Milk Business Update : मोहिते कुटुंबीयांचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय. आधी दोन म्हशींपासून घरापुरते दूध उत्पादन घेतले जात होते. कल्पना मोहिते यांनी पती संभाजी यांच्या साथीने घरगुती दूध उत्पादनाला व्यावसायिक स्वरूप दिले आहे.
सध्या त्यांच्याकडे मुऱ्हा जातीच्या १२ म्हशी, २ रेडे आणि ४ एचएफ गाई आहेत. एका गायीपासून साधारण २० लिटर, तर एका म्हशीपासून १० ते १२ लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते. जनावरांसाठी मुक्त व बंदिस्त पद्धतीचा गोठा उभारला आहे.
म्हशींचा भाकड काळ हा गायींच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे गोठ्यात गायी व म्हैस दोन्हींचे संगोपन करीत व्यवसायात समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतनावर भर दिला जातो.
व्यवस्थापनातील बाबी
- मुक्त संचार पद्धतीने जनावरांचे व्यवस्थापन.
- प्रति जनावर १२ किलो चारा तर ५ किलो पूरक खाद्य दिले जाते.
- ओल्या चाऱ्यामध्ये हत्तीगवत, मुरघास, ऊस इ. तर पूरक खाद्यामध्ये सरकी, गोळी पेंडीचा समावेश.
- गहू भुस्सा, हरभरा, मका, खनिज मिश्रणे, मीठ, सोडा आदींचाही वापर.
- नियमितपणे लसीकरण.
- गोठ्यात पंखे, सीसीटीव्ही, इन्व्हर्टर इ. अत्याधुनिक सुविधा. ऋतुनुसार व्यवस्थापनात योग्य ते बदल.
चारा पिकांची लागवड
चारा विकत घेऊन दुग्ध व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यासाठी स्वतःच्या तीन एकरांपैकी अर्ध्या एकरांत हत्ती गवत, तर दोन एकरांत ऊस लागवड केली आहे. यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी स्वतःच्या शेतामध्ये चारा पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरते, असे कल्पनाताई सांगतात.
...असे आहे अर्थकारण
गोठ्यातून प्रतिदिन सरासरी ६० ते ९० लिटरपर्यंत दूध संकलन होते. म्हशींचे ४० लिटर, तर गाईंचे ५० लिटर दूध असते. म्हशीच्या दुधाचे फॅट ७.५, तर गाईंच्या दुधाचे फॅट ४ च्या पुढे असते. काही दूध रतिबास, तर उर्वरित दुधाची दूध संघास विक्री होते. यातून महिन्याला सव्वा लाख रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळते. याशिवाय वर्षाला ४० गाड्या शेणखत मिळते. प्रति ट्रॉली २ हजार रुपये दराने विक्री होते.
बचत गटातही सक्रिय
कल्पनाताई बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांसोबत संपर्कात आहेत. पंचायत समितीच्या ‘ध्रुव स्वयंसाह्यता महिला बचत गटा’च्या माध्यमातून काम करतात. महिलांना शेतीविषयक उपक्रम आणि दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन करतात. कृषी सहायक संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून विविध योजनांबाबत मार्गदर्शन मिळते.
गोठा व्यवसायातून आर्थिक प्रगती
गोठ्यातील उत्पन्नातून मोहिते कुटुंबीयांनी आर्थिक प्रगती साधली आहे. घुणकी येथे जागा खरेदी, अजित व ओंकार या दोन्ही मुलांचे शिक्षण हे सर्व गोठ्यातून मिळालेल्या उत्पन्नामुळेच शक्य झाल्याचे कल्पनाताई सांगतात. गांडूळ खत आणि व्हर्मिवॉश निर्मितीतून उत्पन्नाचा स्रोत वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गोठा, घरकामांचा बॅलन्स
कल्पनाताई दररोज पहाटे ५ वाजता गोठ्यावर जाऊन स्वच्छता, चारा व पाणी, धारा इत्यादी कामे करतात. सर्व कामे ९ वाजेपर्यंत पूर्ण करून घरातील कामे करण्यास माघारी जातात.
पुन्हा संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत गोठ्यातील कामे आणि नंतर घरचे काम करतात. अशारितीने घरकाम व गोठा व्यवस्थापन यांचा समन्वय पती संभाजी यांच्या साथीने कल्पनाताई राखतात.
संपर्क - कल्पना मोहिते ७५१७६२७३६७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.