Water Conservation : एकीच्या बळातून पुसली दुष्काळी गावची ओळख

Horticulture : कापूस, केळी, कलिंगड, पपई पिकांमध्ये ओळख तयार केली. या कामांची दखल घेऊन गावाला सन्मानही प्राप्त झाला. ‘जल है तो कल है’ हा संदेशच गावाने प्रत्यक्ष कृतीतून खरा ठरवला.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Rural Development Success Story : जळगाव जिल्ह्यातील सोनाळे (ता.जामनेर)हे सुमारे २५०० लोकसंख्येचे गाव असून शिवार ३०० हेक्टर पर्यंत आहे. दुष्काळी अशीच गावची पूर्वीची ओळख होती. नदीसारखा मुख्य जलस्रोत नव्हता. जानेवारी, फेब्रुवारीतच पिण्याच्या पाण्याची समस्या तयार व्हायची. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवर झुंबड उडून वेळ व श्रम वाया जायचे. मोजके शेतकरीच रब्बी किंवा बागायती पिके घेऊ शकत होते.

शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर कशी होईल यासाठी अखेर लोकशक्ती एकवटली. सन २०१८ मध्ये ‘पाणी फाउंडेशन च्या मदतीने ग्रामस्थांनी हिरिरीने जलसंधारणाची कामे सुरू केली. एका संस्थेकडून यंत्रांची मदत झाली. सुमारे ४५ दिवस अखंड श्रमदान चालले. यात ग्रामस्थांसह जामनेर तालुक्यातील शेती व वैद्यकीय तज्ज्ञांनीही भाग घेतला.सुमारे साडेचार लाख रुपये निधीचे ग्रामस्थांनी संकलन केले.

Water Conservation
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

कामांची फलश्रुती

पाच नाल्यांचे खोली-रुंदीकरण, बांध बंदिस्ती, पाणी अडवा- पाणी जिरवा, वैयक्तिक व सामुहिक शेततळी, नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी छोटे बंधारे आदी कामे सुमारे चार किलोमीटर परिघात झाली. खरिपातील पावसानंतर फलश्रुती दिसू लागली.

विहिरींची पाणीपातळी वाढली. सुमारे ८० टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. दुष्काळग्रस्त अशी ओळख पुसून बागायतदारांचे गाव म्हणून सोनाळे पुढे आले. आज पूर्वहंगामी ९० टक्के तर एकूण बागायती कापूस क्षेत्र १५० ते १७० हेक्टरवर तर केळीखालील क्षेत्र ९० ते ९५ हेक्टरवर पोचले आहे.

सोनाळ्याचा कापूस व केळी खानदेशात प्रसिद्ध होऊन बाजारातील दरांपेक्षा अधिक दर त्यांना मिळत आहे. कलिंगड, पपईची लागवड व लोकप्रियताही वाढत आहे. कापसाला शंभर टक्के ठिबक असून एकरी उत्पादकता नऊ क्विंटलपर्यंत आहे. व्यापारी गावात येऊन कापूस तसेच मक्याची थेट खरेदी करतात. कापसाला दोन वर्षांपासून आठ हजार रुपये तर मक्याला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

‘फार्मर कप स्पर्धेतही सहभाग

सोनाळेच्या शेतकऱ्यांनी ‘फार्मर कप स्पर्धेतही २०२२ मध्ये सहभाग नोंदविला. यात २२ शेतकऱ्यांचा गट तयार झाला. शेतीचे उत्पादन वाढवणे व खर्च कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. सुमारे ४४ एकरांत कापूस लागवड झाली.

सहा लाख रुपयांच्या निविष्ठांची खरेदी सामुहिक स्तरावर झाली. त्यातून निविष्ठा दर्जेदार मिळण्यास मदत झाली. एकात्मिक कीड नियंत्रणावर भर देत पिवळे चिकट सापळे, दशपर्णी अर्क, जैविक कीडनाशके यांचा वापर झाला. या उपक्रमातून खर्चात सुमारे २५ टक्के बचत झाली.

सेंद्रिय कापूस उत्पादन

सेंद्रिय कापूस उत्पादनही शेतकऱ्यांनी या उपक्रमातून साध्य केले. पुणे येथील प्रयोगशाळेत शास्त्रीय पृथ्थकरणाद्वारे त्याची गुणवत्ता तपासण्यात आली. ‘फार्मर कप’ स्पर्धेत गावाने तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला.

एक पाऊल पुढे जात कापसाच्या गाठी निर्मितीचाही ग्रामस्थांनी विचार सुरू केला. त्यासाठी गटाने खानदेशातील जिनींग- प्रेसिंग कारखान्यांना भेट दिली. अद्याप काही तांत्रिक अडचणींमुळे कापसावर प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसले तरी पुढील काळात शेतकरी त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Water Conservation
Water Conservation : जलसंधारणातून समृद्धीकडे वाटचाल

महिला गट सक्रिय

गावात २५ महिला गट असून जलसंकट दूर करण्यासह दुग्धोत्पादन, शेळीपालनात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. कर्जाची परतफेड करण्यातही त्यांची तत्परता आहे. त्यांच्या कष्टी, जिद्दी वृत्तीमुळे गावाच्या प्रगतीला हातभार लागला आहे. अलीकडे केळी व व्यावसायिक पीक पध्दतीच्या विकासामुळे दुग्ध व्यवसाय काहीसा दुय्यम झाला आहे.

सोनाळेतील विकास कामे

  • गावातील मुख्य रस्त्यांवर सहा हजार वृक्षांची लागवड. त्यांच्या संवर्धनाचीही ग्रामस्थांनी घेतली जबाबदारी. प्रत्येक झाडाला ठिबकची व्यवस्था.

  • वृक्ष लागवड परिसराला मजबूत कुंपण. त्यातून जैवविविधता व वृक्षसंरक्षणास मदत.

  • दरवर्षी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सहारा अनाथालयास आर्थिक वा धान्य स्वरूपात ग्रामस्थांकडून मदत. त्या प्रेरणेतूनच गावात सहारा पाणी फाउंडेशन गटाची स्थापना. यात दीपक पाटील, प्रमोद शिंदे, सत्यवान पाटील, योगेश गुरव, शांताराम पाटील, संतोष पाटील, संदीप माणिक पाटील, संदीप परभत पाटील, संदीप धनराज पाटील, रघुनाथ गाडेकर, दीपक अरुण पाटील, दीपक बापू पाटील, अनिल पाटील, पवन पाटील, प्रल्हाद चौधरी, गजानन पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विजय पाटील, रोहन पाटील, ईश्वर थिटे, परीक्षित पाटील, प्रशांत पाटील, अमोल पाटील आदींचा समावेश.

  • जलसंधारणातील शिल्लक निधीचाही योग्य विनियोग. ‘वॉटर कप’ स्पर्धेत गावाचा तिसरा क्रमांक.

  • मिळालेल्या रोख बक्षिसांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत खेळ, स्पर्धासंबंधीचे साहित्य, प्रत्येक वर्गात दूरचित्रवाणी संच वाटप. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहन.

  • ग्रामपंचायतीकडून एक रुपयात एक लिटर तर पाच रुपयांत १० लिटर शुद्ध (आरओ) पाणी.

  • पाण्याच्या काटकसरीचे महत्त्व जपण्यासाठी एक दिवसाआड पुरवठा. पिण्याच्या पाण्याच्या समान वितरणासाठी तोट्यांची यंत्रणा.

मुख्य व अंतर्गत रस्त्यांमध्ये काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक्स.

संदीप पाटील ९४२१५१७७३६

(शेतकरी व सहारा पाणी फाउंडेशन गट सदस्य. सोनाळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com