
Rural Entrepreneur Success Story : वाशीम जिल्ह्यात विदर्भ- मराठवाडयाच्या सीमेलगत जवळा (ता. रिसोड) हे छोटेसे गाव आहे. येथील चाटे कुटुंबाची एकत्रित सहा एकर शेती आहे. वडील (कै.) श्रीराम यांनी शेती आयुष्यभर जोपासली. त्यांच्या निधनानंतर आई राऊबाई यांनी तीन मुले व मुलीला सांभाळले.
पूर्वीच्या काळात १५ ते २० गावरान कोंबड्या, २० ते २५ शेळया, एक- दोन दुधाळ गाय, बैलजोडी असे पशुधन कुटुंबाकडे होते. तोच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. आजही २० ते २५ गावरान कोंबड्या आहेत.
मुलांनी संघर्षातून घेतली झेप
श्रीराम यांना कडुजी, भारत आणि सुखदेव अशी तीन मुले व सरस्वती ही मुलगी आहे. तिचे लग्न झाले आहे. कडुजी बीए द्वितीय वर्षापर्यंत शिकले. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
सन २००५ च्या दरम्यान रोजगारासाठी त्यांना गाव सोडून आळंदी गाठावी लागली. तेथून जवळच्या गावी ते अर्थार्जनासाठी राहिले. नंतर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे रिसोडला इलेक्र्टॉनिक दुकानात ते कामाला लागले.
त्यावेळी मोलमजुरी करीतच त्यांनी दोन्ही भावांना शिक्षण दिले. भारत इंजिनिअर झाले. आज ते गुजरात येथे नोकरी करतात. तर सुखदेव यांनीही जीवरसायनशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. त्यांनीही शिक्षणानंतर मोठ्या भावाला शेतीत मदत करण्यास सुरवात केली.
ॲग्रोवन आयुष्यात आला, दिशा मिळाली
सन २०१४ मध्ये चाटे कुटुंबाने दोन म्हशी घेतल्या. सातत्य, मेहनतीतून सहा म्हशीपर्यंत संख्या वाढवली. दररोज ३५ ते ४० लिटर दूध डेअरीला देऊ लागले. इलेक्र्टॉनिक दुकानात काम करून कडुजी आपला व्यवसाय पाहात गोते. दुकानाच्या बाजूस एके ठिकाणी ॲग्रोवन यायचा.
एके दिवशी कडुजी यांच्या हातात हा अंक पडला. त्यातील यशोगाथांवर त्यांची नजर पडली. शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टातून साध्य केलेले प्रयोग, यश पाहून ते भारावले. कुठेतरी नवी प्रेरणा मिळाली. ॲग्रोवनचा लळा लागला.
नियमित वाचन सुरू झाले. मग दुकानमालकाला विनंती करून ॲग्रोवन सुरु करण्याची विनंती केली. यशोगाथा वाचून ते संबंधित शेतकऱ्यांशी बोलायचे. ज्ञान- माहितीचे आदानप्रदान होऊ लागले. त्यातूनच २०१८ च्या दरम्यान कडुजींना ब्रॉयलर कुक्कुटपालन क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धैर्य मिळाले.
व्यवसायाची उभारणी
सुमारे तीनहजार पक्षी व १२० बाय ३० फूट आकाराचे शेड यापासून खासगी कंपनीसोबत करार पद्धतीने व्यवसायाची सुरवात झाली. कंपनीकडून पिल्लांचा पुरवठा, खाद्य, देखरेख, पक्षांची निगा यासाठी मार्गदर्शन मिळू लागले. एकेक बॅचमधून अनुभव समृध्द होत होता. उत्तम व्यवस्थापनातून पक्षांचे चांगले संगोपन होऊन पैसाही येऊ लागला. उत्साह वाढत चालला.
मग २०२० मध्ये १२० बाय ३० फूट आकाराचे दुसरे व २०२३ मध्ये २०० बाय ३० फूट आकाराचे तिसरे शेडही उभे केले. चाटे यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे शेती किंवा पूरक व्यवसायासाठी कोणतेही कर्ज घेतले नाही. पोल्ट्रीमधून जो पैसा येक राहिला तोच पुढे विस्तारासाठी गुंतवत गेले.
पहिले शेड उभारताना चार म्हशी विकल्या. शिवाय घरची शिल्लक रक्कमही गुंतवली. आज तीन शेडसमधून १२ ते १३ हजार पक्षी संगोपनाची क्षमता तयार झाली आहे. वर्षभरात १२ पर्यंत बॅचेस घेण्यात येतात.
साधारण अडीच किलो वजनाचा पक्षी ३८ दिवसांमध्ये तयार करण्याचे उद्दिष्ट असते. कंपनीकडून ८ रुपये प्रति किलो दर मिळतो. काहीवेळा त्यात तीन-चार रुपयांची वाढही होते. वर्षभरात एकूण व्यवसायातून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.
आर्थिक प्रगती झाली
सुखदेव सांगतात की पोल्ट्री व्यवसायातून आज गरिबी पूर्णपणे दूर झाली आहे. घरखर्च, बहिणीचे लग्न, मुलांचे शिक्षण अशा सर्व बाबी शेतीतील उत्पन्नातून साध्य होतात. शेतात पाच बोअर घेतले आहेत. दीड किलोमीटरवरील धरणावरून जलवाहिनी उभारली आहे.
सहा एकर शेतात तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे. पारंपारिक पिकांपेक्षा टोमॅटो, कोबी, झेंडू अशी व्यावसायिक पिके घेतली जातात. आजवरच्या प्रवासात आई- वडील सावलीसारखे उभे राहिल्याने कुटुंबाचे जीवन सुखकर झाल्याचे कडुजी सांगतात.
शिवाय तीनही भावांची एकी अधिक मोलाची ठरली आहे. कुटुंबातील नऊ सदस्य आज गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. गुजरातमधील भाऊ देखील कुटुंबाला मोलाची आर्थिक मदत करतो. आज सुखदेव यांची ओळख केवळ पोल्ट्री उत्पादक म्हणून राहिलेली नाही. तर व्यवसाय उभारणीसाठी सल्लागार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
गावात मोठा टुमदार बंगला साकारत आहे. एकाच ठिकाणी तीनही भावांसाठी घर उभे राहत असल्याचे सांगताना आई राऊबाई यांच्याकडे शब्द कमी पडतात. मुलांनी घेतलेली झेप, केलेली मेहनत त्यांच्या प्रत्येक वाक्यातून डोकावते. माळकरी असलेल्या राऊबाई गावच्या उपसरपंचही आहेत.
कडुजी चाटे ८९७५०७५२३८
सुखदेव चाटे ८०८०२७४८१३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.