
Rural Livelihood : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक गावात पारंपरिक मेंढीपालन व्यवसाय करणारी काही मोजकीच कुटुंबे राहतात. परंपरेने चालत आलेला मेंढी व्यवसाय आसपासच्या गावशिवारात फिरून ते करतात. पाणकळ्याचे चार महिने मेंढीचे संगोपन करणं त्यांच्यासाठी मोठं जिकरीचे असतं.
कुटुंबाच्या जगण्याचा हा एकमेव आधार असतो. त्यामुळे मिळेल तसं, जमेल तसं, शिवारात सर्वांशी गोडी गुलाबीनं वागून, चराईच जेवढं क्षेत्र उपलब्ध आहे त्यात जगण्याची कसरत हे मेंढीपालक करताना दिसतात. थोड्याबहुत शेतीचा एखादा दुसरा अपवाद वगळता बहुतांश जणांकडे शेतीच नाही.
मुलांच्या शिक्षणाची आबाळ वाचवली
मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील कोंडापूर झांजर्डे येथील मूळचे खंडू, विठ्ठल व दादासाहेब हे पंडित बंधू पंचवीस वर्षांपूर्वी आडगाव बु. येथे स्थायिक झाले. जेव्हा आले तेव्हा १३ मेंढ्या होत्या. आता पावणेतीनशेच्या आसपास त्यांच्याकडे गावरान मेंढ्यांची संख्या आहे.
त्यात खंडू यांच्या सुमारे ७०, विठ्ठल यांच्या ६५ तर दादासाहेबांच्या सुमारे १२५ मेंढ्यांचा समावेश आहे. याशिवाय तिन्ही भावंडांकडे प्रत्येकी पाच- सहा शेळ्या आहेत. मूळ गावी थोडी शेती असली तरी तिचा फारसा उपयोग त्यांना नाही. आजही त्यांचे वडील या शेतीत कष्ट करून चरितार्थ भागवतात.
कोकरू व प्रसंगानुरूप मेंढ्यांची विक्री करून आपला चरितार्थ व मुलाबाळांचे शिक्षण भागविण्याची कसरत पंडित बंधू करतात. पूर्वी त्यांचे पूर्वज दूरवर मेंढीपालनासाठी भटकंती करायचे.
त्यामुळे मुला- बाळांच्या शिक्षणाची आबाळ व्हायची. ती दूर करण्यासाठी, मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून तिन्ही बंधू आसपासच्या पाच-सहा गाव शिवारात फिरूनच मेंढ्यांचं संगोपन करतात. सकाळी सहा वाजता घराबाहेर पडले की थेट अंधार पडला की मेंढ्या चराई करून परत येणे हा त्यांचा नित्यक्रम असतो.
अर्थकारण
पंडित कुटुंबातील दादासाहेब म्हणाले, की १५ महिन्यांत दोनदा मेंढी पिले देते. एक पिले देणाऱ्या मेंढीची संख्या जास्त. अनेकदा सोईंअभावी मरतुकही मोठी असते. वर्षभरात सुमारे १५० ते २०० कोकरू व मेंढ्यांची व्यापाऱ्यांना विक्री करून अर्थार्जन होते. सुमारे आठ ते बारा हजार रुपये प्रति मेंढी तर पाच ते सात हजार रुपये प्रति कोकराच्या विक्रीतून मिळतात. दर सहा महिन्यांनी काही प्रमाणात लोकर मिळते.
त्याची ४० ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री करून उत्पन्नात थोडी फार भर पडते. बारा महिन्यांतून आठ महिने रानोमाळ भटकंती असल्याने लेंडीखत तेवढे मिळत नाही. परंतु पाणकळ्यात चार महिने बऱ्यापैकी लेंडीखत वर्षभरात उपलब्ध होते. सुमारे तीन हजार रुपये प्रति ट्रॉली त्याला दर मिळतो. अशा प्रकारे या सर्व स्रोतांवरच पंडित कुटुंबाच्या तेरा सदस्यीय कुटुंबाचा अर्थकारणीय डोलारा चालतो. वर्षाला सुमारे तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
चराई क्षेत्राअभावी परवड
दिवसेंदिवस मेंढीपालनात अनेक समस्या वाढत असल्याने गावशिवारात जमेल तशी चराई करून करण्याचा आडेगावच्या मेंढीपालकांचा प्रयत्न असतो. अनेकदा चराई करायची कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. चाऱ्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा आधार नाही. खास करून खरिपात संकटांची तमा न बाळगता परिसरातील गाव शिवारांमधील डोंगरकडा चढून मेंढ्यांचं पोट भरण्याची कसरत असते.
चराईक्षेत्राअभावी मेंढ्या जगवणे मोठं जिकिरीचे होत चालल्याचे दादासाहेब तसेच हरी शेजूळ, मच्छिंद्र कोरडे आदी मेंढीपालकांनी सांगितले. मेंढ्यांची संख्या जास्त असली की संरक्षणासाठी व चराईक्षेत्र शोधण्यासाठी माणसांची गरज लागते. त्यामुळे आडगाव बुद्रुकचे मेंढीपालक चराईसाठी सोबतीने मेंढ्या घेऊन जाण्याला प्राधान्य देतात. प्रसंगानुरूप नात्यागोत्यातील पाहुणेही मेंढीपालनासाठी मदत करतात. अशा पद्धतीने एकमेकांच्या साह्याने मेंढीपालनाचा प्रपंच या कुटुंबांनी पुढे सुरू ठेवला आहे.
सुरक्षेचा मुद्दा गंभीर
मेंढ्यांची भटकंती करताना सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी स्वतःचे श्वान मेंढ्यांच्या रक्षणासाठी सांभाळले जाते. वादळ, गारपीट, पाऊस याची तमा न बाळगता मेंढ्यांसोबत ठाण मांडून राहावं लागतं. वन्य प्राण्यांचं संकट असतंच. हरी शेजूळ म्हणाले, की पंधरवड्यापूर्वी कळपात पिलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला.
त्यात १५ पिलं मारली गेली. झालेलं नुकसान लाखांत होतं. पण त्याची दाद मागावी तरी कुणाकडे? शासन दरबारी मदतीची याचना करायची तरी कागदपत्रांची जुळवाजुळव, कार्यालयात चकरा आल्या. ते करायचं मग मेंढ्या कुणी सांभाळायच्या हा प्रश्न. शेजूळ यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांच्या चरितार्थाचा या मेंढ्याच आधार आहेत.
त्यांच्याकडे ८० गावरान मेंढ्या-आहेत. वर्षाला ते ३० ते ३५ नर विकतात. प्रति सहा हजार रुपये दराने त्याची विक्री होते. वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. शेती एक एकर असून त्यातून घरी खाण्यापुरतं अन्न उत्पादित होतं. शेतकऱ्यांकडे लेंडी खतासाठी शेतात मेंढ्या बसवण्यातूनही उत्पन्न फारसे मिळत नसल्याचे शेजूळ सांगतात. त्यामुळे मेंढ्यांची विक्री हाच एक महत्त्वच पर्याय असतो.
संवेदनशीलता
लसीकरण करणे, आजारी मेंढीवर उपचार करायचे तर खासगी पशुवैद्यक बोलवा, त्यासाठी पैसे मोजा असंच सुरू असल्याचे मेंढीपालक म्हणतात. विमा उतरवत नाही का या उत्तराला शासनाची यंत्रणा तत्काळ दखल घेऊन घटनास्थळी येऊन पंचनामा करेल का? न आल्यास मृत पावलेली मेंढी किंवा शेळी यंत्रणा येईपर्यंत सांभाळता येईल का असे प्रश्न मेंढीपालक उपस्थित करतात. पशुसंवर्धन विभाग मेंढ्यांच्या आरोग्याविषयी अधिक संवेदनशीलता बाळगू शकणार नाही का असा प्रश्न सामाजिक चळवळीत काम करणारे आडगावचेच विश्वंभर हाके व जगदीश डवले उपस्थित करतात.
दादासाहेब पंडित ९७६४३३९०११
हरी शेजूळ ९३२५५७७५६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.