Geranium and Chia Farming : जिरॅनियम तेलनिर्मिती अन् चियाची शेती

Success Story of Farmer : अमरावती जिल्ह्यात शेंदूरजनाघाट येथील यश गणोरकर या अवघ्या तेवीस वर्षे वयाच्या उच्चशिक्षित तरुणाने संत्रा पट्ट्यात दोन नव्या प्रयोगांचे धाडस केले आहे. जिरॅनियमची लागवड, तेलनिर्मिती व औषधी गुणधर्माच्या चियाची शेती त्याने सुरू केली आहे.
Farming
FarmingAgrowon

Oil Production and Medicinal Chia : विदर्भातील वरुड-मोर्शी हा राज्यातील प्रसिद्ध संत्रा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हटले जाते. वरूड तालुक्‍यातील शेंदूरजनाघाट येथील यश गणोरकर हा तेवीस वर्षे वयाचा युवक सध्या शेतीत आत्मविश्‍वासपूर्वक विविध प्रयोग करीत आहे.

‘एमएससी’ची (इंडस्ट्रिअल केमिस्ट्री) पदव्युत्तर पदवी त्याने घेतली आहे. तर मुक्‍त विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने ‘एमबीए’ (मार्केटिंग)देखील तो करतो आहे.

जिरॅनियम शेतीची कल्पना

यश गणोरकर कुटुंबाची वडिलोपार्जित तीन एकर ६० गुंठेच शेती आहे. त्याचे वडील शेतीच करतात. संत्रा हेच त्यांचे मुख्य पीक. एकेदिवशी नगर-शिर्डी भागात यशला जिरॅनियमची शेती व तेलनिर्मिती युनिट पाहण्यास मिळाले.

उत्सुकतेने तेथे जाऊन पाहणी केली. हा प्रयोग आश्‍वासक वाटल्याने तेथे तो दोन दिवस राहिला देखील. घरी परतल्यावर त्याने या प्रयोगाची संकल्पना वडिलांना सांगितली. मात्र आपल्या भागात हा प्रयोग म्हणजे मोठी जोखीम वाटून वडिलांनी त्यास नकार दिला. पण जिद्दी यशने त्यांना शिर्डी भागात नेत हा प्रयोग प्रत्यक्ष दाखवत त्याचे महत्त्व पटवून दिले.

Farming
Chia Cultivation : वसमत तालुक्यात होतेय चिया पिकाची लागवड

प्रयोगाचे केले धाडस

यशने ४० एकर शेती कराराने करण्यास घेतली आहे. त्यात सुरुवातीला अडीच एकरांत सन २०२२ मध्ये जिरॅनियमचा प्रयोग सुरू झाला. नगर जिल्ह्यातील नेवासा येथून सहा रुपये प्रति रोप याप्रमाणे अडीच एकरांसाठी ३६ हजार रोपे आणली. गादीवाफे, ‘इनलाइन ठिबक’, ‘झिगझॅग’ पद्धतीने चार बाय सव्वा फूट अंतरावर लागवड केली.

याची लागवड ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत केली जाते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. जिरॅनियमच्या विशिष्ट गंधामुळे वन्यप्राणी त्याकडे फिरकत नाहीत. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे उत्पादन घेता येते. दर तीन महिन्यांनी एकदा याप्रमाणे वर्षातून चार वेळा कापणी. एकरी १० ते १२ टन पाला मिळतो. यंदा १२ एकरांवर लागवड आहे.

वीस लाखांची गुंतवणूक करून डिस्टिलेशन युनिटची (तेलनिर्मिती प्रकल्प) उभारणी. त्यासाठी पोकरा प्रकल्पातून १२ लाखांचे अनुदान.

यंत्रणेत गरम वाफ कंडेन्सरमध्ये येऊन ती थंड केली जाते. त्यानंतर तेल व अन्य घटक वेगळे होतात. नेहमीच्या युनिटमध्ये ३९ कंडेन्सर्स असतात. पण यशने आपले औद्योगिक रसायनशास्त्र विषयातील ज्ञानाचा वापर केला. त्यातून तेलाचा अधिकाधिक ‘आउटपुट’ मिळण्यासाठी युनिटमध्ये बदल केला.

३९ ऐवजी ६९ ‘कंडेन्सर्स’ बसवून घेतले.

तेल उत्पादन

एक टन पाल्यापासून एक लिटर तेल मिळते. पण यश यांना सर्वोच्च तेल रिकव्हरी १ लिटर ६९८ मिलि एवढी मिळाली आहे. वर्षभरात एकूण ४० ते ४५ लिटर तेल मिळते.

यशने परिसरातील काही शेतकऱ्यांना देखील जिरॅनियम लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. एकूण मिळून ३५० ते ४०० लिटर तेल उपलब्ध होते.

Farming
Geranium Oil Extraction : जिरॅनियम तेलकाढणीचे सुरू केले फिरते युनिट

बाजारपेठ

जिरॅनियम तेल सुगंधी व औषधी असल्याने त्यास औद्योगिक, औषधी, सौंदर्यप्रसाधने, ‘परफ्युम’ आदीं उद्योगांमधून मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने यशने ‘सोशल मीडिया व या क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांशी संपर्क साधत जिरॅनियम तेल व्यावसायिकांचे संपर्क मिळविले.

त्यांच्याकडून बाजारपेठ व बारकावे घेतले. दरम्यान, १९३९ पासून या तेलाच्या व्यवसायात असलेल्या मुंबईतील एका कंपनीला यश तेलाचा पुरवठा करतो आहे. त्यास १२ हजार रुपये प्रति लिटर दर मिळतो आहे.

प्रति टन पाल्यापासून तेलनिर्मितीतील काही घटकांचा खर्च (रुपये)

दोन मजुरांचा खर्च प्रति दिवस १०००

६० ते ७० किलो लाकूड २१०

वीज खर्च ३०

पाला कापणी खर्च मजुरी ६००

वाहतूक १२५

तेलाचा मुंबईत पुरवठा ५५०

चिया शेतीचा प्रयोग

जिरॅनियम शेतीच्या जोडीला यशने चिया शेतीचेही धाडस केले आहे. तो सांगतो की या पिकात ओमेगा-३, ओमेगा-६ ही महत्त्वाची फॅटी ॲसिड्‍स, कॅल्शिअम, प्रथिने आहेत. त्याच्या बिया मधुमेह, शर्करा नियंत्रण, वजन कमी करणे आदींसाठी गुणकारी आहेत.

मध्य प्रदेशात निमच येथील बाजारपेठेत गेला असताना यशला या चिया बियांचा शोध लागला. तेथील शेतीही त्याने पाहिली. बाजारपेठ व दरांचाही अभ्यास केला. तेथूनच बियाणे खरेदी केले. सुरुवातीला पाच एकरांवर लागवड केली. पहिल्या वर्षी चांगला अनुभव आल्यानंतर यंदा क्षेत्र २५ एकरांवर नेले आहे. चिया बियाण्यांचा दर १५०० रुपये प्रति किलो असून, सुमारे साडेतीन महिने कालावधीचे हे पीक आहे.

बाजारपेठ

यश सांगत, की चियाच्या बियांसाठी निमच ही मोठी आणि मुख्य बाजारपेठ आहे. औषधी उत्पादनात त्याचा समावेश केला जातो. त्यामुळे मागणी अधिक असते. त्यास २० ते २५ हजार रुपये प्रति क्‍विंटल दर मिळतो. सन २०२१-२२ मध्ये यश यांना २८ हजार रुपये दर मिळाला. त्या दराने १७ क्‍विंटल बियांची विक्री करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com