Banana Production : केळीसह नगदी पिकांत गाढोदेची ओळख

सुधारित व्यवस्थापन व तंत्राचा वापर करून गाढोदे (ता. जि. जळगाव) गावाने केळी पिकात नाव मिळवले आहे. कापूस, रब्बी मका आदी पिकांतही ओळख तयार केली आहे. नगदी पिकांखालील १०० टक्के क्षेत्र सूक्ष्मसिंचनाखाली आणले आहे. पाण्याबाबत जागरूक झालेल्या या गावाने दुग्ध व्यवसायाची परंपरा जपताना आध्यात्मिकता व धार्मिक सलोखाही जपला आहे.
Banana Papaya
Banana Papaya Agrowon

गाढोदे (ता. जि. जळगाव) गावाला तापी व गिरणा नदीचा (Girana River) लाभ आहे. ‘तापी’चा कूपनलिकांना अधिक लाभ होतो. कारण वर्षातील अनेक दिवस ती प्रवाही असते. दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले हे गाव जळगाव शहरापासून ३५ किलोमीटरवर आहे.

इथली जमीन काळी (Black Soil) कसदार, मध्यम आहे. तीन हजार लोकसंख्या, तर १६०० हेक्टर क्षेत्र आहे. केळी प्रमुख पीक (Banana Crop) असून, ७०० ते ८०० हेक्टर त्याचे क्षेत्र आहे. खरिपात कापूस (Cotton) तर रब्बीत मका (Rabi Maize), काबुली हरभरा, कलिंगड आदी पिके असतात.

Banana Papaya
Horticulture : फलोत्पादनासह जपला एकात्मिक शेतीचा पॅटर्न

पाण्याबाबत जागरूकता

पूर्वी जलसाठे मुबलक असल्याने अनेक शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करायचे. पण मध्यंतरी पाऊस कमी असताना जलसंकट तयार झाले त्या वेळी शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले. तापी आणि गिरणेच्या लाक्षक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १०० टक्के सूक्ष्मसिंचन करून घेतले.

आज बहुतांश सर्व पिके ठिबकवर आहेत. ऊस, गहू ही पाण्याची अधिक गरज असलेली पिके मात्र शिवारात फार दिसत नाहीत. पाणी वापराचे काटेकोर नियोजन गावातील शेतकऱ्यांनी केले आहे. मागील तीन वर्षे पाऊसही चांगला आहे.

केळीत स्वीकारले बदल

पूर्वी केळीत पारंपरिक पद्धतीचे व्यवस्थापन असायचे. गुणवत्तेअभावी हवे तसे दर मिळत नव्हते. मग सुधारित तंत्रज्ञान अंगीकारायचे अशा निर्धार झाला. आता कंदांऐवजी उती संवर्धित रोपे, पीक फेरपालट, काटेकोर सूक्ष्मसिंचन, ‘फ्रूट केअर’ तंत्र या बाबी अमलात आल्या. गावातील तरुण, अभ्यासू शेतकरी यात आघाडीवर राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळू लागले.

Banana Papaya
Papaya Market : खानदेशात पपई दर स्थिर

पुढील बाबींवर राहिला भर

फुलकिडी रोखण्यासाठी निसवणीनंतर ‘बड इंजेक्शन’, फ्लोरेट काढणे, बागा स्वच्छ ठेवणे, करपा निर्मूलनासाठी सामूहिक व्यवस्थापन, रसायन अवशेषमुक्त उत्पादनासाठी शिफारशीत कीडनाशके व अन्य बाबींचा वापर, घडांना स्कर्टिंग बॅगांचा वापर, केळीचे अवशेष शेतात गाडून जमिनीची सुपीकता ठेवणे. केळीसाठी पपई, काबुली हरभऱ्याचे बेवड लाभदायी असते. यामुळे या पिकांची लागवडही वाढली.

गुणवत्ता वाढली, फायदा झाला

सुधारित व्यवस्थापनामुळे १४ ते १५ किलोपर्यंत मिळणारी रास १९ किलोपर्यंत वाढली. गुणवत्ता सुधारली. खरेदीसाठी निर्यातदार कंपन्या, त्यांचे एजंट येऊ लागले. केळीची आखातासह उत्तर भारतात खरेदीदार साठवणूक करतात. पूर्वी फक्त कांदेबाग (सप्टेंबर व ऑक्टोबर) लागवड असायची.

आता मे व जूनमध्येही ती होऊ लागली. अशा रीतीने दोन टप्प्यांत लागवड करून एकूण जोखीम कमी करण्याचा व नफा मिळविण्याचा गावातील शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. तीन वर्षांपासून ७००, ९०० ते १२०० रुपये, कमाल १७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

Banana Papaya
Yellaki Banana : जळगाव जिल्ह्यात येल्लकी केळीखालील क्षेत्र वधारतेय

कापूस पीक उशिरा लागवडीला पसंती

शिवारात सुमारे ५०० हेक्टरवर कापूस असतो. गेली तीन वर्षे डिसेंबरमध्ये गुलाबी बोंड अळी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी नियोजनात बदल केला आहे. लागवड जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात होते. यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिपावसाचा फटकाही फारसा बसलेला नाही.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे अळीला थोपविण्याचा प्रयत्न आहे. यात निंबोळी अर्काची फवारणी, कामगंध सापळ्यांचा उपयोग होतो. डिसेंबरमध्ये पीक काढून क्षेत्र रिकामे केले जाते. पऱ्हाटी किंवा प्रादुर्भावीत अवशेष नष्ट केले जातात.

शाश्‍वत पाणी असलेले शेतकरी या शेतात गहू, मका घेतात. फरदडविना एकरी आठ क्विंटल उत्पादकता शेतकऱ्यांनी साध्य केली आहे. तीन वर्षे सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर जागेवरच मिळाला आहे. थेट विक्रीवर अनेकांचा भर आहे.

मका पिकात लष्करी अळीला अटकाव

रब्बीत मका व काबुली हरभऱ्याखालील क्षेत्र अधिक असते. मक्यात अमेरिकन लष्करी अळी रोखण्यासाठीदेखील शेतकरी तीन वर्षे सतत एकात्मिक कीड व्यवस्थापनाची कार्यवाही करीत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशी व कार्यवाहीच्या सूचना शेतकऱ्यांनी अमलात आणल्या. पोंग्यात दाणेदार कीटकानशकाचा वापर केला. यामुळे मका उत्पादनातील घट कमी झाली आहे. एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

गावाचे नाव उंचावणारे ग्रामस्थ

तालुक्याच्या राजकारणात विविध पदांवर कार्य करण्याची संधी ग्रामस्थांना मिळाली आहे. पंचायत समितीत मंगला गोपाळ पाटील यांनी तर जळगाव बाजार समितीत गोपाळ फकीरचंद पाटील यांनी सभापतिपद भूषविले आहे.

जळगाव शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघात रामचंद्र सीताराम पाटील यांनाही अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. युवक किरण सुरेश पाटील अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान विषयातील अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

गावची लेक रूपाली डोंगर पाटील यांनी ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवा सुरू केली आहे. परेश राजेंद्र पाटील, महेंद्र मधुकर पाटील, गजानन मच्छिंद्र पाटील, प्रशांत रामकृष्ण पाटील पोलिस सेवेत, तर विशाल पाटील सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत आहेत.

गावातील ठळक बाबी

दुग्ध व्यवसाय- सुमारे ६० वर्षांची परंपरा असलेली माउली सहकारी दूध उत्पादन संस्था गावात कार्यरत आहे. बाळू युवराज पाटील हे अध्यक्ष आहेत. प्रति दिन २०० लिटर दूध संकलित होते. संस्था सतत ‘अ’ वर्गात असून, जिल्हा सहकारी दूध संघाला पुरवठा केला जातो.

शेतपाणंद रस्त्यांची गरज- शिवारात पावसाळा व व अन्य ऋतूत अवजड तसेच फळांची वाहतूक, थेट विक्री सुरू असते. शिवारात मालवाहू वाहने जात असतात. अशावेळी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेतरस्ते तयार केले. मात्र ते अजून मजबूत होण्यासाठी शासनाने पाणंद रस्ते योजनेतून भरीव निधी द्यावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

धार्मिक उपक्रम- नवरात्रोत्सवात महाप्रसाद, महापूजा तसेच विठ्ठल मंदिरातर्फे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन असते. या वेळेसही महाप्रसाद किंवा भंडारा असतो. ग्रामस्थांचा त्यात हिरिरीने सहभाग असतो. भवानी देवीचे पुरातन मंदिर गावच्या वेशीवर आहे. भव्य विठ्ठल मंदिर लोकवर्गणीतून उभारले आहे.

भगवान पाटील ९९२३७८२१९८

राजेंद्र पाटील ९०११२९३६६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com