Desi Poultry Farming : गावरान कुक्कुटपालनातून गवसले आर्थिक स्थैर्य

Gavran Kombadi Palan : जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून कुक्कुटपालन आणि शेती यशस्वी केली आहे. शेतीतील घटत्या उत्पादकतेवर मात करत शेती टिकवून ठेवली आहे. आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Poultry Business Success Story : शेती ही आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची मुख्य आधारशिला आहे. मात्र, केवळ शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसाय करणे ही काळाची गरज बनली आहे. बाळापूर तालुक्यातील बोराळा येथील शेतकरी गजानन भीमराव टाले यांची वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. भाऊ नामदेव आणि गजानन दोघे मिळून शेती करतात. शेतीत हंगामी सिंचनाची सुविधा त्यांनी निर्माण केली. मात्र, या भागातील शेतीची उत्पादकताच मुळात कमी असल्याने पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते.

योग्य व्यवस्थापन करूनही सोयाबीनचे सरासरी उत्पादन सहा ते सात क्विंटल आणि कपाशीचे सात ते आठ क्विंटलपर्यंत मिळायचे. त्यामुळे बदलत्या हवामान परिस्थितीमुळे आणि शेतीतील वाढत्या खर्चामुळे केवळ शेतीवर पूर्णतः अवलंबून राहणे कठीण बनले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी २०१९-२० मध्ये गावरान कुक्कुटपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित प्रशिक्षण पूर्ण केले. अगदी अल्प खर्चात घराशेजारील शेतात शेड उभारणी करत व्यवसायाला सुरुवात केली. दरमहा सुधारित जातीच्या कोंबड्यांची २५० ते ३०० पक्ष्यांची बॅच घेतली जाते. गावरान कुक्कुटपालनातून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले देण्यात श्री. टाले यशस्वी झाले आहेत.

Poultry Farming
Desi Poultry Farming : सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती निवडा उत्पादन वाढवा

कुटुंबाला आधार, शेतीला हातभार

गजानन टाले यांचा गावरान कुक्कुटपालन व्यवसाय हळूहळू विस्तारत गेला. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे शक्य झाले. सुरुवातीला हजार पक्ष्यांची देखील बॅच घेतली जात असे.

मात्र मागणी आणि विक्रीचा अंदाज घेत पक्षी संख्या निश्‍चित केली. शेती आणि कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य कार्यरत असल्यामुळे सर्व कामे नियोजितरित्या पार पडणे शक्य होते. त्यामुळे शेतीवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाली. पूरक व्यवसायामुळे शेतीत नव्या गुंतवणुकीसाठी भांडवलही उपलब्ध होऊ लागले.

स्वतः करतात विक्री

काही कोंबड्यांची विक्री ही जागेवरून केली जाते. तर काही कोंबड्या शनिवारी बाळापूर आणि रविवारी अकोला येथील बाजारात विक्रीला नेतात. महिन्याला सरासरी दोनशे कोंबड्यांची विक्री होते. बाजारात प्रति कोंबडी २५० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळतो. एक कोंबडी तयार करण्यासाठी साधारणपणे ८० ते १२० रुपयांपर्यंत खर्च येतो. विक्रीतून महिन्याकाठी ३५ ते ४० हजारांपर्यंत उत्पन्न हाती शिल्लक राहते, असे श्री. टाले सांगतात.

Poultry Farming
Poultry Farming : बदक, कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातींचे संगोपन

खर्चावर नियंत्रण

गावरान कुक्कुटपालन करताना उपलब्ध स्थानिक संसाधनांचा वापर करण्यावर भर देण्यात आला. कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य स्वतः घरीच तयार करतात. विविध धान्यांचा भरडा करण्यासाठी चक्की बसवलेली आहे. शिवाय पूरक आहार उपलब्ध होण्यासाठी शेतात पालक व इतर भाजीपाल्याची लागवड केली जाते.

भाजीपाला कोंबड्यांना खाऊ घालण्याचे अनेक फायदेही दिसून येत आहेत. त्यामुळे तयार खाद्य विकत घेण्याची आवश्यकता भासत नाही. यामुळे खर्चात बचत होत आहेच, शिवाय कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

पीक उत्पादकतेसाठी प्रयत्न

कुक्कुटपालन स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर आता शेतीत उत्पादन वाढीसाठीही सक्रिय प्रयत्न गजानन करीत आहेत. शेतीत मुख्यत्वे सोयाबीन आणि कपाशी पिके घेतली जातात. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून सुधारित बियाण्यांच्या लागवडीतून पीक उत्पादनात सातत्याने सुधारणा करीत आहेत. शेतात कोंबडीखताचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. शिवाय शेतातील सोयाबीन कुटार व इतर कुटार कोंबड्यांना खाद्य म्हणून दिले जाते.

आत्मा यंत्रणेच्या प्रशिक्षणातून मिळाली दिशा

कृषी विभागाच्या (आत्मा) यंत्रणेमार्फत शेतीपूरक व्यवसायासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. गजानन टाले यांनी (आत्मा) यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांच्याशी संपर्क करून अकोला कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला.

गावरान कोंबडीपालनाबाबत कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. गोपाल मंजुळकर यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन बारकावे जाणून घेतले. व्यवसायातील तांत्रिक माहिती घेतल्यानंतर पक्ष्यांच्या आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे समजले. त्यासाठी लसीकरण, खाद्य, स्वच्छता असे विविध बारकावे प्रशिक्षणातून समजून घेतले.

- गजानन टाले ७५८८५०१८४४

कुक्कुटपालन उत्तम शेतीपूरक व्यवसाय आहे. योग्य नियोजन असले तर छोट्या गुंतवणुकीतून व्यवसाय करता येतो. शेतकऱ्यांनी अशा पूरक व्यवसायांची सुरुवात छोट्या स्तरावर का होईना करणे फायदेशीर ठरेल.
- सागर डोंगरे, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर, जि. अकोला.
कुक्कुटपालन व्यवसायात पक्ष्यांची दैनंदिन काळजी, योग्य आहार, आरोग्य, स्वच्छता आणि अंडी गोळा करण्यासारखी कामे नियमितपणे करावी लागतात. कुक्कुटपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणूक, मर्यादित जागेत करता येण्यासारखा आहे. व्यवसायासाठी केव्हीके यंत्रणेकडून वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन केले जाते.
- डॉ. गोपाल मंजुळकर, विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com