Water Prosperity : जेऊर गाव जलसमृद्धीकडे

Article by Sandip Navle : पुणे जिल्ह्यात सासवड तालुक्याच्या दक्षिणेस असलेल्या जेऊर गावात मागील काही वर्षांत जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली. त्याअंतर्गत झालेल्या जलसंधारण कामांचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेच.
Water Prosperity
Water ProsperityAgrowon

संदीप नवले

पुणे- पंढरपूर रस्त्यावर जेऊर (ता. सासवड, जि पुणे) हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. पावसाचे प्रमाण या भागात अत्यंत कमी आहे. गावाचे क्षेत्रफळ साधारणपणे ८०० हेक्टर तर पर्जन्यमान सरासरी ४५० मिलिमीटर आहे.

अनेक वेळा त्यापेक्षाही कमी पाऊस पडतो. उदाहरण द्यायचे तर मागील वर्षी ३५० मिमी.च्या दरम्यान पाऊस झाला. गावात जलपुनर्भरणाची पुरेशी कामे होत नसल्याने बागायती क्षेत्राचे प्रमाण कमी होते. उलट जिरायती क्षेत्रामध्ये वाढ होत होती.

Water Prosperity
Success Story : ‘डॉक्टर’चा व्यावसायिक शेतीचा आदर्श

परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार

गावात जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने १० ते १२ वर्षांपूर्वी गावात तीन माती नाला बांध तयार केले. गावात लागवडीयोग्य क्षेत्र सुमारे ६०० हेक्टर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र बागायती पिकांखाली आणण्यासाठी ग्रामस्थही पुढे सरसावले. ‘सकाळ फाउंडेशन’ची सर्वतोपरी मदत मिळाली. विहीर पुनर्भरण, सलग समतल चर अशी कामे हाती घेण्यात आली.

गेल्या वर्षी गावात सुमारे दोन लाख रुपयांचे तर चालू वर्षी सहा लाख रुपयांचे ओढा खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आली. गावातील ओढ्यावर तीन सिमेंट बंधारे आहेत. त्यातील सुमारे सहा हजार घनमीटर गाळ उपसा मागील वर्षी लोकसहभागातून झाला. मागील वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसात या कामांचे परिणाम दिसून आले. कामे झालेल्या ठिकाणी पाण्याचा चांगला संचय झाला.

त्याचा लाभ परिसरातील सुमारे २५ विहिरी आणि ८ ते १० बोअरवेल्स यांना झाला. सुमारे १०० ते १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली. या फलश्रुतीमुळे ग्रामस्थांचा उत्साह अजून वाढला. त्यानंतर एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ओढ्यातील गाळ उपसण्याचा निर्णय चालू वर्षी घेण्यात आला. यामुळे जेऊर, पिसुरटी, मांडकी या गावांमधून जाणाऱ्या ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बागायतीकडे वाटचाल

गावाजवळून वीर धरणाचा नीरा डावा कालवा गेला आहे. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी पाणी पट्टी भरून पाणी घेतात. वर्षात तीन ते चार वेळा कालव्याला पाणी येत असल्याने गावात बारमाही पाण्याची उपलब्धता झाली आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय गावाजवळून नीरा नदी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांनी वैयक्तिक आणि सामूहिक उपसा सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत.

गावात सुमारे ५० एकर क्षेत्र पडीक असून येत्या काळात हे क्षेत्रही लागवडीखाली येणार आहे. सध्या गावात दीड-दोन हजार जनावरे आणि ६०० ते ७०० पर्यंत शेळ्या-मेंढ्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता झाल्याने चारापिके घेतली आहेत. त्यातून दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. गावातील रब्बी, उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या गावात उसाचे प्रमाण मोठे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, केळी, आले आदी पिके घेतली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढीस बळ मिळत आहे.

Water Prosperity
Bundle Formation Technology : ऊस पाचट गाठी बांधणी व्यवसायाने दिला रोजगार

ठिबक सिंचनाकडे कल

जेऊर गावातील शेतकऱ्यांमध्ये पाण्याविषयी जागृती तयार झाली आहे. त्यासाठी पूर्वी गावात प्रशिक्षणे घेण्यात आली. कृषी विभागाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास सहलीचे नियोजनही करण्यात आले होते. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, नाशिक येथील सहयाद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, बारामती कृषी विज्ञान केंद्र, राजगुरूनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय आदी विविध ठिकाणांना शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. आज गावांत सुमारे ७०-८० एकरांवर ठिबक सिंचनाचा अवलंब आहे. सोबत प्लॅस्टिक मल्चिंगचाही वापर सुरू झाला आहे.

परिस्थितीत बदल

गावात सुमारे बाराशे एकर क्षेत्र उसाखाली आले आहे. शेतकरी एकरी ८० ते ९० टनांपर्यत उत्पादन घेत आहे. सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याला उसाचा पुरवठा होतो. गावातून सुमारे ५० ते ५५ हजार टन ऊस गाळपासाठी जात असून त्या माध्यमातून गावात काही कोटी रुपयांची उलाढाल होत

आहे. पूर्वी गावातील शेतकरी साध्या घरात राहायची. आता त्यांनी चांगली घरे बांधली आहेत. घरापुढे ट्रॅक्टर, चारचाकी वाहने दिसताहेत. शेती अवजारांसह ऊस तोडणी यंत्रेही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. त्यांची मुले उच्चशिक्षण घेत आहेत.

गावातील विकास कामे

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पाइपलाइन करण्यात आली आहे. त्यातून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. चालू वर्षी उन्हाळ्यातही गावाने योग्य नियोजन केल्याने पाण्याची अद्याप टंचाई भासलेली नाही. गावातील खंडोबा, भैरवनाथ, महादेव, हनुमान, कानिफनाथ आदी मंदिरे व दर्गा यांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गावांत सर्वधर्मसमभावातून एकीचे वातावरण जपण्यात आले आहे.

वृक्षारोपणावर भर

गावात ग्रामपंचायतीने पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत विविध वृक्षांची लागवड केली आहे. ‘सीएसआर’ निधी व गावातील काही व्यक्तींकडील आर्थिक मदतीच्या आधारे कुस्ती आखाडा बांधण्यात आला आहे. रस्ते चांगले होऊन वाहतुकीची व्यवस्था झाली आहे. कृषी विभागाच्या सहकार्यातून डाळ मिल उभी राहिली आहे.

लोकसहभागातून गावात जलसंधारणाची विविध कामे दरवर्षी हाती घेतली जातात. त्यातून गावाला पाण्याची शाश्‍वती तयार होऊन भूजल पातळीतही वाढ होत आहे.

हिराबाई धुमाळ, सरपंच, जेऊर,

ज्ञानेश्‍वर धुमाळ, माजी सरपंच, जेऊर (९६२३६३१०००)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com