Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून आहेर परिवाराने दुग्धव्यवसायाची कशी केली भरभराट?

हिंगोली जिल्ह्यातील पिंपळगाव कुटे (ता.वसमत) येथील सोनाजी आहेर यांनी अल्प शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसायाची कास धरली. एकत्रित कुटुंबपद्धती व प्रत्येक सदस्याचे श्रम, जबाबदारी यातून दुग्धव्यवसायाचा विस्तार झाला. दुधाच्या अर्थकारणाबरोबर संकलन केंद्र व प्रक्रियेद्वारे उत्पन्नस्त्रोतही वाढविणे शक्य झाले आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

success story In Dairy Business : हिंगोली- परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर वसमत तालुक्यात पिंपळगाव कुटे गाव आहे. पूर्णा नदीकाठची खोल काळी कसदार सुपीक जमीन गावाला लाभली आहे. येथील अनेक शेतकरी दुग्धव्यवसायात (dairy business) आहेत. सोनाजी योगाजी आहेर त्यापैकी एक. त्यांना रामेश्वर आणि गजानन ही मुले आहेत.

गावापासून अर्धा किलोमीटरवर चार एकर जमीन, सिंचनासाठी बोअर व्यवस्था आहे. पूर्णा नदीवरून पाणी आणले आहे. सोनाजी यांचे थोरले बंधू लिंबाजी (शिक्षक) यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार २०१-११ मध्ये संकरित जर्सी गाय घेऊन दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.

हळूहळू व्यवसायाची गोडी वाढत गेली. पुढील वर्षी आणखी एक गाय खरेदी केली. दुधाचे प्रमाण प्रति दिन २५ लिटरच्या आसपास पोचले. दुग्धोत्पादनात सरस आणि भाकड काळ कमी असल्यामुळे होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) जातीच्या गायींच्या संगोपनावर भर देण्याचे ठरविले.

लोणी (जि.नगर) येथून गायींची खरेदीही झाली. रामेश्वर आणि गजानन यांनी नगर, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातील यशस्वी पशुपालकांच्या भेटी घेऊन व्यवस्थापनाची माहिती घेतली. त्यातून व्यवसाय विस्तार सुरू केला.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसाय आहे प्रगतीचा राजमार्ग

जनावरे व्यवस्थापन

-आजमितीला लहान-मोठी धरून गायींची संख्या ३० पर्यंत.

-रेतनासाठी एचएफ जातीचा जातिवंत वळू. आनुवंशिक कारणास्तव दर दोन वर्षांनी तो बदलण्यात येतो.

-सुरवातीची वर्षे पत्र्याचे छत असलेला बंदिस्त गोठा होता. सन २०१८ मध्ये

गोठ्यालगत मोकळ्या जागेत ११० बाय ८० फूट जागेत मुक्त संचार गोठा तयार केला. त्याच्या

चारही बाजूंनी लोखंडी जाळी व कुंपण. दोन्ही गोठ्यात गायींना ये-जा करण्यासाठी छोटा दरवाजा.

-जमिनीवर सिमेंट क्रॉंक्रीटची फरशी. गोठा स्वच्छ राखण्यास त्यामुळे मदत होते. विटा- सिमेंट वापरून गव्हाण.

-उन्हाळ्यात योग्य तापमान राखण्यासाठी फॉगर्स.

-सिमेंटच्या नालीव्दारे गोमूत्र संकलन. त्याचा शेतीत वापर.

-मुक्त संचार गोठ्यात कडुनिंब व अन्य झाड. त्यामुळे गायी विश्रांती घेऊ शकतात.

-चार एकरांवर चारा उत्पादन. खरिपातील सोयाबीनचा भुस्सा तर रब्बीत ज्वारीचा कडबा उपलब्ध होतो.

-सुपर नेपियर गवताची दीड एकरांवर लागवड. उर्वरित क्षेत्रात मका आणि ऊस आहे. नेपियर गवत आणि उसापासून मुरघास निर्मिती होते. त्यामुळे पौष्टिक चारा उपलब्ध होतो. सरकी पेंड, खुराक, भरडधान्याचा भरडा खुराक म्हणून दिला जातो.

-दर सहा महिन्यांनी लाळ खुरकूत, घटसर्प प्रतिबंधक लसीकरण. गोचीड, ताप प्रतिबंधक औषधे दर तीन महिन्यांनी देण्यात येतात. लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरणही केले आहे. मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

व्यवसायाचे अर्थकारण

गायींची संख्या कमी होती त्यावेळी हाताने दूध काढले जायचे. संख्या वाढल्याने तसेच ‘हायजेनिक’ दुधासाठी आता मिल्किंग मशिनचा वापर होतो. प्रति दिन ३००, ३५० लिटर दूध संकलन यंदा ४०० लिटरपर्यंत पोचले आहे.

गेल्या वर्षीपर्यंत शासकीय डेअरीला दूध दिले जायचे. परंतु केंद्र बंद झाल्यापासून अन्य डेअरीला पुरवठा होतो. फॅट व ‘एसएनएफ’ नुसार प्रति लिटर साडे ३७ रुपये दर मिळत आहे.

या डेअरीचे दूध संकलन केंद्र गावात असून ते कमिशनपोटी आहेर चालवतात. त्याद्वारे स्वतःकडील व गावातील अन्य शेतकऱ्यांकडील मिळून ८५० लिटरपर्यंत दूध उपलब्ध होते.

उत्पन्नाचे वाढविले स्रोत

सुमारे २०० पर्यंत गावरान कोंबड्यांचे पालन मुक्त संचार गोठ्यात केले जाते. त्यामुळे गायी गोचीड व अन्य किडीपासून मुक्त राहतात. अंडी आणि कोंबड्याच्या विक्रीतून वर्षाला ५० हजारांपासून ते कमाल एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते.

शासकीय दूध संकलन बंद झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. अशा स्थितीत दुधावर प्रक्रिया करण्याचे ठरविले. यंत्र सामग्री खरेदी करून पनीर, खवा, दही आदी पदार्थ तयार करून परभणी, नांदेड येथे विक्री केली जाते.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसाय दुसऱ्या श्‍वेतक्रांतीच्या दिशेने...

कुटुंब राबतंय व्यवसायात

सोनाजी यांचे पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असे मिळून ११ सदस्यांचे कुटुंब आहे. दोन्ही मुले पूर्णवेळ दुग्धव्यवसायात स्थिरावली आहेत. त्यामुळे सोनाजी यांना मोठा आधार मिळाला आहे. प्रत्येक सदस्याकडे कामांची जबाबदारी वाटून दिली आहे.

त्यातून मजुरांवरील अवलंबित्व व खर्च कमी केला आहे. कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता उत्पन्नातील पैशांची बचत करून टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा विस्तार केला आहे. दोन मजली घराचे बांधकाम केले आहे. परंतु गेल्या वर्षापासून कुटुंब शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आले आहे.

या ठिकाणी बायोगॅसची सुविधा आहे. बोअरवर सौर पंप बसविले आहेत. खंडित वीजपुरवठ्याला पर्याय म्हणून जनरेटरची व्यवस्था आहे. मुबलक पाणी आहे.सकस चारा आहार यामुळे दर्जेदार दूध उत्पादन मिळते. दूध वाहतुकीसाठी वाहने, मिनी ट्रॅक्टर, कार आहे. येत्या काळात गायींची संख्या वाढविण्याचा मानस आहे.

संपर्क - रामेश्वर आहेर- ७८७५००३७१४, सोनाजी आहेर- ७८७५१२२२०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com