Layer Poultry Business : तपश्‍चर्येतून विस्तारलेला मराठवाड्यातील लेअर पोल्ट्री व्यवसाय

Modern Poultry Farming : परभणी जिल्ह्यातील पेठपिंपळगाव (ता. पालम) येथील उच्च शिक्षित कृष्णा भोसले यांनी लेयर पोल्ट्री (अंडी) उद्योगात चांगला जम बसला आहे.
Poultry Farming
Poultry Farming Agrowon
Published on
Updated on

Rural Poultry Entrepreneurs : परभणी जिल्ह्यातील अविकसित म्हणून गणलेल्या पालम तालुक्यातील दुर्गम भागात पेठपिंपळगाव गाव आहे. गंगाखेड ते लोहा महामार्गावर तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस पाच किलोमीटरवर हे गाव वसले आहे. येथील भाऊसाहेब भोसले कुटुंबाची पेठपिंपळगाव ते राणीसावरगाव राज्य रस्त्यालगत ६० एकर जमीन आहे. भाऊसाहेब अखिल भारतीय काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते आहेत.

त्यांनी १९९२ ते १९९७ या कालावधीत तत्कालीन एकत्रित परभणी जिल्हा परिषदेमध्ये चाटोरी (ता. पालम) गटाचे प्रतिनिधित्व केले. दोन वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात पूर्णा, दूधना, करपरा या नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे तसेच गोविंदराव आदिक यांनी स्थापन केलेल्या कृषक समाज संघटनेचेही ते जिल्हाध्यक्ष होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाण होती. जिल्ह्याचा जलसंधारण आराखडा तयार करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. भाऊसाहेबांना चार मुली आणि कृष्णा हे एकुलते चिरंजीव आहेत.

शेतीपूरक उद्योगालाच दिले महत्त्व

भाऊसाहेबांचे चिरंजीव कृष्णा यांनी संगणकीय व्यवस्थापन विषयातून पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथून विपणन व्यवस्थापन विषयात एमबीए व त्यानंतर त्यात पदव्युत्तर पदवीही संपादन केली. त्यानंतर २००७ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एका कंपनीत त्यांनी व्यवस्थापन विषयाच्या अनुषंगाने सहा महिने संशोधन प्रकल्प पूर्ण केला.

खरे तर नोकरीच्या उत्तम संधी होत्या. पण कृष्णा यांचा खरा कल शेतीकडेच होता. व्यवस्थापन शास्त्रातील शिक्षण असल्याने त्याचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावी असे त्यांना वाटत होते. परंतु सततचा दुष्काळ व जिरायती भाग असल्याने केवळ शेतीवर अवलंबून राहणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नव्हते. शेतीपूरक उद्योगाची जोड दिल्यास जोखीम कमी करणे शक्य होते असे त्यांना वाटले.

पोल्ट्री उद्योगाला सुरुवात

२००७-०८ च्या सुमारास पोल्ट्री व्यवसायाचे नियोजन सुरू झाले. पेठपिंपळगाव नजीकच्या गावांमधील तरुण शेतकऱ्यांना सोबत घेतले. त्या वेळी १० ते १२ गावांतील शेतकऱ्यांनी ब्रॉयलर पोल्ट्री फार्म सुरू केले होते. कृष्णा यांनीही पाचशे पिले आणली. लाकूड, पत्रे वापरून माफक खर्चात शेड उभारले. त्या वेळी पिले पुणे येथून आणली जात.

परंतु त्यांचा वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे नुकसान होऊ लागले. मग २०११ मध्ये शेतातच हॅचरी सुरू केली. महिन्याला ५० हजार पिले निर्मितीची तिची क्षमता होती. परिसरात ८६ हजार पिलांचा पुरवठा केला जात असे. परंतु कालांतराने बर्ड फ्लूची साथ, भारनियमन, दरांमध्ये चढ-उतार आदी विविध संकटांमुळे नुकसान झाले. परिसरातील गावातील शेतकऱ्यांनीही पोल्ट्री फार्म बंद केले. त्यामुळे हॅचरी बंद करावी लागली.

Poultry Farming
Poultry Farming : बदक, कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातींचे संगोपन

पोल्ट्रीपासून फारकत नाही

पोल्ट्री उद्योग थांबवण्यची वेळ आली तरी त्यापासून काही झाले तरी दूर जायचे नाही असे ठरवले होते. परंतु हाताशी भांडवल नव्हते. अशावेळी कृष्णा यांनी उस्मानाबादी शेळीपालन सुरू केले. प्लॅटफॉर्म पद्धतीने शेड उभारले. उत्तम व्यवस्थापन करीत शेळ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने ४५० पर्यंत वाढवली.

या उद्योगातून कमावलेले उत्पन्न आणि गाठीशी असलेली रक्कम यातून नव्याने पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे ठरविले. परंतु आता ब्रॉयलर ऐवजी लेयर पोल्ट्रीचा (अंडी उत्पादन) पर्याय निवडला. त्याचा अभ्यास करण्यासाठी तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी भागांत भेटी दिल्या. यशस्वी लेयर पोल्ट्री उद्योजकांचे अनुभव जाणून घेतले. २०१७ मध्ये मध्ये उद्योगाची उत्पादनाच्या अनुषंगाने सुरुवात झाली.

उद्योगाची उभारणी

कृष्णा यांनी प्रत्येक वेळी आपली इच्छाशक्ती व संयम कायम ठेवला. ब्रॉयलर पोल्ट्री फार्म असतानाच्या काळात एक वर्षी झालेल्या वादळात शेड मोडून मोठे नुकसान झाले होते. परंतु नव्या उमेदीने पुन्हा एकदा १२० बाय ४८ फूट लांबी-रुंदीचे, सिमेंट काँक्रीटचे खांब, छतासाठी दर्जेदार पत्रे, लोखंडी जाळ्या यांचा वापर करून प्रमाणित, मजबूत शेड उभारले आहे. त्याची साडेपाच हजार पक्षी संगोपनाची क्षमता आहे. या व्यतिरिक्त तीन वर्षांपूर्वी दोन शेडसद्वारे विस्तार केला असून, ३६० बाय ४८ फुटांच्या या जागेत या दोन्ही शेड्‍सची मिळून साडे १७ हजार पक्षी संगोपनाची क्षमता तयार झाली आहे.

थ्री रो-थ्री टायर केज पद्धतीचा वापर

त्रिस्तरीय म्हणजे थ्री-रो-थ्री टायर कॅलिफोर्नियन केज (पिंजरा) पद्धतीने पक्षांचे संगोपन होते. पुणे येथील आघाडीच्या कंपनीकडून एक दिवसाची पिले आणली जातात. ‘ब्रूडिंग’ झाल्यानंतर १४ व्या ते १५ आठवड्यांत अंडी उत्पादनासाठी पक्षांचे पिंजऱ्यांमध्ये संगोपन केले जाते. या पद्धतीत प्रत्येक पिंजऱ्यात पाच पक्षी असतात. एक पक्षी सुमारे १८ महिन्यांपर्यंत अंडी देतो. या कालावधीत प्रति पक्षी ३४६ ते ४०० अंडी उत्पादन क्षमता असते. सध्या नव्या शेडच्या खालील जागेत ‘ब्रूडिंग’ केले जाते. मात्र त्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचे नियोजन आहे.

Poultry Farming
Desi Poultry Farming : गावरान कुक्कुटपालनातून गवसले आर्थिक स्थैर्य

खाद्य-पाण्यात ‘ऑटोमेशन’

स्वयंचलित (ऑटोमेशन) पद्धतीने पक्ष्यांना खाद्य-पाणी दिले जाते. फीडमिलमध्ये तयार झालेले खाद्य सायलोमध्ये साठविले जाते. त्यानंतर ट्रॉली वा हॉपर पद्धतीने ते फीडर व तेथून पक्ष्यांना पुरवले जाते. ‘निप्पल’ पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खाद्यात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी आधुनिक फीडमिल युनिट उभारले आहे.

प्रतिदिन आठ टन खाद्यनिर्मिती अशी त्याची क्षमता आहे. मका, सोया, डीओसी, राइस ब्रान आदी घटकांपासून खाद्य तयार केले जाते. कन्नड, जाफराबाद, लातूर, माजलगाव, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी ठिकाणाहून कच्चा माल खरेदी केला जातो.

स्वतःच्या उद्योगाची गरज भागवून महिन्याकाठी ३० टन खाद्याची प्रति किलो ३० रुपये दराने विक्री केली जाते. त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार झाला आहे. कोंबडीखताचा वापर स्वतःच्या शेतातही होतो. नागपूर येथून त्याच्या पॅलेट तयार करून आणल्या आहेत. आगामी काळात त्यांच्या निर्मितीचे नियोजन आहे.

व्यवस्थापनातील बाबी

पक्षी संगोपनगृहाची स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण यांचे काटेकोर पालन केले जाते. त्यामुळे जोखीम कमी होते. पक्ष्यांना सकाळी सहा आणि दुपारी दोन वाजता ‘फीडिंग’ केले जाते. दरम्यानच्या काळात सकाळी ११ ते १२ या वेळेत अंडी संकलित केली जातात. सायंकाळी पुन्हा पाच वाजता फीडिंग होते. दिवसभरात तीन वेळेचे मिळून प्रति पक्षी ११० ग्रॅम खाद्य दिले जाते. संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत लाइट सुरू ठेवावे लागतात.

लेयर पक्ष्यांना १६ ते १८ तास प्रकाशात ठेवल्यास अंडी उत्पादनाच्या दृष्टीने ते पोषक ठरते. मात्र उन्हाळ्यात दिवस मोठा असतो. त्यामुळे लाइटचा कालावधी कमी होतो.उन्हाळ्यात शेडचे तापमान योग्य राखण्यासाठी फॉगर्स लावावे लागतात. कृष्णा यांनी पोल्ट्री व्यवस्थापनातील बारकावे अवगत केले आहेत. या उद्योगातील १५ वर्षांचा अनुभव असलेले शिवदास व मीरा हे घाडगे या दांपत्याकडेही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

अंडी उत्पादन, बाजारपेठ, उलाढाल

सध्या प्रति दिन साडेपाच हजारांच्या दरम्यान अंडी उत्पादन होते. पालम, राणी सावरगाव, गंगाखेड, परभणी, पाथरी, परळी वैजनाथ, जळगाव आदी ठिकाणचे व्यापारी फार्मवर येऊन अंडी खरेदी करतात. ‘नॅको’ने निश्‍चित केलेल्या दराने दररोज विक्री होते. जुलैमध्ये प्रति अंडी ५.६० ते ६ रुपये दर मिळाले. अंडीदरांची वर्षाची सरासरी सांगायची तर ती ३. ८० ते सहा रुपये आहे. येत्या काळात प्रति दिन एक लाख अंडी उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू असल्याचे कृष्णा म्हणाले.

सुरवातीच्या काळात ८ ते १० लाख रुपये गुंतवणूक होती. विस्तार होत गेला तशी टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत गेली. आंबाजोगाई येथील दीनदयाळ नागरी बँकेचे ४० लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळाले. एकेकाळी ब्रॉयलर फार्म असताना वार्षिक १० ते १२ लाख रुपयांपर्यंत असलेली उलाढाल आजमितीला एक कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सुमारे दहा कामगारांसाठी उद्योगातून रोजगार तयार केला आहे.\

शेती व शेतकरी कंपनी

घरच्या शेतीची जबाबदारी कृष्णा यांच्या वडिलांकडे आहे. आता सुभाशीष ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनाही केली आहे. त्या अंतर्गत मका आणि सोयाबीन खरेदी केली जाते. कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय अन्नपोषण अभियानांतर्गत २५० टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी सुरू आहे. जलसंधारणासाठी विविध ठिकाणी ५१ जलतारा शोषखड्डे तयार केले आहेत. शेतीत हंगामी पिकांसह बहुवार्षिक फळपिके, टरबूज, खरबूज या हंगामी फळांचे उत्पादन घेण्यात येते. सिंचनासाठी बोअर व दोन शेततळी आहेत. कृष्णा काँग्रेसचे पालम तालुका अध्यक्ष आहेत.

सन्मान

सन २०२३ मध्ये स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित ध्वजवंदन समारंभास कृष्णा भोसले यांना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांना जिल्हा परिषदेअंतर्गत पालम तालुका युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पुरस्कार मिळाले आहेत. कृषी विभाग- आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय नियामक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली आहे.

कृष्णा भोसले ९९७०९५६७२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com