Sugarcane Production : माळरानावर पूर्वहंगामी उसाचे एकरी १०५ टन उत्पादन

पुणे- चिंचवड स्थित सुरेश चिंचवडे यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्राचा अवलंब करून पूर्वहंगामी उसाचे एकरी ८५ ते ९० टन उत्पादकता वाढविण्यात व राखण्यात यश मिळवले आहे.
Sugarcane Production
Sugarcane ProductionAgrowon

Pune Sugarcane Story : पुणे- चिंचवड येथील सुरेश धोंडू चिंचवडे यांची चिंचवड व मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले अशा दोन ठिकाणी शेती आहे. दोन्ही मिळून सुमारे नऊ एकर त्यांचे उसाचे क्षेत्र असते. खरे तर मावळ तालुक्यात (Maval Taluka) पाऊस जास्त असतो.

हा पट्टा भातासाठीही ओळखला जातो. ही परिस्थिती आणि हवामान यांचा अभ्यास करून सुरेश यांनी येथील आपल्या डोंगराळ माळरानात सुधारित व शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसशेतीत बदल करायचे ठरवले.

ऊसशेतीतील प्रयोग

१) सुरेश ‘ॲग्रोवन’चे सन २००७ पासून नियमित वाचक आहेत. त्यातील यशोगाथा, लेख व बातम्यांचा बारकाईने अभ्यास ते करतात. त्यांनी अनेक महत्त्वाची कात्रणे काढून त्यांचा संग्रह केला आहे.

कृषिभूषण संजीव माने, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (व्हीएसआय) शास्त्रज्ञ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी जयवंत भोसले व आप्पासाहेब सोनवणे यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले.

मावळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आडसाली हंगामापेक्षा पूर्वहंगामी लागवडीवर (ऑक्टोबर) त्यांनी भर दिला.

२) पूर्वी साडेतीन फूट सरीत लागवड व्हायची. व्यवस्थापनात सुधारणा करताना जमिनीचा प्रकार व चढ-उतार समजून घेतला. त्यानुसार रोपे पद्धतीचा वापर व साडेचार बाय दीड फूट पद्धतीने लागवड केली जाते.

सुटसुटीत अंतरामुळे रोपांची चांगली वाढ होते. मुरमाड जमिनीत अंतर जास्त, तर काळ्या जमिनीत काहीसे कमी ठेवले जाते.

Sugarcane Production
Sugarcane Harvesting : खानदेशात ऊस तोडणी पूर्णत्वाकडे

३) लागवडीपूर्वी प्रथम ऊस पाचटाच्या कुट्टीचा वापर, तसेच साखर कारखान्याकडील ७५ ब्रास प्रेसमड याचा वापर सुरू केला आहे. एप्रिलच्या दरम्यान ताग पेरणी होते. तो पुढे जमिनीत गाडून घेतला जातो.

४) बेसल डोसमध्ये डीएपी, पोटॅश, गंधक, मॅग्नेशिअम सल्फेट, दाणेदार कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर होतो. सरीच्या बगलेला नांगरी मारून चर तयार करून खते मातीआड केली जातात. टप्प्याटप्प्याने जिवाणू खतांचाही वापर होतो.

५) जिवामृताच्या वापरावर भर दिला आहे. दोन गायी आहेत. त्यांचे शेणखत उपलब्ध होते. काही गोमूत्र शेतकऱ्यांकडून घेतले जाते. पाचशे लिटर टाकीत जिवामृताचे द्रावण तयार केले जाते.

ते ‘फिल्टर’ करून दर १, १० आणि २० तारखेला ठिबकमधून द्रवरूप प्रमाणात पिकाला देण्यात येते.

६) फुले २६५ या वाणाचा वापर करतात. त्याचबरोबर व्हीएसआय १८१२१, को व्हीएसआय ०३१०२ आदी वाणांचेही प्रयोग करून पाहिले आहेत.

७) गावात तलाव असल्याने त्या ठिकाणी विहीर घेऊन अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. ठिबक सिंचनाचा वापर होतो. मात्र पाण्याची गरज जास्त असते. अशा वेळी महिन्यातून एखादे पाणी पाटाने दिले जाते.

८) उच्चांकी ऊस उत्पादनवाढीसाठी मातीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा असतो. त्याला सुरेश यांनी अधिक महत्त्व दिले आहे. उन्हाळ्यामध्ये जमिनीची आडवी-उभी नांगरट होते. लागवड, खोडवा व निडवा अशी तीन पिके ते घेतात.

निडवा काढल्यानंतर एकरी ५ ते १० ट्रेलर शेणखताचा, तसेच हिरवळीच्या खतांचाही वापर होतो. प्रत्येक वेळी माती परीक्षण करूच खतांचे नियोजन केले जाते. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचू नये म्हणून निचरा तंत्राचा वापर होतो. ‘सबसॉयलर’चाही वापर होतो.

Sugarcane Production
Sugar factory : थोरात साखर कारखान्याकडून ऊस पिकासाठी विविध योजना

उत्पादनात वाढ

पूर्वी उसाचे एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. अलीकडील वर्षांत पूर्वहंगामी उसाच्या उत्पादनात एकरी ८५ ते ९० टनांपर्यंत सातत्य ठेवले आहे. तीन वर्षांपूर्वी आडसाली उसाचे एकरी १०२ टनांपर्यंत उत्पादन घेतले होते.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तुटलेल्या पूर्वहंगामी उसाचे (व्हीएसआय १८२१२) एकरी १०५ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. गाळपाला जाणाऱ्या उसाची संख्या ४० हजार ते ४३ हजारांपर्यंत ठेवण्यात येते.

लागवडीच्या उसाचे उत्पादन चांगले असल्याने खोडव्याचे एकरी ६५ ते ७८, तर निडव्याचे ५० ते ५५ टन उत्पादन मिळते. लागवडीच्या उसाचा उत्पादन खर्च एकरी ८० रुपयांपर्यंत, तर खोडव्याचा खर्च ६० हजार रुपयांपर्यंत येतो.

मावळातील श्री. संत तुकाराम सहकारी कारखान्याला ऊसपुरवठा होतो. त्यास प्रति टन २७०० रुपये दर मिळतो.

सन्मान

सुरेश यांना यंदाचा महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तो वितरित करण्यात येणार आहे.

सुरेश चिंचवडे, ९८५०९२५०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com