
Agriculture Success Story : परभणी ते ताडकळस राज्य रस्त्यावर परभणीपासून २२ किलोमीटरवर शिरकळस (ता. पूर्णा) हे गाव आहे. येथील गुलाबराव ग्यानबाराव भोसले यांची मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. सिंचनासाठी गावातील घरासमोरील बोअरवरुन पाइपलाइनद्वारे शेतामध्ये पाणी नेले आहे. शेतात एक बोअर व सौर कृषिपंपाची सुविधा आहे.
एकत्रित कुटुंब पद्धतीत पूर्वी चार बंधूंच्या भोसले कुटुंबाची १२ एकर शेती होती. त्या वेळी वर्षभर टोमॅटो, फ्लॉवर, टरबूज आदींसह विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जात असे. कालांतराने कुटुंबाची विभागणी झाली. गुलाबराव यांच्या वाट्याला अडीच ते पावणेतीन एकर जमीन आली. शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे, मात्र शेतीच्या आवडीतून त्यातील ज्ञान ते सातत्याने अवगत करीत गेले.
जांभळाची निवड, नियोजन
पुणे जिल्ह्यात अभ्यास सहलीत गुलाबरावांना जांभूळ शेतीविषयी माहिती मिळाली. त्यांनी जांभूळ उत्पादकांची भेट घेऊन शेतीतील बारकावे जाणून घेतले. अलीकडील वर्षात पारंपरिक पीक पद्धतीतून शाश्वत उत्पन्न मिळत नसल्याची समस्या आहे. त्यामुळे शेतकरी पर्यायी सक्षम फळपिकांकडे वळले आहेत. जिल्ह्यात सातत्याने उद्भविणारी दुष्काळी स्थिती विचारात घेऊन गुलाबरावांनी जांभळाची निवड केली. सुमारे पावणेतीन एकर एकूण शेतीपैकी दोन एकर क्षेत्राची निवड केली. साधारण २०१० चा हा काळ.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण बहाडोली हे वाण विकसित केले आहे. प्रति नग १५० रुपये दराने १०० रोपे बारामती येथील रोपवाटिकेतून खरेदी केली. जून महिन्यात
लागवड केली. पहिले दोन वर्षे लहान रोपांचे वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून बांबू किंवा काठीचा आधार दिला. पाच वर्षांनी फळधारणा सुरू झाली. परंतु झाडांची उंची व आकार कमी होता. फळेही कमी लागली. सन २०१५ च्या दुष्काळात काही झाडे वाळून गेली. अनेक झाडांची वानरांनी नासधूस केली. सन २०१८ पासून व्यावसायिक पद्धतीचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
सध्या जांभूळ बागेत सुमारे ६० ते ७० झाडे उत्पादनक्षम आहेत. सन २०१९ पासून पीक व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहेत. आता झाडांची उंची, आकार वाढला आहे. वजनाने फांद्या मोडत आहेत एवढी फळे लगडत आहेत. जानेवारीत महिन्यात बहर येतो. त्या वेळी मधमाश्यांमुळे परागीभवन होते. दरवर्षी २० मेपासून फळे टप्प्याटप्प्याने काढणीस येऊ लागतात.
जून ते जुलैच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यापर्यंत फळांचा हंगाम सुरू असतो. पानझड झाल्यानंतर त्याचे आच्छादन तयार होते. त्यातून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जानेवारीत फुलधारणा झाली की मेपर्यंत दर दहा ते बारा दिवसांनी प्रवाही पद्धतीने पाणी देण्यात येते. फुलोरा अवस्थेत कीडनाशकांच्या गरजेनुसार फवारण्या होतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावण्यात येतात. बागेत मोकळ्या जागेत जनावरांसाठी चारा किंवा सोयाबीन घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात येते.
टपोऱ्या जांभळांना पसंती
दररोज दुपारनंतर फळे काढणीचे काम सुरू होते. झाडांची उंची वाढल्याने शिडी लावून काढणी करावी लागते. काहीवेळा वारे-वादळांमुळे फळे गळून पडतात. वानर मोठ्या प्रमाणावर नासधूस करतात. त्यामुळे नुकसानही बरेच होते. सध्याची पंधरा वर्षे वयाची झाडे प्रति झाड दोन ते अडीच क्विंटल उत्पादन देत आहेत. फळाचे वजन ३० ते ३३ ग्रॅमपर्यंत साध्य केले आहे. क्रेटमध्ये भरून जांभळे परभणी येथील बाजारांमध्ये विक्रीसाठी नेण्यात येतात.
वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर स्वतः गुलाबराव किंवा त्यांचे पुतणे पंढरीनाथ आणि उमेश जांभळाची थेट ग्राहकांना विक्री करतात. उत्पादन अधिक मिळत असल्याने सर्व विक्री थेट करणे शक्य होत नाही. त्यामुळे परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केट किंवा व्यापाऱ्यांना विक्री होते.
थेट विक्रीत हंगामाच्या सुरुवातीच्या काळात किलोला २५० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळतो. पुढे दर घसरून १५० ते २०० रुपयांवर येतात. व्यापाऱ्यांना १०० ते १३० रुपये दराने विक्री होते. दर्जेदार, रसरशीत टपोऱ्या जांभळांना व्यापारी व ग्राहकांची चांगली पसंती असते. अनेक ग्राहक गुलाबरावांकडून नियमित खरेदी करतात.
घरच्यांची मोठी साथ
गुलाबराव यांना शेतीत पत्नी गिरिजा यांची मोठी साथ मिळते. मुलांपैकी सुमीत व वसुधा परभणी येथे शिक्षण घेत आहेत. तर नीलेश पुणे येथे लष्करी सेवेत भरती होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. सुट्ट्यांच्या दिवशी मुले शेतात आई-वडिलांना मदत करतात. जांभूळ बागेव्यतिरिक्त जागेत टोमॅटो, फ्लॉवर आदी पिके असतात. घरचे सदस्यच राबत असल्याने मजुरांवरील खर्च कमी केला आहे.
गुलाबराव महाराज अशी ओळख
वारकरी संप्रदायातील गुलाबरावांना गायन, भजनाची आवड आहे. हरिनाम सप्ताहामध्ये ते कीर्तन करतात. त्यांची परिसरात गुलाबराव महाराज म्हणून ओळख आहे. ‘ॲग्रोवन’चे ते सुरुवातीपासूनचे वाचकही आहेत. भाजीपाला, फलोत्पादनविषयक माहितीसह शेतकऱ्यांच्या यशोगाथांमधून जांभूळ लागवडीविषयी माहिती मिळाली. शिवाय गावातील वकील माधवराव भोसले व भाऊ संजयराव भोसले यांचीही प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात उर्वरित एकरवर जांभूळ लागवडीचेच नियोजन आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.