुपये प्रति किलो दर मिळाला तरी अपेक्षित उत्पन्न मिळते असे शेतकरी सांगतात. गावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्यास व शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यास हे पीक कारणीभूत ठरले आहे.
फलोत्पादनात आघाडी, रोजगार संधी
दहा वर्षांत कलिंगड व खरबूज लागवडी वाढल्या असून, त्याखालील एकूण क्षेत्र १५० पासून ते २०० एकरांपर्यंत असावे. रमझान सणासाठी मुख्य नियोजन होते. हैदराबाद, दिल्ली अहमदाबाद, सुरत, बंगळूर येथे मोठी मागणी असते. गावातील काही शेतकऱ्यांची हिरवी मिरची युरोपापर्यंत निर्यात झाली आहे. नियमित पुरवठा वाशी येथे असतो. स्थानिक सुमारे १५ व्यापारी, तर बाहेरील ४० व्यापारी येथे कार्यरत असल्याने अर्थकारणाला गती मिळाली आहे. त्यातून शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळते.
फलोत्पादनात आघाडी घेतल्याने निविष्ठा, रोपवाटिका असे व्यवसाय गावात नावारूपाला आले आहेत. साहजिकच शेतीकामांपासून ते वाहतुकीपर्यंत रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक तरुणही संधी ओळखून सेवा पुरवठादार म्हणून व्यापाऱ्यांसोबत काम करतात. काही तरुण स्वतः आपला माल बाजारपेठेत पाठवितात.परिसरातील ३०० हून अधिक जणांना हंगामी चार महिने रोजगार येथे मिळतो. प्रति व्यापाऱ्याकडे गावातील २५ ते ३० तरुणांची टोळी असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.