Orange Orchard : परभणी तालुक्यातील कणे कुटुंबाची संत्रा फळबाग, आंतरपिके अन् एकी

Inter Crop Management : परभणी जिल्ह्यातील मांडाखळी (ता. परभणी) येथील कणे या संयुक्त कुटुंबाने संत्रा फळबाग हे मुख्य पीक निश्‍चित केले. त्यासाठी सक्षम सिंचन व्यवस्था तयार केली. सोयाबीन, कापूस व भाजीपाला या आंतरपिकांची जोड दिली. जोडीला शेडनेट तंत्रज्ञान स्वीकारलं. सर्व प्रयत्नांतून कुटुंबाने खर्च, जोखीम व मजूरटंचाईवर मात करीत शेती नफ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
Orange Orchard
Orange OrchardAgrowon

Success Story : मांडाखळी (ता.जि. परभणी) येथील गावाला अलीकडील वर्षांत तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. गावातील रामराव कणे यांचे नऊ सदस्यांचे संयुक्त कुटुंब आहे. रामरावांना दोन मुले. मोठा विनायक दहावी इयत्तेनंतर वडिलांसोबत १५ वर्षांपासून शेती करतो.

धाकटा किशन यांनी एमए.एमएड. पर्यंत पदवी संपादन केली. स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न केले. परंतु लॉकडाउननंतर ते पूर्णवेळ शेती करीत आहेत. कणे यांची १२ एकर शेती आहे. पैकी १० एकर मध्यम भारी तर दोन एकर हलकी जमीन आहे. वीस वर्षांपूर्वी सिंचनासाठी पुरेसे पाणी नव्हते.

परिसरात काहींच्या संत्रा बागा होत्या. त्या यशस्वी झाल्या होत्या. कणे यांनीही या पिकाचा प्रयोग करायचे ठरविले. पण त्याआधी सिंचन सुविधा बळकट करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विहिरीचे खोलीकरण करून २०१२ मध्ये अडीच एकरांत संत्रा लागवड केली.

विहीर, बोअर, शेततळे आदी सुविधा टप्प्याटप्प्याने उभारत २०१७ व २०२० असा संत्रा बागेचा विस्तार केला. आज मंत्र्याची सुमारे ११०० झाडे असून, अंदाजे क्षेत्र सात ते आठ एकर असावे.

बागेत आंतरपिके

संत्रा बागेतून उत्पादन सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्या काळात बाग चार वर्षांची असताना सोयाबीन, मिरची, टोमॅटो आदींचे आंतरपीक घेण्यात येते. बाग तीन वर्षांची असताना त्यात कापूस घेण्यात येतो.

मंत्र्याच्या दोन ओळींमध्ये २० फूट, काही क्षेत्रात १८ फूट व काही ठिकाणी १५ फूट अंतर आहे. त्या जागेत आंतरपिकांचे नियोजन होते. सोयाबीनच्या एकूण लागवड क्षेत्रातून ८,९ ते १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

सोयाबीनची काढणी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या काळात मिरची, टोमॅटोसारखे पीक असते. दरांप्रमाणे नफा मिळतो. काही वेळा दर खूप खाली येतात. मात्र ही आंतरपिके काही हजारांपासूनचा नफा देऊन जातात. त्यातून संत्रा बागेचा खर्च कमी होतो.

Orange Orchard
Orange Orchard Management : अमरावतीतील बोदड येथील विपुल चौधरी यांचे संत्रा नियोजन

कपाशीचे नियोजन

पूर्वी रेखाट्याने रेषा ओढून पावसाच्या आगमनानुसार जमिनीत पुरेशा ओलावा निर्माण झाल्यावर कणे पेरणी करायचे. अलीकडील वर्षांत पावसाच्या आगमनाच्या वेळा बदलत आहेत. आता उत्पादकता चांगली मिळण्याच्या हेतूने एक ते सात जून या कालावधीत लागवडीवर भर राहिला आहे. ठिबक सिंचन व विद्राव्य खतांचाही वापर केला जातो.

गुलाबी बोंड अळीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांचे डिसेंबरपर्यंत चांगले उत्पादन मिळते. फरदडचे उत्पादन घेत नाहीत. कपाशीनंतर रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. त्यातून पीक फेरपालट देखील होते.

बोंड अळीचे जीवन चक्र खंडित होते. पुढील वर्षीच्या हंगामात तिचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पूर्वी कोरडवाहू क्षेत्रात कपाशीचे एकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन मिळत असे. आता सुधारित व्यवस्थापनातून एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे.

संत्रा उत्पादन व शेडनेटमधील शेती

मंत्र्याच्या अडीच एकर बागेतून पाच वर्षांपासून उत्पादन मिळत आहे. व्यापारी बागेत येऊन खरेदी करतात. यंदा व्यापाऱ्यांकडून मनासारखा दर न मिळाल्याने किशन यांनी काही शेतकऱ्यांसोबत स्वतः हैदराबाद गाठून तेथील बाजारपेठेत संत्रा विक्री केली.

स्थानिक ठिकाणी क्रेटला चारशे रुपये दर सुरू असताना तेथे ९५० रुपये दर मिळाला. शेतीला २०१९ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १० गुंठे क्षेत्रावरील शेडनेट शेतीची जोड दिली आहे. त्यात ढोबळी मिरची, काकडी उत्पादन घेण्यात येते. परभणी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री होते. रोपांचीही निर्मिती केली जाते.

संरक्षित सिंचन व्यवस्था

मंत्र्याची झाडे भरपूर आहेत. शिवाय अन्य पिकांचीही विविधता असल्याने पाण्याची व्यवस्था शाश्‍वत असावी लागते. सन ०१९ मध्ये कृषी विभागाच्या योजनेतून ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराच्या शेततळ्याची उभारणी केली आहे.

पावसाळ्यात शेततळ्यामध्ये पाणी भरून घेतले जाते. पावसाचा खंड काळ तसेच उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग होतो. सौर कृषिपंप बसविला आहे. त्यामुळे भारनियमनाच्या काळात पिकांना गरजेनुसार वेळेवर पाणी देता येत आहे.

Orange Orchard
Fruit Crop Insurance : संत्रा, लिंबू द्राक्षासाठी फळपीक विमा योजना

कुटुंबाची एकी ठरली महत्त्वाची

संयुक्त कुटुंब व सर्वांचे शेतीत श्रम हीच केणे यांच्या फायदेशीर शेतीची मुख्य बाजू ठरली आहे. विनायक, पत्नी शारदा, किशन, पत्नी राधा व दोन्ही भावांची आई सुशीला व वडील रामराव असे हे कुटुंब आहे. विनायक यांची दोन मुले शिकत असून, सुट्टीच्या दिवसात ती शेतीत मदत करतात. एक बैलजोडी आहे.

गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. ॲग्रोवन, त्यातील लेख- यशोगाथा, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून केणे ज्ञानवृद्धी करीत असतात.

संपर्क - किशन कणे, ९६०४८२०४२३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com