Agricultural Story : सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. तर गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. अशावेळी पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीतील फळबाजारात फळांची रेलचेल वाढली आहे.
यातील अनेक फळांमध्ये सीताफळाचाही प्रामुख्याने समावेश होतो. गेल्या वर्षी पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांत कमी पाऊस झाला. यंदा पश्चिम महाराष्ट्रात उन्हाळ्यात तापमान तीव्र झाले होते.
चालू वर्षी सातत्याने व जास्त पाऊस पडत असल्याचाही फटका बसत असल्याचा फटका सीताफळाला बसला आहे. उत्पादन कमी असल्याने पुणे बाजारपेठेत आवकेवरही परिणाम झाला आहे.
बाजारपेठेत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून दररोज २०० ते २५० क्रेटची आवक सुरू असून दरही चांगले मिळत आहेत. मागील आठवड्यात या फळाने प्रति किलो ३०० रुपयांपर्यंत भाव खाल्ला आहे. किरकोळ ग्राहकांना प्रति किलो ३२५ ते ३५० रुपये दराने ते खरेदी करावे लागत आहे.
पुरंदररमधून मोठी आवक
सीताफळासाठी पुरंदर तालुक्यातील हवामान पोषक आहे. साहजिकच त्याचे क्षेत्रही सुमारे दोन हजार ते तीन हजार हेक्टरपर्यंत आहे. मजुरांमार्फत काढणी करून योग्य प्रतवारी करून क्रेटमधून त्याची पुणे येथील मार्केटमध्ये पाच ते सहा महिने मोठ्या प्रमाणात आवक सुरू असते. येथून किरकोळ विक्रेत्यांना पुढे विक्री होते.
काही व्यापारी गोवा येथेही माल पाठवितात. बाजारपेठेत दोन प्रकारच्या सीताफळांची आवक होते. यात गावरान वाणाला प्रति किलो ४० ते ३०० रुपयांपर्यंत तर मोठ्या आकाराच्या किंवा गोल्डन वाणाला १०० रुपये व त्यापुढे दर मिळतो. सध्या पुरंदर भागातून आवक सुरू असली तरी पुढील कालावधीत बीड, नगर भागांतून आवक सुरू होणार आहे.
उलाढाल
सर्वसाधारणपणे जून ते डिसेंबरपर्यंत सीताफळाचा हंगाम सुरू असतो. पुणे मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजेच जून ते ऑगस्टमध्ये चांगले दर असतात. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवक वाढून दर काही प्रमाणात घसरतात. दिवाळीनंतर पुन्हा दुसऱ्या बहरातील
फळांची आवक सुरू होते. परंतु ती कमी असल्याने पुन्हा दर वाढण्यास सुरुवात होते. डिसेंबर अखेरीस दर चांगलेच वाढलेले दिसून येतात. त्यामुळे सहा महिन्यांच्या काळात कमी अधिक उलाढाल व दर असतात. अलीकडील काळात सीताफळाच्या रबडीसाठी गरालाही मागणी वाढली आहे. त्यातून अनेक पल्प निर्मितीचे उद्योग उभे राहिले आहेत.
गावरान सीताफळाची वैशिष्ट्ये
ए ग्रेडच्या फळांचे वजन
२०० ते ४०० ग्रॅम.
चवील चांगली, गोड.
फळांना चमक.
गराचे प्रमाण चांगले, टिकवण क्षमता अधिक, मागणी चांगली काढणी केल्यानंतर चार ते पाच दिवस टिकते.
रबडीसाठी सर्वाधिक उपयोग. त्यामुळे ग्राहकांकडून तसेच प्रक्रिया व्यावसायिकांकडून कायम मागणी.
उलाढालीची आकडेवारी- प्रातिनिधिक
वर्ष आवक (क्विंटल) सरासरी दर प्रति क्विंटल उलाढाल (रु.) अंदाजे
२०२१-२२ ४३,१४८ ५५०० २३ कोटी, ७३ लाख.
२०२२-२३ ५१,४५० ५००० २५ कोटी, ७२ लाख ५० हजार.
२०२३-२४ ५४,९२७ ४०५० २२ कोटी २४ लाख ५४ हजार.
स्रोत - गुलटेकडी बाजार
...असे असतात दर
कालावधी आवक (क्रेट संख्या) सरासरी दर
रु. प्रति किलो
आॅगस्ट, सप्टेंबर २०० ते २५० ५० ते ३००
सप्टेंबर ते डिसेंबर ३०० ते ४०० २०-२००
सध्याची स्थिती
प्रकार दर (रुपये)
जंबो २०० -२५०
ए ग्रेड (मोठा आकार) १००-१२०
मध्यम- (दुसऱ्या क्रमांकाची ग्रेड) ५० ते ६०
लहान आकार २० ते ३०
शेतकरी अनुभव :
पुरंदर, वडकी या भागांत शेकडो हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. वडकी येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत फाटे आपला अनुभव सांगताना म्हणाले की माझ्याकडे गावरान वाणाची सुमारे ७०० झाडे आहेत. वडिलोपार्जित बागा जतन केल्या आहेत. सर्व शेती रासायनिक अवशेषमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. एकूण ७०० झाडांपैकी २०० झाडांचे योग्य नियोजन करून उन्हाळी बहर धरला होता. यंदा पाणीटंचाईमुळे फळे उशिरा काढणीस आली आहेत. मात्र मालाची प्रत चांगली असल्यानेप्रति किलो किमान २०० रुपये व त्यापुढे दर मिळेल अशी आशा आहे. मागील वर्षी प्रति किलो ३६१ रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला होता.
शशिकांत फाटे ९८५००४३७३७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.